Header Ads Widget

पारनेर साहित्यरत्न पुरस्कार संजय पठाडे यांना जाहीर

पारनेर : पारनेर तालुका कवी मंचातर्फे दरवर्षी  कै. रावसाहेब अण्णा ठुबे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पारनेर साहित्यरत्न पुरस्कार यावर्षी संजय पठाडे सर यांना जाहीर करण्यात आला आहे .  पारनेर तालुक्यातील साहित्यक्षेत्रात उल्लेखनीय योगदान असणाऱ्या व्यक्तीचा आपल्या मातीत सन्मान व्हावा आणि तालुक्यातील नवोदित लिहित्या हातांना प्रेरणा मिळावी , या उद्देशाने गेल्या 3 वर्षांपासून हा पुरस्कार प्रदान केला जातो . याआधी साहेबराव ठाणगे सर आणि स्वातीताई ठुबे या पुरस्काराच्या  मानकरी ठरलेल्या आहेत .
2021 - 22 या वर्षासाठी निवड समितीने बैठक घेऊन तालुक्यातील साहित्यिक चळवळीत सक्रिय , दर्जेदार साहित्य संपदा व नवोदितांना मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्त्व अशा विविध बाबींचा विचार करून  एकमताने  संजय पठाडे सर यांचे नाव निश्चित केले .  संजय पठाडे सर हे राळेगणसिद्धी येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत असून विविध साहित्यप्रकारांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे . विशेषतः गझल प्रकारात राज्यस्तरावर त्यांचे नाव अग्रस्थानी आहे .
शालेय गीतमंच,  कलाशिक्षण,  कलासमर्पण ,स्वातंत्र्याची दुसरी लढाई, आज़ादी की दुसरी लड़ाई,  New Freedom Struggle, माहितीच्या अधिकाराचा प्रदीर्घ लढा हि त्यांची प्रकाशित पुस्तके असून  कलाशिक्षण ,निर्भय बनो मासिक ,कला गौरव ,साहित्य साधना दिवाळी अंक , माय अशा विविध मासिक व वार्षिक अंकांचे त्यांनी संपादन केले आहे . याशिवाय 10 पुस्तकांची अक्षरजुळणी आणि 12 पुस्तकांची मुखपृष्ठे त्यांनी रेखाटली आहेत . शालेय , महाविद्यालयीन व नवोदित तरुण यांना साहित्य व  कला क्षेत्रात मार्गदर्शनासाठी नेहमी तत्पर असे हे व्यक्तिमत्त्व . 
दि. 3 जानेवारी 2022 रोजी साहित्यरत्न पुरस्कार वितरण सोहळा व सालाबादप्रमाणे राज्यस्तरीय  काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन पारनेर तालुका कवी मंचाच्या वतीने करण्यात आले आहे . तरी सर्व साहित्यप्रेमींनी या पारनेर काव्य महोत्सवात सहभागी व्हावे , अशी विनंती पारनेर तालुका कवी मंचाच्या वतीने करण्यात येत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या