• Sun. Jun 4th, 2023

महाराष्ट्रातील लघु उद्योजकांच्या उत्पादनाला ग्राहकांची खास पसंती

  * महाराष्ट्रातील लघु उद्योजकांच्या उत्पादनाला आयआयटीएफमध्ये ग्राहकांची खास पसंती
  * महाराष्ट्र दालनाला ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

  नवी दिल्ली : हळद, बेदाणा, मसाले, चामडयाची उत्पादने, बाबुं फर्निचर, पैठणी साड्या, कोल्हापुरी चप्पल आदि महाराष्ट्रातील लघु उद्योजकांच्या उत्पादनांना राजधानीत सुरु असलेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (आयआयटीएफ) देश-विदेशातील ग्राहकांची खास पसंती मिळत आहे.

  महाराष्ट्र शासनाच्या लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने प्रगतीमैदान येथील हॉल क्र. २ मध्ये राज्याचे विद्युत वाहन धोरण, राज्यातील महत्वाचे प्रकल्प, स्टार्टअपची विविध उत्पादने व हस्तकला उत्पादनांनी सज्ज व सुबक असे महाराष्ट्र दालन साकारण्यात आले आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या भारत व्यापार प्रोत्साहन संस्थेच्यावतीने (इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशन)४०व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन केले असून येथे भेट देणाऱ्या देश-विदेशातील ग्राहकांना महाराष्ट्र दालन आकर्षित करीत आहे.

  राज्यशासनाच्या पुढाकारातून देश-विदेशात सांगलीची उत्पादने

  महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्याच्या वांगी येथील लालासो भोसले यांचा हळदी, बेदाणा आणि मिरचीपूड ही उत्पादने असलेल्या स्टॉलवर ग्राहकांची एकच गर्दी दिसते. रास्त दरात गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळत असल्याचा आनंद या स्टॉलहून उत्पादने खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी बोलून दाखवला. या स्टॉलचे प्रमुख लालासो भोसले गेल्या चार वर्षांपासून या मेळाव्यात येताहेत व राज्यशासनाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीमुळे देश-विदेशातील ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने पोहचत असल्याचे समाधान त्यांनी बोलून दाखविले.

  कोल्हापुरी, शाहू व कुरुंगवाळी चप्पलांचा बोलबाला

  महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व उमेदच्या बचतगटांच्या स्टॉलवर कोल्हापुरी चप्पलांसह विक्रीसाठी असलेली वैशिष्ट्यपूर्ण पादत्राणे, वारलीपेंटींग ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. कोल्हापूर येथील सिद्धाई महिला बचतगटाच्या ‘आम्ही कोल्हापुरी चप्पल’ या स्टॉलवर टिपिकल कोल्हापुरी चप्पलांसह कापसी, कुरुंगवाळी, मोजेसेफ, शाहू चप्पल, पेपर कापसी ही पादत्राणेही ग्राहक मोठ्या उत्साहाने खरेदी करीत आहेत. असे ‘सिद्धाई महिला बचतगटा’च्या प्रमुख सीमा कांबळे यांनी सांगितले, २०१६ पासूनच त्या राज्य शासनाच्या ‘उमेद’ अभियानासोबत जोडल्या असून भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात त्या प्रथमच सहभागी झाल्या. जागतिक दर्जाच्या या मेळाव्यात सहभागी झाल्याने एक चांगला अनुभव गाठीशी येत असल्याचा व चोखंदळ ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने पोहचत असल्याचा आनंदही त्यांनी बोलून दाखवला.

  माविमच्या ‘क्रांतीज्योती वारली पेंटींग युनिट’चा वारलीबॅग व गारमेंटच्या स्टॉलवरील आकर्षक उत्पादनेही ग्राहकांच्या पसंतीस पडत आहेत. वारली पेंटींग युनीटच्या रीना जाधव आणि शमसुन्नीसा इकबाल खुटे यांच्या चेहऱ्यावरील आनंदही बोलका आहे. माविमचाच ‘चांदा ते बांदा’ योजनेंतर्गत असलेला चंद्रपूर येथील कारपेट क्लस्टरचा स्टॉल व येथील कारपेट वॉल फ्रेमिंग, बांबुकव्हर डायरीही ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेंतर्गत येथे गडचिरोली जिल्हयातील मोशीखांब येथील प्रतिक्षा हॅण्डीक्रॉफ्टचा स्टॉल आहे, या स्टॉलच्या प्रमुख प्रतिक्षा शिडाम यांनी कुशन कव्हर, लाईट लँप, मॅक्रम, वारली पेंटींग जाकेट आदि उत्पादने विक्रीसाठी ठेवली आहेत. खादी ग्रामोद्योग महामंडळांशी संलग्न औरंगाबाद येथील शुभम लेदर अँड लेदर फोम इंडस्ट्रीनेही चामड्याची आकर्षक उत्पादने विक्रीस ठेवली आहेत. या स्टॉलचे प्रमुख गजानन पुरुषोत्तम हे २००८ पासून खादी ग्रामोद्योग महामंडळासोबत जोडले असून प्रथमच या व्यापार मेळाव्यात सहभागी झाले आहेत . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील ‘वुडीग्रास’ हा बांबु फर्निचरचा स्टॉलही महाराष्ट्र दालनास भेट देणाऱ्या ग्राहक व व्यापाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. वुडीग्रास हा उपक्रम सुरु होवून केवळ एक महिना झाला असून अल्पावधीतच त्यास या आंतरराष्ट्रीय मेळाव्यात आपले उत्पादन प्रदर्शित व विक्री करण्याची संधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे.

  राज्यातील आठ उद्योग समूहांची (क्लस्टर) उत्पादने येथील स्टॉलवर प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत व या सर्व स्टॉल्सला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र दालनात राज्यशासनाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या विद्युत वाहन धोरण, विविध स्टार्टअप, औरंगाबाद औद्योगिक शहर, कोस्टल रोड प्रकल्पाची माहिती देणारे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. दालनात प्रवेश करताच आत्मनिर्भरतेचा संदेश देणारी भली मोठी वज्रमूठ आणि त्याभोवती फिरणा-या खास सायकली, ड्रोन आणि वॉशरुम ओडर फ्री इंस्ट्रुमेंट हे दालनाला भेट देणा-या ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे.

  बृह्नमुंबई महानगर पालिका ,औरंगाबाद औद्योगिक शहराविषयी माहिती देणारा आकर्षक स्टॉल, महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य केंद्रही (मैत्री) या दालनास भेट देणा-या व्यापार व उद्योग क्षेत्रातील मंडळींना आकर्षित करीत आहेत.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *