अमरावती : हरभ-यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, तसेच उगवण योग्यपद्धतीने व एकसारखी होण्यासाठी हरभऱ्याची पेरणी प्रायमिंग व बीजप्रक्रिया करूनच करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
प्रायमिंग करण्यासाठी 50 लिटर कोमट पाण्यात 50 ग्रॅम बाविस्टिन टाकून द्रावण तयार करावे व त्यात 20 किलो हरभरा बियाणे दोन तास भिजवत ठेवावे. त्यानंतर हे बियाणे 22 ते 24 तास मोकळ्या हवेत सुकवावे. दुसऱ्या दिवशी जैविक जिवाणू संघ व ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. यामुळे मर व मूळकुज या रोगास प्रतिबंध होतो व हरभरा रोपांची चांगली वाढ होते.
त्याचप्रमाणे, अधिक उत्पादनासाठी पेरणीनंतर 30 ते 35 दिवसानंतर हरभऱ्याचे शेंडे खुडावे. त्यामुळे फळफांद्याची संख्या वाढते. यावर्षीच्या रबी हंगामामध्ये शेतकरी बांधवांनी कमी खर्चाच्या या बाबीचा अवलंब करून हरभऱ्याचे उत्पादन वाढवावे, अशीही सूचना जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या