Recent in Technology

Advertisement

Breaking News

"चिरांगन २०२१ : समाज भान, ग्राम जीवन आणि व-हाडी बोलीचं प्रतिबिंबं !"

    चिरांगन२०२१ हा व-हाडी बोलीभाषीक दिवाळी अंक हाती पडला आणि जमेल तसा वाचून काढला . व-हाडी बोलीतील कवी आणि लेखक असल्याने सहाजिकच वाचनाची ओढ निर्माण झाली . व-हाडी बोलीचे जतन करणे आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने व-हाडी साहित्य मंचाने सुरू केलेल्या या उपक्रमाचे स्वागत केलेच पाहिजे . काही मोजकेच दिवाळी अंक बोलीतून निघतात . त्यापैकीच एक महत्वाचा म्हणजे चिरांगन . हा अंक व-हाडी बोलीत असल्याने वैशिष्ट्यपूर्ण आहे . सामाजीक जाणीवेतून, व-हाडातील ग्रामीण संस्कृती व जीवन अधोरेखीत करण्याचा या अंकाने प्रयत्न केला आहे . या संपूर्ण अंकातील लेख, कथा,कविता, चारोळ्या,अनुभव,व-हाडी बोली जतनाच्या अनुशंगाने घेतलेल्या उपक्रमाचा व केलेल्या कार्याचा संपूर्ण आढावा व-हाडी बोलीत आहे . अलिकडे व-हाडी बोली लेखक व कविता लेखनाची संख्या ब-यापैकी वाढलेली दिसते. हे अखिल भारतीय व-हाडी साहित्य मंच व त्याचेशी जुळलेल्या लोकांच्या परिश्रमाचे फलीत म्हणावे लागेल.

    याबाबत अंकाचे संपादक पुष्पराज गावंडे आपल्या संपादकीय लेखात चळवळीचं ध्येय विषद करतांना म्हणतात... "सबनाईशी कायम सख्य ठेवत आपून हे व-हाडी मायबोलीची सेवा करत हाव. व-हाडी बोलीची सेवा हाच आपला सर्वात मोठा मेवा हाय ! जास्तीत जास्त रसिक,वाचक,लेखक,कवी जोळनं अन् चळवळ वाळोनं, लोकाभिमूख करनं हेच आपलं ध्येय आहे." त्याचप्रमाणे मंचाचे अधयक्ष श्याम ठक व-हाडी बोली जतनाच्या व वाढविण्याच्या निमित्ताने केलेल्या प्रयत्नाबाबत लिहीतात... " २०१५ साली व-हाडी साहित्य व बोलीभाषा संवर्धन संस्थेची स्थापना करून त्या अंतर्गत अखिल भारतीय व-हाडी साहित्य मंच सुरू केला . व-हाडीवर प्रेम करनारे साहित्तिक, रसिक एका जागी आनले. बरेच लोक व-हाडी लिहन्यात कमी पडत होते. त्यायच्यासाठी व-हाडी लिखान कार्यशाळा घेतल्या. काव्य लेखनस्पर्धा, लिखान ते सादरीकरनाचा प्रवास सुरू झाला. लिहिलेलं कुठंतरी छापून यावं हा हेतू मनात आला. सबनाईच्या लेखनाले पेपरवाले काई जागा दिवू शकत नाई म्हणून लेखकायच्या लेखनाचा सन्मान व्हावा, थे साहित्य समाजापुढे यावं या हेतूनं २०१८ साली चिरांगनची निर्मीती झाली .! " आणि या पद्धतीने तेव्हापासून हा चिरांगनचा प्रवास निरंतर सुरू आहे.

.

    यातील कथा,लेख,कवितेचा आढावा घेतांना प्रा. देव लुले हे " व-हाडी बोलीचे सौंदर्यस्थळं अधोरेखीत करनारे चिरांगन " असल्याचं मत व्यक्त करतात . तर मंचाचे उपाध्यक्ष निलेश कवडे हे २०१८ सालापासून मंचाच्या वतीने राबविल्या जाणा-या विविध उपक्रमाचा सविस्तर आढावा घेतांना आपल्या लेखात दिसतात. साहित्य संमेलने, कार्यशाळा, काव्यस्पर्धा, मुलाखत,स्तंभलेखन, व-हाडधन अँप, व-हाडरत्न पुरस्कार, साहित्तिकांचा गौरव, कानोसा व-हाडी न्यूज पोर्टल, पुस्तक प्रकाशन, व-हाडी बोलीभाषा दिवस, व-हाडी साहित्यावरील आँनलाईन चर्चा, इत्यादी उपक्रम नियमीत सुरु असल्याचे लिहीतात.

    या अंकात संपादकीय लेख, अध्यक्षीय मनोगत, व-हाडी बोलीची सौंदर्यस्थळं, व-हाडी बोलीतील उपक्रम व वाटचाल याबाबत ४ व धनंजय दातार यांचा स्वकथनपर १, असे ५ लेखआहेत .एकूण ३६ कथा आहेत . ५५ कविंच्या कविता आहेत,१ चारोळी आणि १ पत्र असे साहित्य आहे. यातील सौ. बोर्डे अलका दत्तात्रेय यांची 'गर्भार कायीज' ही स्त्रीच्या जीवनातील वांझपणाचं दुःख मांडणारी कथा, मंगलसींग जी. राठोड यांची माणुसकी जपणारी 'संत-या' ही कथा, सौ.रंजना कराळे यांची ' अंगार ' धनदांडग्यांकडून गरीबाचे आयुष्य उद्धवस्त करणारी कथा, सु.पुं.अढाऊकर यांची ' बैल जवा बोलते 'ही मुक्या जनावराची, बैलाची आत्मकथा, 'दीवाईचा सन अन् ते काई रात' ही कु. प्राची मोहोड हीची दुःखद प्रसंगाचे वर्णन करणारी कथा, योगेश मोरखडे यांची 'श्रीमंत फकीर' ही एका भिका-याच्या ठायी मुक्या प्राण्यांविषयी असलेली अपार करुणा दर्शविणारी कथा, दीपक सरप यांची, घरच्या अठराविश्वे दारिद्र्यातही शिक्षण घेऊन अधिकारी बणून स्थीती पालटणारी धाडसी 'सुमी'. या सर्व कथा वाचकांच्या काळजात घर करून जाणा-या, सामाजीक जाणिवेच्या व समाजभान जपणा-या भावस्पर्शी कथा मनाला हेलावून टाकणा-या आहेत. तर वैभव इंगळेयांची 'कोरोना योद्धा आणि समाज', सुनील लव्हाळे यांची 'लाँकडाऊनची सुट्टी', संजीवनी भोगावकर यांची 'अवं बाई बी एक शक्तीच असते', निशा डांगे यांची 'लाँकडाऊन', वैशाली गतफणे यांची लस घेण्यासाठी उभ्या' या कथा कोरोनाकालीन लाँकडाऊनमधील अनुभव व गमती जमती कथन करणा-या कथा आहेत.

    मनोज मेंडके यांची 'आँनलाईन प्रेम', प्रकाश गायकी यांची 'पस्तावा', आणि कु.तन्वी वाघ हीची ' लेक ' या तिन्ही कथा मुला-मुलीच्या लग्नाच्या चुकीच्या निर्णयामुळे होणारा पश्चाताप अधोरेखीत करणा-या आहेत. तसेच रामदास गायधने यांची 'नरबळी' , साधना काळबांडे यांची 'वाडा' व विद्या राणे यांची 'मुंज्या ' ,शालिनी बेलसरे यांची 'त्या वळणार' या कथा समाजमनातून अंधश्रद्धा व त्याविषयीची भिती दूर करण्यास मदत करतात . नितीन वरणकर यांची ' आतेभाऊ मामभाऊ' ही विनोदातून देशभक्ती जागविणारी कथा आहे, तर प्रविण बोपूलकर यांची कथा नातेवाईकांची वर्गवारी करून त्यांचे वर्तन अधोरेखीत करते. प्रविण सोनोने यांची 'वस्ताद' ही कथा एका धाडसी व्यक्तिमत्वाचा परिचय करून देते. अरुण विघ्ने यांची ' म्या निसर्ग बोलतो गा भाऊ !' ही कथा बदललेल्या निसर्गचक्रामुळे मानवावर ओढोवलेल्या संकटाला दोषी कोण ? मानव की निसर्ग ? याविषयी संवादात्मक कथा आहे. उत्सव आणि संकटातही आपला फायदा बघणा-या काही कृतघ्न व्यक्तिरेखा असतात. यातील गमतीजमती मांडणा-या आणि बोध घेणा-या राजेश काटोले यांची 'धुयमाती' ,अशोक उघडे यांची 'आठोनीतले दाजीबा' आणि अजय माटे यांची गनपती मंडळ' या कथा लक्षवेधी आहेत. तसेच काही जिवाला जीव देणारे दोस्तही असतात, हे मांडणारी अजय राऊत यांची 'गन्या' ही कथा. ग.मा.उगले यांची 'संजू', दिपकराज खवशी यांची' लाळका बाप अन् बापाची' आणि 'पुरनाची पोई' ही आबासाहेब कडू यांची कथा. आई-वडील आणि संतान यांचेविषयीची आपुलकी,माया,जिव्हाळा मांडणा-या कथा आहेत. विजय पळसपगार यांची 'गोटी आंबा' ही मानवाचं झाडावरील प्रेम मांडते. सौ.अनुराधा धामोडे यांची 'असं घळतं' ही ग्राहकांना सजगतेचा इशारा देते तर पवन वसे यांची 'कृषीप्रधान देश' ही कथा या शब्दातील विरोधाभास दर्शविते. रवींद्र दळवी यांची 'सांगा बापू..! तुमच्या देशात हे !' ही कथा आपण काही न करता दुस-याकडे बोट दाखविणा-या संधीसाधू लोकांस चपराक आहे. तर सौ. मीना फाटे या समाजातील बलात्कारी प्रवृत्तीच्या मानसांनाच्या नावे पत्र लिहून मुलींना जपण्याचे आवाहन करतात.

    यास्तव डाँ.प्रतिमा इंगोले, विजय ढाले, शशांक देशमुख, का.रा.चव्हाण, माधुरी चौधरी, निलेश देवकर, किसन मानकर, रविंद्र महल्ले यांच्या कविता व-हाडीचा महीमा गातात तर डाँ.विठ्ठल वाघ, नितीन देशमुख, रविंद्र दळवी,सौ.अनुराधा धामोडे,डाँ.सतीश तराळ, प्रा.मोहन काळे,बच्चू गावंडे, निलेश कवडे, सौ.रजनी देशमुख, कु.निकिता नराजे, अनमोल चरडे, वनिता गावंडे, गणेश सोळंके, सौ.आश्विनी घुले, कु.स्नेहा गावंडे, युवराज टोपले, डाँ. रावसाहेब काळे,जावेद खान, श्याम ठक, तुकाराम काटे,संजय नेमाडे ,किशोर बळी ,नरेंद्र वाकोडे,प्रवीण चांदोरे यांच्या कविता माय, बाप, बायको ,मुलगा, लेक, माती, कास्तकारी, पेरणी, पाऊस,दीवाई,माहेर गरीबी,दमनी, तनकट,नदी,झळी, या ग्रामीण जीवनाशी संबंधीत,जगण्याचे व संस्कृतीचे विषय मांडतात. खुशाल गुल्हाने यांची रचना मंचाच्या कार्याचा आढावा घेते तर विजय बिंदोड यांची कविता गाडगेबाबांचं माणुसपण अधोरेखीत करते. विनायक काळे देशप्रेम मांडतात, हर्षा वाघमारेची कविता कुळ आणि जातीवर भाष्य करते. यास्तव आणखीही साहित्य आहे. त्याचा उल्लेख जागे अभावी करता आला नाही . एकूणच हा अंक सर्वसमावेशक आहे , वाचनीय आहे, बोधप्रद व प्रबोधनकारी आहे . ग्रामीण जीवन व व-हाडच्या चालीरीतींना जिवनदान देणारा आहे. थोडक्यात सामाजीक भान राखून ग्रामीण जीवन आणि बोलीचे जतन करणारा हा साहित्याचा संग्रही ठेवावा असा ठेवा आहे.

    -अरुण विघ्ने
    वर्धा
    Mob. No.9881854477

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code