अमरावती : मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत असून, त्यात विशेष शिबिराचे आयोजन दि. 13 व 14 नोव्हेंबरला (शनिवार व रविवार) करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. आयोगाच्या निर्देशानुसार दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मतदार नोंदणी संदर्भात विशेष मोहिमांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार प्रथम 13 व 14 नोव्हेंबरला आणि त्यानंतर 27 व 28 नोव्हेंबरला विशेष शिबिरे होतील.
मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मतदान केंद्रावर शिबिरांच्या दिवशी मतदार नोंदणी, नावात बदल, पत्त्यांत बदल, नाव कमी करणे आदी मतदार नोंदींसंबंधी कामांची सुविधा उपलब्ध असतील. छायाचित्रासह मतदार यादी अद्ययावत होण्यासाठी संबंधित सर्वांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीमती कौर यांनी केले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या