• Mon. Jun 5th, 2023

दीपावली उत्सवानिमित्त जिल्हाधिका-यांकडून मार्गदर्शक सूचना जारी

    अमरावती : जिल्ह्यातील समस्त नागरिकांना दीपावली उत्सवाच्या शुभेच्छा देतानाच, कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर पुरेशी दक्षता पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून करण्यात आले आहे.

    दीपावली उत्सवानिमित्त जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोविड साथीचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या दीड वर्षापासून सर्वधर्मीय सण, उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत.कोरोनाची दुसरी लाट ओसरली तरीही धोका संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली धार्मिक स्थळे खुली करण्यात आलेली असली तरीही दीपावली उत्सव घरगुती मर्यादित स्वरूपात राहील याची दक्षता घ्यावी. कपडे, फटाके, दागिने किंवा इतर वस्तू खरेदीसाठी दुकानांत किंवा रस्त्यावर गर्दी होते. नागरिकांनी गर्दी टाळावी विशेषकरून ज्येष्ठ नागरिक व लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. मास्कचा वापर करून सोशल डिस्टन्स पाळावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

    प्रदुषणही टाळा

    दीपावली हा दिव्यांचा, तसेच प्रकाशाचा मंगल उत्सव असतो. या मंगलप्रसंगी फटाक्यांची आतषबाजी वायू व ध्वनी प्रदुषण निर्माण करते. त्याचे विपरीत परिणाम दिवाळीनंतरही अनेक दिवसांपर्यंत दिसून येतात. कोरोना आजार झालेल्या किंवा यापूर्वी होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे प्रदुषणाचा त्रास होण्याची भीती आहे. हे लक्षात घेऊन नागरिकांनी फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

    दिवाळी पहाट आदी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करताना मार्गदर्शक सूचनांचे पालन व्हावे. शक्यतोवर ऑनलाईन प्रसारणावर भर देण्याची सूचना आहे.

    आरोग्यविषयक उपक्रमांना प्राधान्य द्या

    सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबिरे आदी आरोग्यविषयक उपक्रम घेण्यास प्राधान्य द्यावे. त्याचप्रमाणे, कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजारांवरील प्रतिबंधक उपाय, तसेच स्वच्छता याबाबत जनजागृतीपर उपक्रम घ्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *