विभागीय ग्रंथालयात सौर विद्युत प्रकल्पामुळे वीज बचत

    राज्यातील ग्रंथालयांसाठी प्रकल्प ठरला पथदर्शी

    अमरावती : विभागीय ग्रंथालयात ‘महाऊर्जा’च्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीकडून 10 किलो वॅट क्षमतेचा पारेषण संलग्न सौर विद्युत प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून, त्यासाठी सुमारे साडेसहा लाख रूपयांचा निधी नियोजन समितीने दिला. राज्यातील ग्रंथालयांसाठी हा प्रकल्प पथदर्शी ठरला आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    या ऑगस्ट 2020 मध्ये कार्यान्वित प्रकल्पातून निर्माण होणारी वीज नक्त मापन प्रणालीद्वारे महावितरणला देण्यात येते. यामुळे वीज देयकांमध्ये बचत होऊन शासकीय विभागीय ग्रंथालयाचे वीज देयकामध्ये मोठी बचत होत आहे. अमरावतीचे विभागीय ग्रंथालय अशाप्रकारचा प्रकल्प राबविणारी महाराष्ट्रातील प्रथम संस्था आहे. वीजेच्या देयकांत बचत होत असल्याने वीज देयके थकित राहण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कोविडकाळातही प्रकल्पामुळे वीज सुरळीतरित्या कार्यान्वित असल्याचे शासकीय ग्रंथपाल राजेश पाटील यांनी सांगितले.

    या प्रकारचे प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय ग्रंथालयामध्ये राबविण्याचे ग्रंथालय संचालनालयाचे नियोजन आहे. त्यासाठी नोडल अधिकारी म्हणून श्री. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभागाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अधिकारी सागर काळे व हर्षल काकडे यांनी योगदान दिले.

(Images Credit : Sakal)