• Mon. Sep 18th, 2023

‘झोळी’ : शोषित आणि दबलेल्या समाजातील दुःखाचे दर्शन देणारी साहित्यकृती..!

    डॉ. कालिदास शिंदे यांची ‘झोळी’ हे आत्मकथन अलीकडेच (मे २०२१) प्रसिद्ध झाले आहे. यात भटक्या ‘डवरी गोसावी’ (नाथपंथी) जमातीचा कुलवृत्तांत विस्तृतपणे आला आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    शोषित आणि दबलेल्या समाजातील दुःखाचे दर्शन देणारी साहित्यकृती ही प्रस्थापित साहित्यासमोर नेहमीच आव्हान/आव्हाने उपस्थित करणारी असते. ती प्रस्थापित साहित्याचे भाषिक, राजकीय आणि सांस्कृतिक आयाम विरचित (deconstruct) करते. साहित्याचे आणि साहित्यव्यवहारांचे आरोग्य सशक्त होण्यासाठी हे आवश्यक असते. दया पवार, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड (काही उल्लेखनीय पुरुष आत्मकथने) तसेच बेबी कांबळे, उर्मिला पवार (स्त्री आत्मकथने) यांनी ही भूमिका बजावली आहे. ‘झोळी’ हे पुरुषआत्मकथन आणि सुनिता भोसले यांचे ‘विंचवाचं तेल’ (पारधी समाजातील स्त्रीचे आत्मकथन) ही अलीकडची यासंदर्भातील दोन महत्त्वाची उदाहरणे आहेत.

    ‘काळी’ आणि ‘पांढरी’ अशा दोन संज्ञा कृषीसंस्कृतीच्या संदर्भात वापरल्या जातात. प्रत्यक्ष कृषीव्यवहार करणारे, कृषीसंस्कृतीत व्यस्त असणारे आणि ही संस्कृती जगणारे हे ‘काळी’ अवकाशात समाविष्ट होतात, तर ‘पांढरी’ हे कृषीसंस्कृतीपासून विलग होऊन गावगाड्यांपासून तुटलेला आणि शहरात वसलेला समाज (‘पांढरी’ चे मूळ आणि स्त्रोत हे अर्थातच ‘काळीत’ असतात, हे उघड आहे). भटक्या समाजाला आपण कुठल्या अवकाशात मोजणार? ना ‘काळी’ ना ‘पांढरी’.

    ब्रिटिश आल्यानंतर आपल्याकडे आधुनिकता नावाची गोष्ट अवतरली. त्यांनी तर वर उल्लेख केलेल्या काही भटक्या जमातीतील लोकांना गुन्हेगार ठरवून त्यासंबंधी कायदे केले, ते आजही अस्तित्वात (उपस्थित) आहेत किंवा त्यांचे व्यवस्थेकडून या ना त्या रूपात पालन केले जाते. अशा समाजात शिक्षणाचा अवकाश हा किती असणार? आणि असला तर तो किती साफल्य होणार? डॉ. कालिदास शिंदे यांची ही आत्मकथा या context मध्ये महत्त्वाची ठरते.

    ब्रिटिशांच्या वसाहतवादाने येथील ग्रामसंस्कृतीला उध्वस्त केले. नागर संस्कृती प्रस्थापित झाल्यानंतर गेल्या पन्नास साठ वर्षात कृषीसंस्कृतीची काय परिस्थिती आहे? याचे भयंकर असे चित्र रा. रा. भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या हिंदू (२००३) या कादंबरीत रेखाटले आहे. एक संस्कृती ही दुसऱ्या संस्कृतीवर कशी कुरघोडी करत असते/आक्रमण करत असते? स्वतःचा स्वार्थ, वर्चस्ववाद आणि सत्ता यांचा आधार घेऊन ती दुबळ्या आणि अशक्त समाजाला कशी दाबत असते? हा असा सारा आपल्या मानवी संस्कृतीचा भव्य-दिव्य पट आहे.

    ज्या भटक्या संस्कृतींना कुठल्याच जमिनीचा अवकाश प्राप्त नाही, त्यांनी काय करावे? शिक्षणाचा पर्याय खुला आहे, पण तिथेपर्यंत या समाजातील लोक पोहोचू शकतील? अशा अनवट वाटेचा शोध घेताना या समाजाचे प्राण तर निघून जाणार नाहीत? अशी परिस्थिती नक्कीच नाही?

    आजच्या या उत्तरआधुनिक परिवेशात (कालनिर्देशक या अर्थाने) सामाजिक आणि सांस्कृतिक अवकाश प्रचंड वेगाने बदलतो आहे/बदलणारा आहे आणि या अशा काळात या दबलेल्या समाजाची परिस्थिती काय राहील? हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. समाजमाध्यमोत्तराच्या या काळात प्रत्येक गोष्ट ही प्रचंड वेगाने बदलत आहे. प्रत्यक्ष जगण्याच्या संघर्षातील तो सामाजिक, सांस्कृतिक व्यवहार असो किंवा साहित्यव्यवहार असो तो संपूर्णपणे बदलून गेला आहे. आधुनिक कालखंडातील साहित्यव्यवहारात अभिजात वर्गाची जी मक्तेदारी होती त्याची प्रत आणि पोत आता या समाजमाध्यमोत्तराच्या काळात संपूर्णतः बदलत चालली आहे/बदलली आहे. ती यापुढे देखील याच वेगाने बदलत राहणार आहे. अशा या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक संधिकाळात चांगल्या आणि वाईट दोन्हीही गोष्टी घडत आहेत (खरंतर, चांगल्यापेक्षा वाईट गोष्टी या अधिक घडत आहेत). अफवांचे साम्राज्य पसरले/पसरवले जात आहे. शोषित आणि दबलेल्या समाजाच्या बाबतीत तर या गोष्टी ठरवून आणि मुद्दामून केल्या जात आहेत, याचा एक पुरावा म्हणजे राईनपाडा येथे घडलेले एक उपकथानक या आत्मकथनात आले आहे. राईनपाडामध्ये या समाजातील बहुरूप्यांना पोरं-धरी समजून जिवंतपणी ठेचले गेले. ही अत्यंत भेदक आणि वाईट घटना आहे. याबद्दलचे तपशील या आत्मकथनात आले आहेत.

    हे समाजमाध्यम परिणामकारकरित्या या समाजातील नव्या पिढीला वापरता येईल? यायला हवे. त्यासाठी नव्या पिढीची जबाबदारीही वाढत चालली आहे. काळी आणि पांढरी या दोन्ही समाजातील धर्मनिरपेक्ष, विज्ञाननिष्ठ आणि विवेकनिष्ठ लोक हे प्रश्न समजावून घेतील? आता हे झाले पाहिजे आणि ते झाले पाहिजे असे म्हणत बसणे सोपे आहे आणि चालढकल करण्यासारखेही आहे. प्रत्यक्षात हे काम होईल? अशा प्रकारची चिन्हे आजच्या सांस्कृतिक पर्यावरणात दिसत नाहीत, असे निराशाने म्हणण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ती दिवसेंदिवस बिघडतही चालली आहे. या अशा उत्तरआधुनिक (जी अर्थातच भ्रामक आणि संभ्रमात पाडणारी आहे) पार्श्वभूमीवर या आत्मकथनांचा विचार साहित्यिक आणि सांस्कृतिक अंगाने आणि राजकीय परिवेशातून देखील सकारात्मक दृष्टीने केला गेला पाहिजे, असे मला व्यक्तिशः वाटते.

    -डॉ. दीपक बोरगावे
    •••


—–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,