अमरावती : अमरावती वनवृत्तांतर्गत मेळघाट (प्रादेशिक) वनविभागातील धारणी व सुसर्दा वनपरीक्षेत्रात 21 नोव्हेंबर रोजी रेबीजग्रस्त ‘लांडगा’ या वन्यप्राण्याने या परिसरातील प्रौढ व्यक्ती, लहान मुले यांना हात, पाय व चेहऱ्यावर चावा घेऊन जखमी केले आहे. त्यात सुसर्दा वनपरीक्षेत्रातील दोन व्यक्ती व धारणी वनपरीक्षेत्रातील दहा व्यक्ती जखमी झाले आहे. त्यामध्ये आठ प्रौढ व्यक्ती व चार लहान मुलांचा समावेश आहे.
याबाबत वनविभागाला माहिती मिळताच तात्काळ धारणी व सुसर्दा वनपरीक्षेत्रातील वनपरीक्षेत्र अधिकारी, सर्व वनाधिकारी, कर्मचारी यांनी जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात भर्ती करुन त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. सर्व बाधित रुग्णांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आले होते. सर्व रुग्णांना ॲन्टी रेबीज लस देण्यात आली आहे. बारा जखमी रुग्णांपैकी अकरा रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुटी देण्यात आली आहे. एका लहान बालकावर उपचार सुरु आहे.
रेबीजग्रस्त लांडगा जखमी होऊन धारणी वनपरीक्षेत्रातील टेंबली गावाजवळ मरण पावला. ही घटना माहिती झाल्यापासून वनविभागाचे वनाधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष गावात भेटी देऊन जनजागृती केली. बाधित गावातील क्षेत्रात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.
वनविभागाने धारणी व सुसर्दा परीक्षेत्रातील कर्मचाऱ्यांची चमू तसेच सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा व अमरावती वनविभाग येथील शिघ्रकृती पथकाचे सहकार्य घेतले आहे. वनविभाग या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. या प्रकरणी भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून यांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे. याबाबत मुख्य वनसंरक्षक श्रीमती जयोती बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही सुरु आहे.
घटनेबाबत स्थानिक आमदार राजकुमार पटेल यांना विभागीय वन अधिकारी (दक्षता) यांनी प्रत्यक्ष भेटून घटनेबाबत आणि करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांना माहिती देण्यात आली आहे. बाधित क्षेत्राच्या आजूबाजूच्या वनविभागास दक्षता घेण्याची सूचना देण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता काही अनूचित प्रकार आढळल्यास त्वरीत वनविभागाला कळवून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य वनसंरक्षक विभागीय वन अधिकारी (दक्षता) यांनी केले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या