Header Ads Widget

अद्ययावत वीज उपकरणांनी शासकीय कार्यालयांच्या वीज देयकांत बचत

    अमरावती : ऊर्जा संवर्धन तंत्रज्ञान प्रकल्पाद्वारे शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारतींमध्ये वीज बचत होण्यासाठी पूरक व अद्ययावत उपकरण प्रस्थापित केल्यामुळे मोठी वीज बचत होत असल्याची माहिती ‘महाऊर्जा’चे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल व. तायडे यांनी दिली.

    महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाकडून शासनाच्या सहकार्याने ऊर्जा संवर्धनास चालना देण्यासाठी ऊर्जा संवर्धन तंत्रज्ञान पथदर्शी प्रकल्प योजना राबवली जाते. पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी प्रथमतः ऊर्जा परीक्षण केले जाते. ऊर्जा परीक्षण अहवालानुसार प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी निधी दिला जातो.

    या प्रकल्पांतर्गत अमरावतीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांना 25 लक्ष, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालयाला 2 लाख 77 हजार 328 रूपये निधी देण्यात आला. त्याचप्रमाणे, महाराष्ट्र प्राणी आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत पुसद (यवतमाळ) तालुक्यातील वरूड येथील दुग्ध व तंत्रज्ञान महविद्यालय येथे 7 लाख 87 हजार 428 रु. व पारस औष्णिक वीज केंद्र येथे 25 लक्ष रू. निधी महाऊर्जाकडून वितरीत करण्यात आला. या सर्व प्रकल्पांमिळून 8 लाख 13 हजार 77 एवढी कि. वॅट प्रति वर्ष ऊर्जा बचत झालेली आहे.

    प्रकल्पाच्या माध्यमातून जुने ट्यूबलाईट, दिवे, पंखे व वातानुकूलित यंत्रे बदलवले जातात. त्याऐवजी ऊर्जा कार्यक्षम ट्यूबलाईट, दिवे, पंखे व वातानुकूलित यंत्रे लावले जातात. त्यामुळे बचत होते. ऊर्जा देयकांची रक्कम रोडावून अत्यल्प रक्कम अदा करावी लागते. वीजेचा पुरवठा सुरळीत राहतो. ऊर्जा कार्यक्षम उपकरणे आस्थापित केल्यामुळे ऊर्जा बचतसुद्धा झालेली असून त्यामुळे ऊर्जा बचतीच्या राष्ट्रीय कामास हातभार लागला आहे, असे प्रकल्प अधिकारी हर्षल काकडे यांनी सांगितले.

(Images Credit : ekmat)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या