• Sun. Jun 11th, 2023

क्षयरुग्ण शोध मोहिम 15 ते 25 नोव्हेंबरपर्यंत

    अमरावती : क्षय रोगाबाबत जनसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागामार्फत क्षयरुग्ण शोध मोहिम कार्यक्रम दिनांक 15 ते 25 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या प्रशिक्षित स्वयंसेवकांकडून आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ज्योती खडसे यांनी केले.

    राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत खाजगी क्षेत्राकडून वैद्यकीय सेवा घेणाऱ्या शहर रुग्णांची आरोग्य विभागास नोंदणी करणे अनिवार्य आहे. या नोंदणीमुळे प्रत्यक्ष रुग्णांची नोंद होऊन त्यांच्यावर उपचार करणे, क्षयरोगाचा प्रसार रोखणे तसेच नियमित उपचारास प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी मदत होणार आहे.

    क्षयरोग निदान करणाऱ्या सर्व पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा, रेडिओलॉजी सुविधा तसेच क्षयरुग्णांवर उपचार करणारे विविध पॅथींची सर्व रुग्णालये, डॉक्टर्स याचप्रमाणे क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषध विक्रेते यांना अशा रुग्णांची नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या प्रयोगशाळा डॉक्टर, रुग्णालय किंवा औषध विक्रेते क्षयरुग्णांची नोंदणी करणार नाहीत अशा संस्था व्यक्तिशः रोगाचा प्रसार करण्यास जबाबदार धरण्यात येऊन कायद्यानुसार कारवाईस पात्र ठरतील. या कारवाईनुसार दोषी ठरलेल्या व्यक्तीस किमान सहा महिने ते दोन वर्षापर्यंत शिक्षा व दंडाची कायद्यात तरतूद आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे डॉ.खडसे यांनी सांगितले.

    क्षयरुग्णाची लक्षणे

    एखाद्या व्यक्तीस दोन आठवडे होऊन अधिक कालावधीचा खोकला तसेच ताप असणे, वजनात लक्षणीय घट, भूक न लागणे, मानेवर गाठ येणे यापैकी कोणतेही एक लक्षण असल्यास हा संशयित रुग्ण समजावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.


(Images Credit : Sakal)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *