• Tue. Jun 6th, 2023

भय

    सुरेश रावसाहेबांचा एकुलता एक मुलगा अमेरिकेहून एक महिन्यासाठी आलेला. अगोदर तो तेथे शिकायला गेला होता. तेथल्या कंपनिने त्याला तेथेच नोकरी दिली होती. रावसाहेबांना आणि मम्मीना त्याच्या लग्नाची घाई होती. त्याला कारण ही होते. शैला रावसाहेबांच्या मित्राची मुलगी तिला त्यांनी लहानपणीच सून म्हणून मानले होते. सुरेशची ही ती बालमैत्रीण होती. दोघं ही एकमेकाला आवडत होती. पण रावसाहेबांना भिती वाटत होती. पोरग अमेरिकेला जॉब करणार मग तेथलीच कोण पकडली तर मग शैलाचे कसं होणार? तेव्हा लवकरात लवकर लग्न केलं की आपण दिलेल्या वचनातून मुक्त होऊ. म्हणून चहा घेताना त्यांनी सरळ सुरेशला सांगितले

    “आता सुट्टीवर आलायं तर तुझं आणि शैलाचे लग्न उरकून घेऊ”
    “कां घाई करतात मला सेटल होऊ द्या ना?”
    “त्यात काय लग्न कर आणि शैलाला ही बरोबर घेऊन जा.”

    हो नाही करता शेवटी सुरेश तयार झाला. लगेच पुढच्या आठवढ्याचा मुहुर्त ही काढला. रावसाहेबांचा वाढा मोठा प्रशस्त होता. शहरा प्रमाणे हॉल, कॅटरिंग ची काही गरज गावी लागत नसे. घरासमोर मोठा मांडव घालत. सगळा गाव लग्नातले दोन दिवस जेवत असे.रावसाहेब गावात नावाजलेले व्यक्ती होते. नोकर चाकर भरपूर असल्याने चार दिवसांत मांडव ते आमंत्रण पत्रिता सर्वांना देऊन झाल्या आणि लग्न सोहळा ही मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. नंतर देव देवस्थान ही करून झाले. अमेरिकेला जाण्याची तयारी शैलाने ही केली. सगळं कसं छान झालं होतं.

    एके संध्याकाळी शैला सुरेशला म्हणाली,” आपण जरा नदिकाठी फेरफटका मारून येवू या कां?”
    सुरेश ही लगेच “हां ” बोलला आणि दोघं गप्पा गोष्टी करत नदिकाठी निघाली.
    मे महिन्याचे दिवस असल्याने दिवसभर गरमी असली तरी संध्याकाळी छान वारा वाहायचा त्यात नदिकाठची जागा मग विचारयालाच नको !

    नदिकाठी एक भले मोठे पिंपळाचे झाड होते.लहानपणी गावची सगळी मुलं नदीत पोहायची व नंतर तेथे मस्त वनभोजन करायची त्यात मुलीचा ही सहभाग असायचा. शैला सुरेशने त्या पिंपळाच्या पारावर बसून गप्पा मारायचे ठरवले. बालपणाच्या एक एक आठवणीत दोघं ही रमून गेली सूर्य क्षितिज्या पलिकडे केव्हाच गेला होता आणि अंधारून ही आले होते. अंधाराकडे बघून शैला म्हणाली,” चल रे निघुया आपण”. “थांब गं, परत कधी येणार आपण येथे. बसू थोडा वेळ.” असे म्हणून दोघं पुन्हा आठवणीत मग्न झाली.
    आता काळोख वाढला होता. गावात शहरासारखी विजेची सोय रस्तावर नव्हती.

    बऱ्याच वेळाने शैला भानावर आली आणि तिने घाई घाईने सुरेशला उठायला सांगितले व त्याचा हात पकडून त्याला ऊठवायला लागली तरी सुरेश तटस्थासारखा बसूनच. शैला थोडी घाबरली आणि तिने जोराने त्याच्या हाताला हिस्का दिला सुरेश ऊठला पण एका वेगळ्याच तंद्रीत असल्या सारखा वागू लागला. शैलाने त्याला जवळ जवळ ओढतच आणला. वाटेत तो एक ही शब्द बोलला नाही. त्यामुळे शैला ही जाम घाबरली. घरात शीरताच मम्मी दोघांना ओरडल्या “काय रे किती उशीर ?” तरी सुरेश वेंधळ्या थकल्यासारखा कुठेतरी पाहत, नजरेला नजर न देता उभा राहिलेला. शैलाने त्याला खुर्चीवर बसवले. मम्मी ही त्याच्याकडे पाहून घाबरल्या

    “काय झालयं ह्याला? बोलत का नाही?”
    कोठे गेलां होता तुम्ही?”

    शैलाने सगळे सांगितले. रावसाहेब ही माडीवरून आले. तरी सुरेश तसाच सताड डोळे उघडे ठेऊन. पण नजरेत काहीच भाव नाहीत.आता नोकर चाकर आणि खुद रावसाहेब ही घाबरले. त्यांनी लगेच डॉक्टरना आणायला माणूस पाठवला. डॉक्टर ही लगेच आले. तपासले काही दोष सापडला नाही. तरी त्यांनी त्याला एक इंजेवंशन दिले. “त्याला झोपू दे.मी उद्या सकाळी येतो. पुन्हा उद्या बघू नाहीतर मग शहरात न्यावे लागेल.

    शैला सकट सगळेच घाबरले. म्हातारी नोकराणी रखमा पुढे आली व बोलली.,” मी नजर काढते बाबाची. संध्याकाळी पिंपळाच्या पारावर बसताय होय. ह्या बाबाला माहीत.नाही पण शैलाबायना माहीत हाय ना! बेगिन शान घराला यायचं व्हतं नाय”नजर काढून झाली .भुता खेचराने पकडलं असेल असेही नोकर कुजबुजू लागले. शैला शिकलेले भुता खेचरावर विश्वास ठेवणारी नव्हती तरी अशी परिस्थिती बघून तिच्या ही मनाची घालमेल सुरू झाली. गावात सहसा लोक अशाच गोष्टीवर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे तिच्या ही मनात वाईट विचार येऊ लागले. मम्मी देवघरात बसून देवाची आराधना करायला बसली. रावसाहेब ही फेऱ्या घालू लागले. अशा वेळी शैलाला ही काही सुचेनासे झाले. तिची बैचनी वाढली. मनात्या मनात ती स्वामीचा जप करू लागली.

    रात्री घरात कोणीच जेवले नाहीत.शैला रात्रभर सुरेश जवळ जागत बसली. सकाळी सहा वाजता सुरेशला जाग आली आणि त्यांने “मम्मी ” म्हणून हाक मारली. शैलाच्या जिवात जीव आला. डॉक्टर ही आले त्यांनी पुन्हा तपासले.सगळं नोर्मल. तरी त्याच्या डोळ्यांत तेज नव्हते कोठे तरी कसला तरी विचार करत असावा अशा तऱ्येचे. मुख्य म्हणजे सुरेश बोलत नव्हता शुन्यात नजर लावत होता. डॉक्टरनी त्याला शहरातल्या डॉक्टरना दाखवायला सांगितले.

    रावसाहेब सुरेशला घेऊन शहरात गेले तेथे डॉक्टर आणि मोठ्या मानस शास्त्रज्ञाना पण दाखवले. त्यांनी त्याला दोन दिवस ठेऊन घेतले. सगळ्या तपासण्या करुन झालेल्या. सगळं नोर्मल होतं.शैलाच्या मदतीने डॉक्टरनी त्या दिवशी काय घडले ते जाणून घेतले. त्याच्या बरोबर बोललेल्या सगळ्या गोष्टी तिला सुरेश समजून त्यांना सांगायला सांगितले आणि ते ही सुरेश समोर बसून. शैला सुरेशकडे बोलते तसेच बोलू लागली. ती बोलत असताना डॉक्टर सुरेशकडे सारखे पाहत होते. जेव्हा नदीत पोहण्याची खबर ती सांगत होती तेव्हा सुरेशने थोडी हालचाल केली आणि नंतर तो जोरात “हेमंत” करुन ओरडला. डॉक्टरनी हेमंत कोण सुरेश असं विचारले. तेव्हा तो सरळ सगळं बोलू लागला.

    सुरेश जेव्हा दहा बारा वर्षाचा होता तेव्हा सगळ्या मुलाबरोबर हेमंत नावाचा एक नवख्या मुलगा होता. त्यावेळी तो पाण्यात बुडूत होता हे दृष्य सुरेशने पाहिलेले. तेव्हा तो घाबरलेला आणि पळत घरी आलेला ती गोष्ट त्याने कुणालाच सांगितली नव्हती. आणि नंतर ती गोष्ट तो विसरला ही होता. आणि खरं म्हणजे हेमंत गटांगळ्या खात होता तेव्हा त्याला मोठ्या मुलांनी वाचवला होता. त्याला पाण्यातून आणताना त्याने पाहिलेले. नंतर त्याच्या पोटातले पाणी काढून त्याला वाचवलेले त्याला माहीत नव्हते. नंतर तो लगेच तालुक्याला शिकायला गेलेला आणि त्याने परत काही पोहण्याचे नाव काढले नव्हते.

    काल जेव्हा पोहण्याची गोष्ट निघाली तेव्हा त्याला ती गोष्ट आठवली. तेव्हा ही अशीच सांज आणि अंधार होता. त्या वेळेच्या स्थितीत तो गेल्याने तो प्रसंग त्याला पत्यक्ष घडल्या सारखे वाटले.आणि त्यामुळे त्याची स्थिती तशी झाली होती.
    डॉक्टरनी त्याला काही न झाल्याचे सांगीतले.

    बालपणात घडलेल्या गोष्टीचा आघात आपल्या मनावर झालेला असतो. कालांतराने आपण तो विसरलेलो असतो पण पुन्हा कधी दैवयोगाने त्याच ठिकाणी किंवा तसा प्रसंग नजरेत आला तर आपण भूतकाळात विचार करू लागतो व ती भीती तशी पून्हा उभारून येऊ शकते. सर्वांनाच तसे होत नाही पण,भावूक लोकांना त्रास होऊ शकतो तसा त्रास सुरेशला झाला होता. त्या वातावरणातून सुरेश आता बाहेर आला होता.एक मोठे संकट टळले म्हणून सगळ्यांना हायशे झाले. काही दिवसांनी सुरेश आणि शैला अमेरिकेला रवानी झाली आणि सुखाने संसार करू लागली.

    -शोभा वागळे.
    मुंबई.
    8850466717

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *