Header Ads Widget

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आग; ११ मृत्यू

    अहमदनगर:अहमदनगर जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागून त्यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात ही आग लागली असून रुग्णांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या विभागात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते. हे सर्व रुग्ण कोरोनाबाधित होते. मृताच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत राज्य सरकारने जाहीर केली असून आगीच्या दुर्घटनाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश दिले आहेत.

    या आगीबद्दल अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिदक्षता विभागात १७ रुग्ण उपचार घेत होते. या विभागातल्या एसीला आग लागली. बचावकार्यादरम्यान विभागातला ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे तसेच आगीमुळेही गुदमरुन काही जणांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. या रुग्णांचा मृत्यू आगीमुळे होरपळून झाला की गुदमरुन झाला याची सखोल चौकशी करण्यात येईल. तसेच मृतांच्या परिवाराला आवश्यक ती मदत केली जाईल.

    जिल्हय़ाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही आपण घटनास्थळी भेट देणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, मी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून मी काही दिवसांपूर्वीच सूचना दिल्या होती. जे कोणी या घटनेमध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. तसेच मृतांच्या परिवाराला मदत देण्यात येणार आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.

-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या