Header Ads Widget

आता औरंगाबादमध्ये पेट्रोल पंपावर मिळतेय लस

    औरंगाबाद : विदेशात अनेक ठिकाणी कोरोनाची तिसरी लाट येऊन धडकली असताना लसीकरण हा एकमेव पर्याय सध्या जगासमोर उपलब्ध आहे. त्यामुळे राज्यात सर्वच जिल्हय़ात लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे. तर, याच पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद शहरात आता पेट्रोल पंपावरच लसीकरणाची सुविधा देण्यात येत आहे.

    औरंगाबाद जिल्हय़ातील लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी काही दिवसांपूर्वी प्रशासनाने 'नो वॅक्सिन, नो पेट्रोल' असे आदेश काढले होते. त्यामुळे पेट्रोल घेण्यासाठी येणार्‍या प्रत्येक ग्राहकाने लस घेतली की नाही याची खात्री करूनच पेट्रोल देण्यात येत होते. मात्र ज्यांनी लस घेतली नाही त्यांना पेट्रोल दिले जात नव्हते. पण आता थेट पेट्रोल पंपावरच लसीकरण उपलब्ध करुन दिले आहे. पेट्रोलपंपावर लस मिळत असल्याने नागरिकांना याचा फायदा होत आहे.

    औरंगाबाद पेट्रोल पंप असोसिएशन आणि औरंगाबाद जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवारपासून शहरातील जवळपास सर्वच पेट्रोल पंपवर लसीकरण कॅम्प लावण्यात आले आहे. तर पेट्रोल घेण्यासाठी आलेल्या ज्या ग्राहकांनी लस घेतली नाही त्याला जागेवरच लस घेण्याची सुविधा उपलब्ध होत असल्याने लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पेट्रोल पंपवर लसीकरण उपलब्ध करून देण्याचा हा देशातील पहिलाच उपक्रम ठरला आहे.

    सुरवातीला औरंगाबाद जिल्हय़ात लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काही कठोर नियमांची घोषणा केली. लस असेल तरचं पेट्रोल, किराणा, रेशन, दारू आणि इतर सुविधा मिळतील असे आदेश काढले. त्यानंतर काही पेट्रोल पपं आणि इतर दुकानांवर कारवाई सुद्धा केली. त्यामुळे कारवाईच्या भीतीने व्यवसायिक आदेशाचे पालन करू लागले आणि सुविधा मिळत नसल्याने नागरिक ही लस घेण्यासाठी पुढे येऊ लागले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या