* प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय परिपूर्ण नियोजनाच्या सूचना
* उद्दिष्ट गाठण्यासाठी आणखी प्रयत्नांची गरज
अमरावती : जिल्ह्यात आरोग्य व विविध विभाग,अनेक पथकांच्या समन्वयाने लसीकरणाचा वेग वाढला आहे. तथापि,उद्दिष्टपूर्तीसाठी आणखी थोड्या प्रयत्नांची गरज आहे. सर्वांनी एकजुटीने व पुढील आठवड्याचे परिपूर्ण नियोजन करून लसीकरण वाढवावे,असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले.
लसीकरण वाढविण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली असून,त्यासाठी सर्व विभागांसह विविध क्षेत्रातील संस्था,संघटना,मान्यवर यांचेही योगदान मिळत आहे. सर्वांचे प्रयत्न व योगदान कौतुकास्पद असून,यापुढे अधिक व्यापक व नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले.
दरम्यान,सर्व तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांना लसीकरणाबाबत सुस्पष्ट सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तालुक्याचे आताच्या उद्दिष्टापेक्षा25टक्क्यांनी जास्त उद्दिष्ट ठेवण्यात यावे व त्यानुसार टीम चे नियोजन करण्यात यावे. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्दिष्टापेक्षा काम कमी होत आहे त्यांना जास्त प्रमाणात फोकस करून नियोजन करण्यात यावे. मागील सात दिवसाचे कामकाज तपासावे. उद्दिष्टपूर्तीकरिता जास्त लोकसंख्येचे गाव निवडून त्या गावांमध्ये एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी सत्र नियोजित करून शंभर टक्के उद्दिष्ट प्राप्त होईल याची नियोजन करावे,अशी सूचना करण्यात आली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी यांनी पुढील सात दिवसाचे लसीकरण सत्रांचे परफेक्ट नियोजन करावे. प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय लसीकरणाच्या शिल्लक असलेल्या एन्ट्री तातडीने पूर्ण कराव्यात. मोबाईल लसीकरणाचे वाहनाला एक दिवसाचे कमीत कमी चारशे ते पाचशे उद्दिष्ट द्यावे,असेही निर्देश देण्यात आले आहेत.
ज्या भागात जास्त प्रमाणात प्रतिसाद कमी आहे त्या भागात मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेऊन त्यांचे सहकार्याने सत्र आयोजित करावे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला किमान हजार इतके उद्दिष्ट द्यावे ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्दिष्ट पूर्ण होईल त्या टीम इतर प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांच्या सेवा अधिग्रहित कराव्या,अशाही सूचना तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत,असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.