• Fri. Jun 9th, 2023

किफायतशीर दरांमुळे घरखरेदी आली आवाक्यात

    कोरोना विषाणूची कमी होत जाणारी तीव्रता आणि अर्थव्यवस्थेची रूळावर येणारी गाडी यामुळे ग्राहकांनी घरखरेदीच्या योजना पुढे ढकलू नयेत, असं तज्ज्ञांचं म्हणणं असून सध्याचा काळ मालमत्ता खरेदीसाठी अगदी योग्य असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

    बांधकाम व्यावसायिकांनी जाहीर केलेल्या योजना आणि विविध राज्यांच्या सरकारांनी दिलेल्या सवलती यामुळे गेल्या वर्षीचा सणासुदीचा काळ घरखरेदीसाठी उत्तम मानला जात होता. मात्र कोरोनाच्या प्रकोपामुळे खरेदीदारांनी आपल्या योजना पुढे ढकलल्या. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. कोरोनाचं सावट चांगलंच कमी होत आहे. अर्थव्यवस्थेलाही गती मिळू लागली आहे. त्यामुळे आता घरखरेदी लांबणीवर टाकण्यात काहीच अर्थ नसल्याचं मालमत्ता क्षेत्रातले तज्ज्ञ सांगत आहेत. अनेक कारणांमुळे सध्याच्या काळात घरखरेदीचा निर्णय योग्य ठरू शकतो.

किफायतशीर दरात उपलब्ध असणारी घरं हे त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणता येईल. घराच्या किंमती, उत्पनाचा स्तर आणि गृहकर्जाचे दर या तीन बाबींवर गृहखरेदीतला किफायतशीरपणा ठरत असतो.

    जेएलएल इंडियाच्या रहिवासी सेवा विभागाचे व्यवस्थापकीय संचालक शिव कृष्णन याबाबत सविस्तर सांगतात. ते म्हणतात, गेल्या पाच वर्षांपासून घराच्या किंमती जवळपास स्थिर राहिल्या आहेत आणि याच कारणामुळे घरं किफायतशीर दरात उपलब्ध होत आहेत. सध्या घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून आजवर कधीही इतक सकारात्मक परिस्थिती नव्हती. एचडीएफसीचे उपाध्यक्ष आणि सीईओ केक मिस्त्री म्हणतात, गेल्या पाच वर्षांमध्ये स्थिर राहिलेल्या मालमत्तेच्या किंमती, वर्षाला सरासरी सात ते आठ टक्के झालेली पगारवाढ या कारणांमुळे घरांचा किफायतशीरपणाही वाढला आहे. कोरोनाकाळानंतर रोजगारनिर्मितीच्या वाढलेल्या शक्यताही किफायतशीरपणाला बळ देत आहेत. सध्या नोकर्‍या मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध होत आहेत. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात कर्मचार्‍यांची भरती केली जात आहे.

    कोरोनाकाळात करण्यात आलेली पगारकपात आता मागे घेण्यात आली असून अनेकांचे पगार आता पूर्ववत होऊ लागले आहेत. यामुळे घरांच्या किंमती आणि वार्षिक उत्पन्न यांच्यातल्या गुणोत्तराने नीचांक पातळी गाठली आहे. गृहकर्जाच्या व्याजदरात झालेली कपात घरांच्या किफायतशीरपणात भर घालणारी आहे. ९0 टक्क्यांपेक्षा अधिक घरखरेदीदार गृहकर्ज घेतात. कमी व्याजदरांमुळे अधिक रकमेचं कर्ज घेणं शक्य होतं. परिणामी, किफायतशीरपणात भरच पडते, असं शिव कृष्णन सांगतात. कोलकातामधली घरं सर्वाधिक किफायतशीर असली तरी एकेकाळी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असणार्‍या मुंबईतल्या घरांचा किफायतशीरपणा वाढलेला आहे. २0२१ मध्ये मुंबईतली घरं सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली आहेत. घरांचा वाढलेला किफायतशीरपणा आणि खरेदीदारांचा गृहखरेदीकडे असणारा कल यांचा परिणाम आता मालमत्ता बाजारात दिसू लागला आहे.

    जुलै ते सप्टेंबर २0२१ या काळात देशातल्या आठ प्रमुख शहरांमधल्या घरांच्या विक्रीत १७ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली तर गेल्या वर्षभराच्या काळात ही वाढ ५७ टक्के इतक झाली. कोलकाता सोडल्यास देशातल्या अन्य सात प्रमुख शहरांमधल्या घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. मालमत्तेच्या स्थिर किंमती आणि गृहकर्जाचे कमी झालेले व्याजदर यामुळे येत्या काळात घरांच्या मागणीत मोठी वाढ अपेक्षित आहे. घरांच्या विक्रीत वाढ होत असल्यामुळे बांधकाम व्यावसायिक नव्या प्रकल्पांच्या घोषणा करत आहेत.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *