महिलांना फायब्रोमायल्जयाचा धोका

    फायब्रोमायल्जया नावाचा एक विकार आहे. हा विकार पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक प्रमाणात होतो. ३0 ते ५0 या वयोगटातल्या महिलांना हा विकार जडण्याचा धोका बराच जास्त असतो. ब्रिटनमधल्या एका संशोधनानुसार २५ पैकी एक व्यक्तीला हा विकार होऊ शकतो. ब्रिटनमध्ये १५ ते २0 लाख लोकांना हा विकार झाल्याचं एका आकडेवारीवरून समोर आलं आहे. या विकाराविषयी जाणून घेऊ.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    फायब्रोमायल्जया या विकारात स्नायूंमध्ये प्रचंड वेदना जाणवतात. या अस वेदनांमुळे माणूस अक्षरश कळवळतो. आपल्या मानसिक स्थितीवर याचा परिणाम होतो. या विकारामुळे मेंदूच्या कार्यपद्धतीवरही परिणाम होण्याची शक्यता असते. दुखापत, शस्त्रक्रिया, जंतूसंसर्ग आणि नैराश्यामुळेही ही व्याधी जडू शकते. या विकारात रुग्ण स्वत:वरचं नियंत्रण हरवून बसतो. त्यामुळे अत्यंत धोकादायक असा हा विकार आहे. ही व्याधी पूर्ण बरी होऊ शकत नसली तरी त्यावर औषधांद्वारे नियंत्रण मिळवता येतं.

    अशक्तपणा, थकवा, सततची आजारपणं, झोप न येणं, काळजी, नैराश्य, संवेदनशीलता वाढणं, शरीरात प्रचंड वेदना जाणवणं ही या विकाराची लक्षणं आहेत. या विकाराची नेमक कारणं अजूनही समोर आलेली नाहीत. मात्र हा विकार जडलेल्या लोकांना सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवतो. रात्रीची भरपूर झोप झाली असली तरी त्यांना ताजंतवानं वाटत नाही. या विकारामुळे एकाग्रताही नष्ट होते. आपण एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करू शकत नाही. या विकारामागे अनुवंशिक कारणं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या विकाराचा धोका अधिक असल्यामुळे महिलांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. घरात या विकाराचा इतिहास असेल तर इतरांना तो जडण्याचा धोका वाढतो.

    प्रचंड शारीरिक वेदना आणि अपुरी झोप यामुळे दैनंदिन कामं करताना बर्‍याच अडचणी येतात. दृष्टी अधू होणं, मळमळणं, अचानक वजन वाढणं, चक्कर येणं, सर्दी-खोकल्यासारखी लक्षणं जाणवणं. त्वचेशी संबंधित समस्या, श्‍वसनाशी संबंधित समस्या निर्माण होतात. रूग्णाची लक्षणं बघून मगच उपचार दिले जातात. प्रत्येक व्यक्तीमध्ये या विकाराची वेगवेगळी लक्षणं दिसून येतात.