- आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नामुळे आदिवासी बांधवांना मिळाला दिलासा !
मोर्शी : जगभरात कोरोनाने थैमान घातले असतांना लॉकडाऊनमुळे आदिवासी कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार व मोलमजुरी मिळणे बंद झाल्याने जीवन जगण्याचा प्रश्न बिकट झाला आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुर्गम, अतिदुर्गम भागातील आदिवासी जनतेची होणारी उपासमार लक्षात घेऊन राज्यात खावटी कर्ज योजना तात्काळ सुरु करावी अशी मागणी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लावून धरली.
आमदार देवेंद्र भुयार यांनी आदिवासी बांधवांच्या उदरनिर्वाह प्रश्नाकडे लक्ष वेधून खावटी कर्ज योजना सुरु करण्याची विनंती केली होती. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी विकासमंत्री के सी पाडवी, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना विनाविलंब खावटी कर्ज योजना सुरु करण्याची मागणी केली असता यावर तात्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार देवेंद्र भुयार यांना दिले होते.
आदिवासी बांधव हे उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करिता शेजारील राज्यात व परराज्यात स्थलांतरित होतं असतात.बहुतांशी आदिवासी बांधव आदिवासी दुर्गम, अतिदुर्गम, दऱ्याखोऱ्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असून अनेक निराधार, वृध्द लाभार्थी असून पावसाळ्यात रोजगार अभावी उपासमार टाळण्यासाठी वरुड मोर्शी तालुक्यातील खावटी कर्ज मंजूर प्रकरणे मंजूर करण्यात आली असून वरुड तालुक्यात ४३३५ खवटी कर्ज वाटप प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यापैकी ३२५१ खवटी कर्ज प्रकरणामध्ये ६५ लक्ष २ हजार रुपये वाटप करण्यात आले असून मोर्शी तालुक्यामध्ये २९५६ प्रकरणे मंजूर करण्यात आली असून २७८० खवटी कर्ज प्रकरणामध्ये ५५ लक्ष ६० हजार रुपये वाटप करण्यात आले असून या सर्व लाभार्थ्यांना जीवणावक्षक वस्तूची किट लवकरच वाटप करण्यात येणार आहे. वरुड मोर्शी तालुक्यातील ७२९१ आदिवासी बांधवांना १ कोटी २० लक्ष रुपये वाटप करण्यात आल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला असल्यामुळे वरुड मोर्शी तालुक्यातील आदिवासी बांधवांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.
देशात व राज्यात कोरोनाचे संकट उभे राहिले असून राज्यातील आदिवासी शेतकरी शेतमजूर अडचणीत आला आहे . मोर्शी वरुड तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव असून त्यांना रोजगार नाही , उत्पादन नाही त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी वरुड मोर्शी तालुक्यातील ७२९१ खावटी कर्ज प्रकरणे निकाली काढून १ कोटी २० लक्ष रुपये वाटप करण्यात आले असून खावटी कर्ज योजना आदिवासी बांधवाना संजीवनी ठरणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.