अमरावती : कोरोना प्रतिबंधक लसीकरण अद्यापही न झालेल्या कर्मचा-यांचे लसीकरण करण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात येणार असून, सर्व कार्यालयप्रमुखांनी त्यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, कुटुंबिय यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेचे सहायक आयुक्त योगेश पिठे यांनी केले आहे.
तसे पत्र पालिकेच्या सहायक आयुक्तांनी सर्व कार्यालयांना पाठवले आहे. ‘हर घर दस्तक’ मोहिमेत प्रभावी लसीकरणासाठी प्रयत्न होत आहेत. महापालिका क्षेत्रात लसीकरण शिबिरे आयोजिण्यात येत आहेत. महापालिकेच्या क्षेत्रातील सर्व कार्यालये, त्यातील कार्यरत अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लसीकरण अद्यापही न झालेल्या कर्मचा-यांची माहिती उपलब्ध करून देण्याची विनंती श्री. पिठे यांनी कार्यालयप्रमुखांना केली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील नगरपालिका, ग्रामपंचायती व इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांनी लसीकरण मोहिमेसाठी चांगला पुढाकार घेतला आहे. गावोगाव जनजागृती, लोकशिक्षण व लसीकरणासाठी स्वयंसेवक कार्यरत आहेत. ज्येष्ठ, दिव्यांग यांना घरोघर जाऊन लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. बहादूरपूर येथील वयाची शंभरी पूर्ण केलेले आजोबा मिठूजी सोरगे यांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरण पथके गावोगाव कानाकोप-यात पोहोचून लसीकरणाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत.
नांदगावपेठेत लसीकरण जनजागृतीसाठी चिमुकल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींची रॅली लक्षवेधी ठरली. चिमुकल्यांनी लसीकरणाबाबत उत्साहात घोषणा देऊन प्रभावी जनजागृती केली. महिला संघटना, स्वयंसेवी संस्थाही विविध उपक्रम राबवत आहेत. नागरिक त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या