"काळजातल्या जाणिवांची सोनोग्राफी " हा डाॅ.विजयकुमार माने,मिरज.यांचा कविता संग्रह नुकताच विजयादशमीला प्रसिद्ध होऊन माझ्या वाचण्यात आला. डाॅ.विजयकुमार माने लेखनातील सिद्धहस्त कवी, गायक, चारोळीकार त्यापेक्षा नाती कशी जपावी हे सरांकडूनच शिकावे. मंद स्मित हास्यरेषेने समोरच्यांना क्षणात आपलंसं करत, आदराने सर्वाशी संवाद साधत, मनात गुरूविषयी नितांत आदर बाळगत प्रसंगी मनातला आदरभाव व्यक्त करत कवितेच्या रुपाने काळजातील जाणिवा सोप्या शब्दात व्यक्त करत, मराठी साहित्यात आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करत ,कोणाच्याही मदतीला धावत जाऊन माणुसकीचा रेशीमधागा जपणारा कवी. वाचन आनंद "सारांश "च्या रुपाने देणारा कवी.
कविता बाजारात विकत घेता येत नाही आणि कवितेशिवाय जगताही येत नाही. टीचभर पोटासाठी मनातल्या मंतरलेल्या शब्दफुलांना कोषात न झाकता काव्यास जिवंत ठेवत प्रतिभाच्या साह्याने काव्यप्रवास करणारा कवी होय. या कविता संग्रहात एकूण एक्काहत्तर कविता आहेत. विविध विषय, आशय, कवितेचे प्रकार आपणांस आढळतील. अभंग, अष्टाक्षरी, लावणी, सामाजिक जाणिवाचे गीत, प्रेम, सुखदुःख, जीवनातील मनास बोचणारे विचार अशा विविध विचारांची मानवी हृदयात पेरणी करत माणसात देव आहे, दानवही आहे आणि मानवही आहे म्हणून माणसाने माणसाशी मानवतेने वागावे, विकृती, संस्कृती, प्रकृती, निसर्गावरचे आक्रमण ,जाती-धर्मातील रणकंदन, स्त्रियांचे स्फुंदन शब्द रुपाने मांडत, जीवनातील अनुभव सांगत कवितेत रमणारा डाॅक्टर. कारण डाॅक्टरांच्या नजरेत वस्त्र, शस्त्र, प्रेम, कणव, भक्ती, प्रणव, हृदय, लाज, माज, इशारा, पहारा, जुळतं, जळतं, सुख, चूक, दुःख, भूक, चूल, मुल, कळी, फूल, भाषा, आशा आशा काळजातील अनेक जाणिवांची सोनोग्राफी प्रकट करीत आपले वेगळे अस्तित्व निर्माण करीत कवी म्हणतो,
असं म्हणत माणसातला देव शोधत, देवमाणूस व्हायचं ठरवत, देवाची क्षमा मागत, देवपणाचे बाजार भरवण्यावर आसूड कवी ओढतो. वाचकाशी नाते जोडत, मनाला जास्त ताण न देता विजयकुमार यांच्या रचना, स्वभाव, भेट, आठवण, भाव, चिंता, हुरहुर, दु:ख अशी मनाची अनेक रूपे घेऊन जीवनार्थ लावत कवितेचा भाव व स्वभाव सहज घेऊन येतात. ही कवी विजयकुमार माने सरांची जमेची बाजू आहे. त्यांच्या अनेक कविता वाचतांना हृदयपटलावर अस्मितेच्या रेषा अधिक स्पष्ट दिसतात. केशव देशमुख म्हणतात,*"आभाळाच्या वरच्या गप्पा ठोकणारे आणि खाली पाताळातलं कातळ दाखवणारे कवी जनतेचे कवी नसतात. वास्तवातील दाहकता आणि साध्या माणसांची मूळ वेदना घेऊनच कवितेला शब्द देणारा खरा कवी असतो. "* हे तंतोतंत विजयकुमार माने सरांना लागू होते. त्यांनी आपल्या व्यवसायिक अनुभव व जीवनातील सर्वसामान्याच्या अनुभवाची जाण आहे म्हणून लेखन भाव राखत कविता अवतरतात म्हणूनच ते म्हणतात,"समाज आणि वैद्यकीय सेवा यांना जोडणारे दुवे म्हणजे दान, मग ते रक्त दान असो, नेत्रदान, अवयवदान असो की दुग्धदान. असा विविध आशय समाजमनापर्यंत पोहचवण्याचे कार्य कविता करते, प्रसारमाध्यमांनी त्याला जनमानसापर्यंत पोहोचवण्यास मदत केली आणि त्यातून जनजागृती मी प्रत्यक्षपणे अनुभवली आहे." हा संग्रह वाचतांना या म्हणण्याची सत्यता पटते. माणसांच्या जीवनाला भावनांचे नाव आहे, वाळवंटी गाव आहे, चांदण्याचे रुप,काजव्यांची हाव, कोकिळेचा सूर, पोपटाला भाव,जीर्ण कपड्यातले राबणारे हात, जाकीटधारी साव, याच्या मालकांच्या जाणिवांनी सोसतांना वेदनेचा घाव, यामुळेच माणसाला वाचवण्यासाठीच कवी कविता करतो असे स्पष्ट सांगत म्हणतात,
हास्यमळे फुलवतो पण माळरानी चिमण्या नजरेस पडत नाहीत त्यावेळी कवीचे मन बेचैन होते.
असे म्हणत कारखान्याच्या "चिमण्या "मात्र जिकडे तिकडे घूर ओकत असणा-या दिसत आहेत अशी खंत उपरोधाने व्यक्त करतात. आभाळ आणि आकाश यातील फरक कळण्यासाठी अंत:करण भरून यायला हवे. केव्हातरी फुलासवे बोलावे, पाण्यात खेळावे, वा-यासवे डोलावे, दवात न्हावे, चंद्रास पहावे, कानाला, पानाला, रानाला हळूच खेटावे, मृगासवे पळावे, खगासवे उडावे, तृणासवे लोळावे, बोटांनी, ओठानी, कंठाने माळरानातले सुख अनुभवाचे. असे सांगत काळजी, चिंता, नैराश्य, चिडचिड, मानसिक ताण, जगण्यातील आनंदाचे सोपे मार्ग कवी कवितेत मांडतो. याच विचाराच्या जोरावर संसाराचे वादळवारे सहज पेलण्याची शक्ती मिळेल आणि हेच त्यांच्या काव्य लेखनाचे प्रयोजन असावे. "कवायत" या ते कवितेत म्हणतात,
म्हणूनच निराश मनानेसुध्दा हाताच्या तालावर डोलले पाहिजे. भावनांच्या जीवघेण्या रंगमंचावरी कवी हसत अभिनय करतो. हेच जीवनाचे खरे सूत्र आहे हा भाव कवितेतून प्रकट करतात. कारण कालचे दुःख विसरून उद्याच्या कुपीत आज ते रंग भरत आहेत. फिनिक्सच्या जिद्दीने उद्याचे जग कवीला काबीज करायचे आहे. पानगळच सांगते निसर्गाच्या प्रेमाची बीज घेऊन कवी जीवनाच्या पायवाटेने चालतांना म्हणतो,
असे नमूद करत खेड्यातील वाडे रिते होत आहेत, त्या जागी सिमेंटकॉक्रीटच्या इमारती होत आहेत ही खंत त्यांना सतावते. पायवाट ओली होते,
संसार बंदीशाळा वाटू लागतो. आंधळ्याच्या नगरीत आपण उगीच आरसे विकतो आहेत असे त्यांना वाटते. पण त्याचबरोबर नदीच्या काठावर घर असावं असंही त्यांना मनापासून वाटते,
त्यांना वाटतं आपला पाया न्यायी असावा, अन्यायाला झुगारून घटनेचे हक्क उपभोगता आले पाहिजेत, शत्रूशी लढतांना हिमायलाबरोबर सह्याद्रीही वाचवायला हवा, अबलेचे अश्रू पाहून आपली मान खाली झुकते आहे अशा नराधमांना वेळीच वठणीवर आणायला हवे, अत्याचार पाहून रक्त सळसळते सहनशक्तीचा अंत होतो. अशा शत्रूचे पानिपत करायला हवे. असे उद्ववेगाने कवी सांगतो. या विषयीची मनातील खंत कवी समर्पक शब्दांत मांडतात. म्हणूनच कवयित्री वर्षा चौगुले म्हणतात, "या संग्रहात अभंग रचला आहे , मुक्तछंद वेचला आहे. पावसात भिजला आहे, प्रेमावर बोलला आहे, आपल्या मायबोलीवर असणारी श्रद्धा, देशप्रेम, सैनिकाबद्दलची आस्था, जीवनाबद्दलचे आशावादी विचार, महापूर, कोरोना यांसारख्या आलेल्या आपत्ती या सगळ्या -सगळ्यांवर लिहिताना कवी स्वतःसुद्धा कवितेच्या माध्यमातून बोलतो. हाच कवीच्या संवेदनशील मनाचा आरसा आहे."
या कवितासंग्रहाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे या संग्रहातील पाच-सहा लावण्या आपले लक्ष वेधून घेतात. यात शब्दांना घुंगरू बांधून लय साधण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असाच आहे. कंबर, शेकोटी, नजरेचा बाण, झाडावरचे पोळे या लावण्या वाचत असतांना त्यातील लय मात्र कवीने सोडली नाही. शृंगारात कोठेचं वावगी शब्दपेरणी न करता या लावण्यातील ठसकेबाजपणा राखत, वाचतांना कळत नकळत पाय थिरकायला लावतात. त्यावेळी लिहिणारा एक डाॕक्टर आहे याचा विसर वाचकांना पडतो.
या कविता संग्रहातील *"काळजातल्या जाणिवा, हेरंब, गुरुकृपा, सरोगेट मदर, मराठी, अवयवदान, मानवी दुग्धपेढी, सांगली नगर वाचनालय, रमाई माऊली, सैनिक, बाप, तिरंगा, गुरु, बापू, आरोग्याचे ऋतुचक्र, मतदान, बाबासाहेब, शर्विलक, छत्री, नजरेचा बाण, माणसा माणसा जागा हो, अमर प्रेम या कविता पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा आहेत. या कवितेत लय, यमक, विषय, परिसर, जीवन याचा चांगला वापर केला आहे.
प्रत्येक कवितेला साजेल असे रेखाटन हे ही या कविता संग्रहाचे वैशिष्ट्य आहे. ही चित्रे कवितेचा भावार्थ सुलभ करुन कवितेला साज चढवतात. रेखाचित्रे खुद्द कविनेच केली आहेत. मुखपृष्ठ कवी डाॅ.विशाल इंगोले सरांचे असून ते अतिशय समर्पक असे आहे. ते कवितासंग्रहातील कवितेची जाणिव करुन देणारे आहे. तसेच मलपृष्ठ डाॅ.विशाल इंगोले सराचेच असून त्याच्या शब्दकाफिल्यात सोबत करणारे असलेने फारच अप्रतिम आहे. कवितासंग्रहांची अर्पणपत्रिका गुरुचा आदर करणारी असून
अशा शब्दांत उल्लेख करीत प्रोत्साहन, लेखनकलेतला आत्मविश्वास, जीवनातील धडपडीचे गणित, माझा विद्यार्थी असा जीवनातील वाटचालीतला वाटा याचा उल्लेख खुबीने करत कै.गो.बा.कामत सर, कै.वसंतराव आगाशे सर, कै.अरविंद परचुरे सर, कै.काशिनाथ वाले सर या गुरुजनांना सविनय अर्पण करुन त्याच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असाच आहे तसेच कवयित्री वर्षा चौगुलेची अतिशय उत्तम अशी प्रस्तावना या संग्रहास लाभली आहे. जेष्ठ कवी प्रा.भीमराव धुळुबुळु सर व राजन लाखे सर विश्वस्त, अ.भा.मराठी साहित्य महामंडळ यांच्या सदिच्छा समर्पक अशाच आहेत. "अक्षरदीप प्रकाशन व वितरणचे प्रा.वसंत खोत सर,कोल्हापूर यांनी येथून कविता संग्रह प्रकाशित झाला आहे .या कवितासंग्रहाचे सर्व साहित्यिक आस्थेने स्वागत करतीलच. डाॅ.विजयकुमार माने सरांकडून साहित्य सेवा घडो अशी अपेक्षा करुन त्यांच्या लेखनासाठी शुभेच्छा देतो.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या