औरंगाबाद : सोमवारी शहरात झालेल्या महिला सरपंच परिषदेत बोलताना शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची जीभ घसरली आणि त्यांनी ग्रामसेवकांच्या बाबतीत बोलताना अपशब्द काढले. मात्र यावरून राज्यभरातील ग्रामसेवकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या वक्तव्याचा निषेध केला आहे. मंगळवारी राज्यभरातील ग्रामसेवकांनी एक दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले. तसेच आमदार संजय शिरसाट यांनी समस्त ग्रामसेवक वर्गाची माफी मागावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली. तसेच समाजात ग्रामसेवकांबद्दल गैरसमज निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल शिरसाट यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही ग्रामसेवकांच्या वतीने करण्यात आली आहे.
औरंगाबादमध्ये सोमवारी महिला सरपंच परिषद झाली. यावेळी बोलताना आमदार संजय शिरसाट म्हणाले, एक लक्षात ठेवा, सगळ्यात भामटा माणूस असेल तर तो ग्रामसेवक आहे. तो तुम्हाला कधी मूर्ख बनवेल, हे सांगता येत नाही. तो तुमचे ऐकतो असे दाखवेल, पण बाहेर गेल्यास सरपंचांच्या सांगण्यावरून केले असे सांगत स्वत:च्या अंगावर काही येऊ देत नाही. त्यामुळे महिला सरपंचांनी त्यांच्यापासून दूर रहावं, असा सल्ला आमदार शिरसाट यांनी यावेळी दिला.
ग्रामसेवकांबद्दल आपण असे वक्तव्य का केले, असा प्रश्न आमदार शिरसाट यांना पत्रकारांनी विचारला. तेव्हा मात्र शिरसाट यांनी सारवासारव केली. काही ग्रामसेवक चांगले काम करत असतील मात्र मला आलेल्या अनुभवावरून मी ते वक्तव्य केले. यावर मी ठाम आहे, असेही आमदार शिरसाट म्हणाले. त्यामुळे राज्यभरातील ग्रामसेवकांनी शिरसाट यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मंगळवारी राज्यभरातील ग्रामसेवकांनी एक दिवसीय कामबंद आंदोलन केले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या