हिंगणघाट : बहुचर्चित अंकिता पिसुड्डे जळीत कांडप्रकरणी मंगळवार, २८ डिसेंबर रोजी बचाव पक्षाचे वकील अँड. भूपेंद्र सोने यांनी युक्तिवाद पूर्ण केला. यावेळी अँड. सोने यांनी प्रथमदर्शनी साक्षीदाराचा पुरावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला व वैद्यकीय अधिकार्यांचासुद्धा पुरावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. तसेच या प्रकरणात सादर करण्यात आलेले पंचनामे खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणात दोन्ही प्रत्यक्षदश्री साक्षीदाराच्या बयाणात जी तफावत होती ती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत सागर मेंढे यांनी आरोपी पश्चिम दिशेला पळाला तर दुसरा साक्षीदार सांगतो की आरोपी गल्लीतून पळून गेला. पण, त्या गल्लीची अंदाजे रुंदी सांगू शकला नाही तसेच वैद्यकीय पुराव्यात भरपूर तफावत असून हिंगणघाट येथील ड्रा धोपटे यांच्या रिपोर्टनुसार ती १९ टक्के जळाली होती तर नागपूर येथील अरेंज सिटी हॉस्पिटलचे ड्रा विनोद गावडे यांच्या रिपोर्टनुसार ४0 टक्के तर पोस्टमार्टम करणारे ड्रा पाठक ३५ टक्के जळाल्याच्या प्रमाणपत्रानुसार ती फार मोठी तफावत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार पक्षातर्फे न्यायालयासमोर असा एकही साक्षीदार आणू शकले नाही की ज्याने घटनेच्या वेळी आरोपीला पेट्रोल काढताना बघितले.
या प्रकरणातील साक्षीदार अभय तळवेकर हा घटनेच्या वेळी कॉलेजमध्ये होता. त्याची कॉलेजची वेळ ही सकाळी ७ ते १२ असून घटनेची वेळ सकाळी ७.१५ ची आहे. त्यामुळे तो साक्षीदारच नाही आहे, असे अँड. सोने यांनी सदर प्रतिनिधीला सांगितले. बचाव पक्षाने आपला ५२ पानाचा लेखी युक्तिवाद व मौखिक दोन्ही युक्तिवाद पूर्ण झाला, असेसुद्धा बचाव पक्षाचे वकील अँड. सोने यांनी सांगितले. यासंबंधात सरकारी वकील अँड. दीपक वैद्य यांना विचारले असता त्यांनी बचाव पक्षाच्या युक्तिवाद पूर्ण झाला असून, प्रतिउत्तर देण्यासाठी दि. १५ जानेवारीला न्यायालयासमोर आम्ही आमची बाजू मांडू, असे त्यांनी प्रतिनिधीस बोलताना सांगितले. यावेळी या खटल्यातील प्रसिद्ध विधितज्ज्ञ अँड. उज्ज्वल निकम हे न्यायालयात हजर होते. तर अँड. भूपेंद्र सोने यांना अँड .शुभांगी कुंभारे (कोसरे), अवंती सोने, सुदीप मेर्शाम यांनी सहकार्य केले.