सजगता बाळगा; लसीकरण पूर्ण करून घ्यावे – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

    अमरावती : कोविड रूग्णांचे प्रमाण कमी झाले असले धोका संपलेला नाही. काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत असून, प्रशासन व आरोग्य यंत्रणा सुसज्ज आहे. त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही. तथापि, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमपालन करून सजगता बाळगावी, तसेच अद्यापही लस न घेतलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनानेही आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांची स्क्रिनिंग आदींबाबत सूचना केल्या आहेत. राज्य शासनाकडूनही याबाबत पुरेशी खबरदारी घेण्यात येत आहे. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या घटल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे. तथापि, गाफील राहून चालणार नाही. नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे. प्रभावी लसीकरणासाठी जिल्ह्यात मोहिम हाती घेण्यात आली आहे. ठिकठिकाणी शिबिरे होत आहेत. अद्यापही लस न घेतलेल्या नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन लसीकरण करून घ्यावे.

    प्रशासनानेही या पार्श्वभूमीवर रूग्णालयातील सुविधांचा आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी. आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवावी. सोशल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायझर या त्रिसूत्रीचे पालन सर्वत्र व्हावे. पुन्हा साथ येऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न व नियमपालन करणे आवश्यक आहे. यादृष्टीने प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांनी लसीकरण मोहिमेबरोबरच सातत्याने जनजागृतीपर उपक्रमही राबवावेत, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.