मातृभाषेला लागलेली उतरती कळा..!

भारतीय परंपरा जपणारी, भारतीय संस्कृतीचे जाण असलेली माय मवाळ मराठी भाषा.

मातृभाषेबद्दल असणारा आदरभाव व्यक्त करताना ज्ञानेश्वर म्हणतात,
“माझा मऱ्हाटीचि बोलु कवतुके परी अमृताते ही पैजेसी जिंके॥’
पूर्वी सर्व मुले मराठी भाषेतून शिकत होती व त्यानेच ती मोठी नामवंत झाली. ब्रिटिश काळात इंग्रजी भाषा आली. त्या ब्रिटिशांनी स्वतःच्या फायद्याकरता तिला भारतात स्थान दिले. पण भारतीय हळुहळू एवढे भाळले की त्यांना तिची गोडी लागली. पूर्वी मोजक्याच इंग्रजी शाळा होत्या पण सध्या मराठी शाळांची स्थिती एवढी खालावलीय की सरसकट सगळेच इंग्रजीच्या आहारी गेलेत. रोष इंग्रजी भाषेवर नाही. भाषा वेगवेगळ्या जाणून शिकून घ्याव्याच पण मराठीकडे एवढे दुर्लक्ष नको ना!
अरे मुलांना जरी इंग्रजी माध्यमात घातलं तरी मातृभाषा का दुरावता. घरी तरी ती बोली भाषा जागृत ठेवा ना! आज भाषेची सर्वांनी मिसळ केली आहे. मराठी बोलतांना बहुतांश शब्द तुम्ही हिन्दी इंग्रजी वापरतात. कुणी भेटलं तर नमस्ते बोलायचे सोडून तुम्ही हाय आणि बाय बोलता. प्रत्येक ठिकाणी तुम्ही इंग्रजी भाषा घुसवता. तुम्हाला इंग्रजी येत नाही तरी तुमच्या मुलांना इंग्रजीचाच हट्ट का? त्या पोरांच्या डोक्यात ती भाषा शिरत नाही. आणि त्या करता तुम्ही पोट मारून पैसै साठवता व मुलांना भारंभार फिच्या शिकवणीला टाकता! कुणी सांगीतला एवढा उपद्व्याप? का एवढा अट्टहास?
का मराठीचा असा दुसवास? प्रत्येक पावलो पावली मराठीचा अपमान करतात. अरे तुम्ही माय मराठीची लेकरं तिचा मान ठेवत नसाल तर बाकीचे परके तिची इज्जत कशी काय ठेवतील !
आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून
मुक्त होऊन सत्तरी ओलांडली तरी ही इंग्रजी भाषेने आपल्या देशात भक्कम पाय
रोवले आहेत. आज अनेक पालक मुलांना इंग्रजी शाळेत घालतात. उच्च शिक्षण मराठी भाषेतून उपलब्ध नाही हे खरं आहे. तरी पूर्वी प्राथमिक शाळा मातृभाषेतून शिक्षणास प्राध्यान द्यायचे. त्यामुळे शिक्षणाचा पाया मजबूत व्हायचा. पहिली ते चौथी पर्यंत मातृभाषेत शिक्षण घेतल्याने मुलांना
आपले विचार व्यक्त करणे सोपे जात होते. मातृभाषा ही ज्ञानभाषा झाली तर शिक्षण
सुलभ व्हायचे. विषयांचे आकलन मुलांना सोपे व्हायचे. आणि त्यामुळे ती आदान प्रादान मोकळ्या मनाने करायची. आपल्या मातृभाषेतुन त्यांना व्यक्त होता येत होतं. त्याकाळी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून घेऊन मुले उच्च स्थराला पोचली. आपले भारतीय मोठमोठे शास्त्रज्ञ, डॉक्टर, मातृभाषेतूनच सुरवातीचं शिक्षण घेऊन नामवंत झाले. याचा अर्थ असा नाही की परकीय भाषा शिकू नये, परकीय भाषा जरुर शिकाव्यात, त्याही भाषांचा आदर करावा, पण आपण आपल्या
भाषेला कमी मानू नये. आजचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. संपर्क-क्रांतीचे युग मानले जाते. अशा वेळी आपण
आपल्या दैनंदिन जीवनात अशाच छोट्या
छोट्या कृतींनी आपली भाषा प्रभावी कशी करावी ह्यावर विचार करावा. आपल्या भाषेचा मनात अभिमान बाळगून कृती करून तिची शान कशी शाबूत ठेऊ ह्यावर विचार करायला हवा. तरच मराठीची उन्नती होईल.
भाषेसाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या सक्रिय
कार्यकर्त्यांना आपल्या परीने त्यांना सहकार्य देऊन मातृभाषा सर्वोसर्व कशी प्रज्वलीत होईल हे पहायला हवे.
आपली मातृभाषा सर्वोतोमुखी असावी ह्या
करता पुढाकार घेऊन ‘भाषा संवर्धन आणि प्रसार कार्यक्रम’ आयोजित करावे.
बऱ्याच ठिकाणी मराठीला डावलून इंग्रजीच्या आहारी जाता. येथे थोडा बदल करा आणि बघा.
तुम्ही दैनंदिन जीवनात रोज किमान १०, १५ वेळां तरी फोन घेतात अन् दुसऱ्यांस लावतात. समोरचा माणूस एक वेळ इंग्रजी बोलत असेल तर हरकत नाही पण जेव्हा समोरचा शुध्द मराठी बोलतो तेव्हा तुम्ही ही मराठीच बोला. “नमस्ते”, “माफ करा ” “हरकत नाही” परत सांगाल कां जरा” किती आर्तता आहे बघा ह्या शब्दांत. बाय पेक्षा “येतो हं ” किती गोडवा आहे ह्या शब्दांत बघा. तसेच मोबाईल संदेश ही आपण माझ्याच भाषेतून करा. ते सर्वांना नीट ही कळेल.
तुम्ही आज सर्वच ठिकाणी इंग्रजी वापरत आहात . सर्वांनाच इंग्रजी ठीक येतं असंही नाही. तरी पण जन सामान्यात असा ग्रह झालाय की इंग्रजी दोन शब्द फेकले की त्यात तिचं समाजात स्थान उच्च गणलं जातं. पण हे साफ चूक आहे. माणसाची विद्ववत्ता त्याच्या दोन शब्द बोलण्यावरून ओळखता येते. उच्च अथवा श्रीमंतीचा डौल हा मेकप अथवा कपड्यावरून नाही तर भाषा प्रभूत्वावर असतं. तुम्हाला माहितच आहे आपले स्वामी विवेकानंद. भाषा कुठलीही असली तर ती शुध्दच बोलायला हवी.
मराठी श्रीमंत भाषा आहे. प्रत्येक प्रांत
आप आपल्या भाषेला जपतात, मान सन्मान देतात. तसा मराठीला तो मिळावा असे मला वाटले तर त्यात गैर काय बरं!
तुम्ही तुमच्या मुलांना कुठल्याही माध्यमात घाला पण एकच कळकळीची विनवणी. घरी तुम्ही मुलांशी मातृभाषेतूनच बोला. मुलांवर संस्कार बिंबवायचे तर रामायण, महाभारत, मनाचे श्लोक, गीतेचे श्लोक हे मुलांना शिकवा. लक्षात ठेवा, शिवबा छत्रपती झाला तो फक्त त्यांच्या मातोश्रींमुळे. बालपणी जे बाळकडू माँसाहेबांनी पाजले, त्यामुळे. मुलांना सगळ्या भाषा शिकवा आणि तुम्ही ही शिका. पण तुमच्या मवाळ मातृभाषा मराठीला कधीच विसरू नका. ती जतन करा. मुलांना आपला इतिहास पहिल्यांदा कळू द्या. मुलांना ग्रंथालयात न्या. त्यांना वाचनाची गोडी लागू द्या. त्याकरता पहिल्यांदा घरातल्या मोठ्यानों तुम्ही सवयी लावा. मग मुलांना आपसूकच वाचनाची गोडी लागेल.
घरात एक, बाहेर दुसरे असे करू नका. मराठी माणसांकडे मराठीच बोला. भाषेचा गोडवा टिकू द्या. मुलांच्या वाढदिवसाला केक कापाच पण मराठी संस्कृती औक्षणाची विसरू नका. सूटबूट घालाच पण सण वारी नऊवारी, धोतर, टोपी घालण्याची परंपरा ही पाळत चला. आपली संस्कृती जपायची तर चांगल्या असलेल्या परंपरा ही जपा.
सरकारने ही शासकीय कामकाज मराठी भाषेतूनच करावे. म्हणजे परप्रांतीय येथे राहत असेल तर त्यास मराठी भाषा बोलायला व लिहायला यायलाच पाहिजे. जेव्हा सगळे एकजुटीने मराठीचा विचार करतील तेव्हाच शांतता लाभेल. शाळा खालावल्या त्या उभारतील. सगळी मराठमोळी माणसें एकत्र येतील व् मुलांचा उत्कर्ष पाहून तुमची माय मराठी धन्य धन्य होईल. नवा संकल्प करा आणि जनता आणि सरकार मिळून एकत्र कामाला लागा आणि मराठीचे सौभाग्य टिकवा.
जय मराठी. जय महाराष्ट्र.
– सो.शोभा वागळे
मुंबई.
8850466717