Recent in Technology

Advertisement

Breaking News

संदीप वाकोडे सरांचा 'किनारा'...

  आदरणीय, *संदीप वाकोडे सरांचा 'किनारा' हा गझलसंग्रह वाचला एकूण 87 एकाहून एक सरस अशा गझल त्यांनी रचलेल्या आहेत. गझलांची वैशिष्ट्य म्हणजे 87 पैकी 78 गझलांचा शीर्षक फक्त एकाचं शब्दाचा आहे. नऊ गझलांचे शीर्षक दोन शब्दांचे आहेत. त्यांच्या गझल *मानवी स्वभाव, आंबेडकरी तत्त्वज्ञान, राजकारण, मैत्री भावना, बुद्ध धम्म, भारताचे संविधान* इत्यादी सर्व विषयांना न्याय देणार्या आहेत. आपल्या गझल मध्ये ते म्हणतात-

  'शब्द माझे पाळण्याचे ठरवले मी, जिंदगीला जाळण्याचे ठरवले मी, लागलो गझले तुझ्या नादात जेव्हा, विस्तवावर भाळण्याचे ठरवले मी .'शेर लीहीण्या मी मला बेभान करतो, गझले साठी या जिवाचे रान करतो. थांबते दारात माझ्या रात्र जेव्हा, चांदणे माझे तिला मी दान करतो. इतकी मेहनत घेऊन ते आपली गझल तयार करतात. इतके प्रेम ते आपल्या गझलेवर करतात. ते म्हणतात 'नको विचारू गड्या मला अर्थ गझलेचा, येतो - जातो तिच्याच साठी उरात ठोका जिवंत आहे. 'त्यासोबतच माणसांच्या स्वभावाला फाटा देऊन स्वतःच्या अंतरीचा आवाज ऐकण्यासाठी ते प्रेषितांनाही टाळण्याचे ठरवतात. आपल्या जीवनाचा उद्देश ठरवतांना ते 'माणसावाणीच यावे, माणसांनी एकमेकांशी हमेशा पेश आता.

  'असा मानवतेचा संदेश देतात. ते आपल्या काळजाला सांगतात 'असो जाती-धर्मात कोणत्याही ,त्याला नसावा कोणी वावडा. ' जगाला जिंकायचे असेल तर ते असा संदेश देतात की 'जर तुला जिंकायचे आहे जगाला, प्रेम नुसते ठेव तु भात्यात आता .कारण 'धावलो मागे किती दौलतीच्या, शून्य उरले शेवटी खात्यात आता. 'कधीकधी लोकांच्या स्वभावाचा तिटकारा येऊन ते म्हणतात 'लोक बहिरे भोवताली खूप येथे, बोलण्यापेक्षा बरे आम्ही चूप येथे' परंतु शब्दांची ताकद लक्षात घेऊन ते लगेच म्हणतात 'ही कशी वेगळी वादळे अंतरी, शब्द आता नाही थांबवण्यासारखे. प्रेम आहे जिथे आज एकमेकांवर, त्या घराला म्हणून नोंद घेण्यासारखे.

  आपल्या आशादायी गझलांमध्ये समाजातील युवकांना दिशा देतांना ते म्हणतात 'आशा कधी सुखाची सोडू नये , कुणीही दुःखात कोणत्याही मोडू नये. कुणीही जातो अधोगतीला आपल्यामुळेच, आपण खापर कधी जगावर फोडू नये. 'कुणालाही आपली उन्नती करायची असेल तर त्यासाठी आपणच झटले पाहिजे हा संदेश ते देतात.

  त्यांच्या गझलेचा ग्रामीण जीवन हा सुद्धा एक विषय आहे. आपल्या गाव या गझलेमध्ये हल्लीच्या गावाचे वर्णन करतांना 'गावकीचा सापडेना ठाव आता, बिघडले माझे किती हे गाव आता. लागली नाती तुटाया काळजाची, भावनांचा संपला वर्षाव आता. असा ग्रामीण जीवनात झालेला बदल सांगताना ते आपल्या ग्रामीण बांधवांना साद घालतांना व धीर देतांना ते म्हणतात ' ध्येय सुंदर तुझ्या अंतरी पाहिजे, आणि विश्वास कष्टावरी पाहिजे. तो आणला आजच चौकात तू ,धर्म आपापला जो घरी पाहिजे .'अशा या गझलकारांना हाऊस कशाची आहे तर 'ती नसे हारण्याची, नसे जिंकण्याची. गड्या हौस आहे मला, झुंजण्याची. त्यांची गझल कशासाठी आहे तर ते सांगतांना म्हणतात 'किती आज नाती दुभंगून गेली , लिहू गझल आता मने सांधण्याची. जीवनाची बाराखडी सांगताना ते म्हणतात 'खुप झाले धावणे, थांबून घे .जीवनाला निसटत्या, समजून घे. खेळ सारा औटघटकेचा गड्या, भेटलेले क्षण तुझे वेचून घे. फक्त जमले दान घेणे तुला, धन्यता देण्यात आहे जाणून घे.' हरवलेले शोधतो बाहेर, अंतरंगी एकदा शोधून घे.'

  रमाईचा त्याग सांगताना ते म्हणतात 'लिहून विस्तवाचा शृंगार तू रमाई, केलास वादळाचा संसार तू रमाई. सूर्या समान होते भिमराव तळपणारे, हृदयात झाकलेला अंगार तू रमाई. घनघोर संकटांशी लढलीस जिंदगीभर, हटली कधी न मागे झुंजार तू रमाई. देऊन खूप गेली पण बोललीच नाही, त्यागातल्या सुखाचा संस्कार तू रमाई. जळली दिव्याप्रमाणे वस्तीत शोषितांच्या, मिटवून टाकलेला अंधार तू रमाई.

  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणा भारतीयांचे जीवन सुखी समृद्ध करण्यासाठी जो संघर्ष केला त्यासाठी ते म्हणतात ' सन्मान आमचा भीमा, अभिमान भिमराया गावु तुझे किती मी गुणगान भिमराया. उपटून विषमतेची पाळेमुळे विषारी, केलेस शोषितांचे ऊत्थान भिमराया. झाला कधीच नाही होणार ना कधीही, दुनियेत श्रेष्ठ अवघ्या विद्वान भिमराया. कितीक जीवघेणे आघात शोषले पण, नाही सोडले तू मैदान भिमराया. देणे असे दिले तू नाही कमी कशाची, होता किती अनोखा धनवान भिमराव. ' गझलकारांचे हे शब्द इतके सोपे आणि मनात ठसणारे आहेत की आपल्याला कोणत्याही प्रकारचे विश्लेषण न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष आणि त्यांचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगून देतात.

  आपले जीवन समृद्ध आणि सुखी करण्यासाठी ते बुद्धाच्या संदेशाची आठवण करून देतात आणि म्हणतात 'जीवनाला चला करू समृद्ध आता, अंगीकारून शांत शीतल बुद्ध आता. आग क्रोधाची विनाशाकडेच नेते, दे जरा सोडून हा क्रोध आता. मार्ग टाळ दुर्गुणांचा दुःखदायी, ध्यास ठेव सद्गुणांचा शुद्ध आता. रक्तपाताने भले झाले कुणाचे, इतिहासातले शोध तू युद्ध आता. अटळ आहे झिजणे वयपरत्वे, तू नको होऊ मनाने वृद्ध आता. ते म्हणतात ' वैरभाव मारण्या बुद्ध पाहिजे , या जगास तारण्या बुद्ध पाहिजे. भेटतो उजेड अज्ञान सोडता, ज्ञान अंगीकारण्या बुद्ध पाहिजे.

  आपणा भारतीयांच्या अस्मितेचा आणि हक्काचा उद्घोष करणारे आपले संविधान गझलकारांच्या शब्दात ते म्हणतात 'स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा उद्घोष , संविधानाचे एकमेव होते दुनियेत साऱ्या निर्दोष. संविधानाचे अंतरी फक्त भारतीयत्व विविधतेतही ऐक्य भावना मानवी मूल्यांचा चिरंतन जयघोष संविधानाने सर्वांना समान हक्क अधिकार दिलेत म्हणून ते म्हणतात 'संधी सर्वांनाच सारखी, नाहीच थारा विषमतेला.

  संस्कृतीचा सन्मान करते, विकृतींना अटकाव करते, ज्ञाना संगे विज्ञानाचा परिपोष संविधान आमचे. आपल्या प्रगतीची ग्वाही देतांना विश्वासाचा ध्वज उभारते चक्र फिरवते प्रगतीचे, हे लख्ख उजेडाच्या विजयाचा जल्लोष, संविधान आमचे. 'अशा सर्व विषयांना न्याय देणारा आणि मानवतेचा विकास साधण्यासाठी सर्वतोपरी परिपूर्ण ज्ञान देणारा असा हा *'किनारा'* गझल संग्रह यातील प्रत्येक गझल आपल्याला उद् बोध दिल्याशिवाय राहात नाही. त्यांच्या अनेक गझल काही गीतकारांनी गायलेल्या सुद्धा आहेत .*आदरणीय संदीप वाकोडे सरांना या गझल संग्रहा निमित्ताने अभिनंदन ‼️🌹🌹🌹त्यांचा गझलेचा प्रवास असाच चालू राहो आणि आम्हाला एका पेक्षा एक वरचढ गझल वाचायला व ऐकायला मिळो. हीच मनोकामना कामना..!

  -जी.डी. इंगोले,
  प्रतिक नगर, मुर्तीजापुर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code