Header Ads Widget

आज एसटी संपाबाबत निर्णय

    मुंबई : ऐन दिवाळीमध्ये सुरू झालेला एसटी कर्मचार्‍यांचा संप सुटेल अशी आशा निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडून एसटी कर्मचार्‍यांना ४१ टक्के पगारवाढ या महिन्यापासून जाहीर केली आहे. राज्य सरकारने अंतरिम वेतनवाढीच्या प्रस्तावाला एस. टी. कर्मचारी शिष्टमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे मागील तीन आठवड्यांहून अधिक काळ एसटी बंद आहे. संप मागे घ्यायचा की नाही, याबाबतचा निर्णय गुरुवारी (२५ नोव्हेंबर) घेऊ, असे संघटनेने म्हटले आहे.

    एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी ठाकरे सरकारने ऐतिहासिक पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विलिनीकरणाबाबत हायकोर्टाने नेमलेल्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर सकारात्मक निर्णय घेऊ, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांनी संप मागे घेऊन गुरुवारपासून कामावर हजर राहावे, असे आवाहन केले आहे. त्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व करणारे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावर जात कर्मचार्‍यांशी संवाद साधला.

    यावेळी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत म्हणाले की, सरकारसोबत आज आमची बैठक झाली. परंतु कर्मचार्‍यांसोबत रात्रभर चर्चा करू. आजचा मुक्काम आझाद मैदानात करू, गुरुवारी संपावर निर्णय घेऊ. सरकारने दिलेला प्रस्ताव आम्ही सविस्तर ऐकून घेतला. आझाद मैदानात कर्मचार्‍यांशी चर्चा करून भूमिका जाहीर करू असे आम्ही पत्रकार परिषदेत सांगितले. कुठल्याही कर्मचार्‍यांनी वेगळे मत मांडू नये. जो निर्णय घ्यायचा आहे तो विचार करून घ्यायचा आहे. सकाळी एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर निर्णय घेऊ, अशी माहिती त्यांनी दिली.

-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या