• Tue. Jun 6th, 2023

आत्ममग्न व पर्यावरण विनाश करणारी जीवनशैली मानवाला बदलावी लागणार.!

    आपण सर्वजण जाणतोच, की ‘पृथ्वी’ हा एकमेव असा ग्रह आहे, की त्या ठिकाणी जैविक, अजैविक घटकांची निर्मिती होऊ शकली व हजारो वर्षे टिकूनही राहू शकली व अजूनही राहत आहेत. पृथ्वीशिवाय अन्यत्र कोठेही अजून तरी जैविक घटक अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडत नाहीत. मानवाबरोबरच इतरही प्राणी, पक्षी, वनस्पती, पाने-फुले, झाडे-झुडपे, माती, जमीन, पाणी, डोंगर यांचेही विविध प्रकार अस्तित्वात असून हे सर्व घटक एकत्र जगतात. जैविक, अजैविक घटकांचे विविध रंग, आकार, उपयोग, महत्व व वैविध्यपूर्ण नैसर्गिक चक्र या सर्वांचे परस्परांशी असणारे संबंध यामुळे पृथ्वी जणू सर्व घटकांसाठी एक सुंदर व नयनरम्य सृष्टीच आहे. परंतु स्वत:ला बुद्धीजीवी व आधुनिक समजला जाणारा माणूस आपल्या परिसरावर फार मोठा व महत्त्वाचा परिणाम करतो आहे. माणसामुळे पर्यावरणात जेवढे बदल झाले आहेत, तेवढे अन्य घटकांमुळे क्वचितच झाले असतील.

    माणसाची सांस्कृतीक व आरामदायी जीवनशैली यांची प्रगती सुरू झाल्यापासून पर्यावरणात फार झपाट्याने व मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. हा बदलाचा वेग अनैसर्गिकरीत्या वाढतो आहे. त्यामुळे प्राण्यांना, वनस्पतींना या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे फार कठीण झाले आहे व होत आहे. काही अंशी काही प्राणी-पक्ष्यांनी माणसाशी जुळवून घ्यायला सुरुवात केली आहे. परंतु तरीही ज्यांना या पर्यावरणाशी जुळवून घेणे अशक्‍य झाले त्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे व येताना दिसत आहे. मुबलक जैविक विविधता असणारी जमीन मर्यादित होऊ लागली आहे. ही मर्यादा घरबांधणी, रस्ते, मोठमोठे औद्योगिक प्रकल्प यामुळे उपलब्ध जमीनीचा वापर, उपयोग या कामांसाठी केला जाऊ लागल्याने वा होत असल्याने त्यातून जमीनीवर अतिक्रमने होत आहेत. परिणामी त्यातून जैविक, अजैविक घटक नष्ट होऊ लागली आहेत. सातत्याने होणारी वृक्षतोड, जंगलतोड, जमिनीची खोदाई, घातक रासायनिक द्रव्ये, किटकनाशक, जंतुनाशक यांचा अतिरेकी वापर यामुळे जमीनीची सुपीकता दिवसेनदिवस नष्ट होत असल्याने पाणी शोषण्याची क्षमता कमी होत आहे. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी दिवसागणिक खालावत चालली आहे. जंगले, पाणी या समस्यांचा परिणाम सजीवांच्या अस्तित्त्वावर होत आहे. ज्या जैविक घटकांचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला ते विस्थापित झाल्याने त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. कित्येक प्राणी, झाडे नामशेष झाले आहेत व काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून जैविक, अजैविक विविधता जेवढी अधिक, तेवढे पर्यावरण व्यवस्थेचे स्थैर्य अधिक.

    आपले मानवी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी (किं)वा टिकून ठेवायचे असेल तर पर्यावरणाशी, निसर्गाशी जुळवून घेणे खुप महत्त्वाचे आहे हे आज रोजी बुद्धिजीवी माणसाला का बरं कळत नसेल? काही उदाहरणांचा विचार व अभ्यास करायचा झाल्यास २०१० मध्ये मेक्सिकोच्या खाडीमध्ये दहा किलोमीटर खोलवर गेलेल्या ब्रिटीश पेट्रोलियम कंपनीच्या तेलवाहिनीचा स्फोट झाला होता. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे उगमस्थान असल्याची शेखी मिरवणाऱ्या अमेरिकेला तब्बल एकशे दहा दिवस तेलाची गळती रोखता आली नव्हती. अब्जावधी लिटर तेलाने समुद्र भरून गेला होता. त्यामुळे सागरी जैवसंपदेची अपरिमित हानी झाली होती. याचा ताप जगाला सहन करावा लागला होता. इंडोनेशियाच्या जंगलातील आगीच्या धुराचे लोट गेल्यामुळे सिंगापूर कित्येक दिवस गुदमरलेल्या अवस्थेत होता.

      ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण आगीमुळे असंख्य पशु-पक्षी, झाडे, वेली जळून खाक झालेत. ही घटना हृदय पिळवटून टाकणारी होती. जैविक विविधता नष्ट होण्याची कारणे लक्षात घेतली असता सध्य:काळात जैविक विविधतेच्या विनाशाला जे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घटक कारणीभूत आहेत, त्यांचा विचार करणे खरंच आवश्यक झाले आहे. जैविक विविधतेच्या र्‍हासाला खऱ्या अर्थाने माणसाची जीवन जगण्याची पद्धतच फार मोठ्या प्रमाणात जबाबदार असलेली दिसते. पशु-पक्षी, प्राणी, जमीन, जंगले, नदी, पाणी, माती, हवा, खडक, डोंगर, खनीजे आदी. पृथ्वीवरील जैविक व अजैविक संपदा जतन करून टिकवून ठेवायची की त्यांना अंताकडे न्यायचं याचा निर्णय आपल्या वर्तनातून दिसत आहे तसेच पुढेही दिसणार आहे. केवळ स्वतःचा विचार करून मन मानेल तसे वागणे ही आपली नैतीकता, संस्कृती मुळीच नव्हे. बेपर्वाईने वागणे म्हणजे एकदिवस स्वतःचा व जगाचा घात करणारा ठरणार आहे. कुठल्याही प्रकारची मानवी संकुचित वृत्ती पर्यावरणास, निसर्गास काल, आज आणि उद्याला कदापि मान्य नाही. आपल्याकडे विशाल दृष्टीकोन नसेल तर पर्यावरणाचा त्याचबरोबर आपला(मानवाचा) अंत अटळ आहे. पर्यावरणाला, निसर्गाला न जपणे म्हणजे काळाच्या ओघात एकदिवस नाहीशे होणे हे शास्वत सत्य आहे.

      स्वतःच्या स्वार्थापाई विसाव्या शतकाच्या मध्यात किंवा एकविसाव्या शतकात सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उलथापालथ होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी विचार करण्यासाठी सुद्धा सवड आपल्याकडे राहणार नाही, अशी युद्धजन्य स्थिती हवामान बदलाने होणार आहे. पृथ्वीला जपायचे असेल तर आपल्या क्षुद्रत्वाच्या स्पर्धेला व सुडाच्या प्रवासाला पूर्णविराम द्यावा लागणार आहे.

      आजचे चित्र बघता लोकसंख्येचा, वाहनांचा, उंचउंच इमारती बांधकाम वाढीचा वेग धडकी भरणारा आहे. अन्न, पिण्याचे पाणी, शुध्द हवा व ऊर्जा आणायची कुठून हा प्रश्न मात्र आपल्या सर्वांना सतावणार आहे, भेडसावणार आहे. धान्य, अन्नपदार्थ, पाणी, जमीन, विविध औषधी व फळझाडे सांभाळण्याकरिता भविष्यात सर्वत्र अत्याधुनिक पहारे द्यावे लागतील की काय? हा विचार भविष्यात सतावणारा असणार आहे. शेवटी बुद्धीजीवी मानवाला नैतिक, वैज्ञानिक, तार्किक, सर्जनशील व तात्विक तत्वे या कसोट्यांवर घासूनपुसून व तपासून घेण्याची गरज आहे. तसेच वैयक्तिक जीवनशैली बदलण्याचं एक मोठं आव्हान असणार आहे.

      जैविक, अजैविक घटकांच शोषण करून, स्वत:चे वर्चस्व सिध्द करणे यात कुठला पराक्रम. केवळ जैविक, अजैविक संरक्षण कायदे करून भागणार नाही तर प्रत्यक्ष कृतीची गरज लक्षात घेऊन ती टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येकांनीच जैविक, अजैविक संरक्षण कार्यक्रमात सक्रीय सहभागी होणे व इतरांना सहभागी करून घेणे आवश्यक झाले आहे. जैविक, अजैविक विविधता टिकविणे, टिकवून ठेवणे हा सर्वांचा एक समान वारसा आहे. या सर्वच प्रकारच्या घटकांना आपले अस्तित्व टिकविण्याचा अधिकार आहे. जास्तीत जास्त प्रमाणात या घटकांचे संरक्षण करता येईल तेवढे चांगले व आपल्या हिताचे ठरणार आहे. याचे उत्तम उदाहरण, चिपको आंदोलनात स्त्रियांनी स्वत: पुढाकार घेऊन प्रत्येक झाड पकडून ठेवून ते पाडू न देण्याची भूमिका घेतली त्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड वाचली. परंतु दुसरे उदाहरण मुंबईतील आरे जंगलातील वृक्षतोड मनाला विचलीत करणारे, वेदना देणारे आहे. अशा या समस्या सोडवण्यासाठी सहकार्य वाढवणं, जैविक व अजैविक संसाधने जपणे, जोपासने, संवर्धन करणे हाच एकमेव मार्ग असणार आहे.

      -संतोष मो. मनवर
      जि.प.उ.प्रा. शाळा पंचाळा.
      (Images Credit : webdunia)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *