Recent in Technology

Advertisement

Breaking News

चार दिसाचे माहेरपण..

  ओढ माहेरा लागता
  धाव घेती पुढे पाय
  वाट तान्ह्या वासराची
  पाही गाय रुपी माय
  चार दिसाचे माहेर
  देई सुख ते मनास
  जीव विसावतो थोडा
  मिळे आराम तनास
  भावा बहिणीची भेट
  ताई मारी घट्ट मिठी
  ओल नात्यात पाझरे
  होती आप्त भेटीगाठी
  पाय माहेरी पडता
  वाहे आठवांचा पूर
  मन होऊन बेभान
  भुतकाळी मारी सूर
  माहेरचा गार वारा
  देई अल्हाद गारवा
  मन प्रसन्न करतो
  बा चा शिवार हिरवा
  ताट आयते समोर
  वाढी भावजय खास
  लेक माहेरात खाई
  आनंदात चार घास
  मामा सांभाळीतो भाचे
  मिळे बहिणीस शांती
  थोड्या दिसात माहेरी
  तिची उजळते कांती
  चार दिसाचा विसावा
  फक्त माहेरात मिळे
  जन्म नारीचाच घ्यावा
  तेव्हा त्यास अर्थ कळे
  आई बाप होती खिन्न
  लेक निघता सासरी
  प्रश्न विचारती एक
  कधी येशील माघारी
  -युवराज गोवर्धन जगताप
  काटेगाव ता. बार्शी
  जिल्हा सोलापूर
  8275171227
----- (Images Credit : Deshonnati)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code