• Sat. Jun 3rd, 2023

‘किलबिल’ बालकवितासंग्रह आणि ‘प्राक्तन’ या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा

नवी मुंबई : काल बाल दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध वृत्तपत्रातील स्तंभलेखिका आणि कवयित्री सौ. भारती दिलीप सावंत, खारघर, नवी मुंबई यांच्या ‘किलबिल’ बालकवितासंग्रह आणि ‘प्राक्तन’ या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व साहित्यिकांनी प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री सौ. भारती सावंत यांच्या पुस्तकांची ग्रंथदिंडी खांद्यावर घेऊन हॉल आणि परिसरात छोटीशी मिरवणूक काढली. त्यांच्या इमारतीत राहणाऱ्या देशपांडे काकूंनी आपल्या भजनाने ग्रंथदिंडीमध्ये रंगत आणली.सौ भारती सावंत यांच्या दोन्ही स्नुषा सौ. प्रियांका आणि सौ.प्रिया तसेच यजमान श्री. दिलीप सावंत, मुले निखील आणि गौरव यांनी ग्रंथ दिंडीची मनोभावे पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात केली. उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे तसेच अध्यक्ष यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन सर्वजण मंचावर आपापल्या जागी स्थानापन्न झाले. पाहुण्यांना शाल, नारळ आणि फुलांचा गुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार केला. त्यानंतर ‘किलबिल’ आणि ‘प्राक्तन’ या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन झाल्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटात कार्यक्रमाला सुरुवात झाली. सौ. भारती सावंत यांची बालमैत्रीण मा. शबाना मुल्ला यांनी कौतुकास्पद असे स्वागत गीत रचून वाहवा मिळवली.

 प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री सौ. भारती दिलीप सावंत यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि आपले मनोगत व्यक्त करताना आपण समाजाचे काही देणे लागतो आणि समाजात रहात असताना समाजाविषयी भान राखणे किती आवश्यक आहे. गेल्या दीड वर्षाच्या काळात कोरोनामुळे आपण परिस्थितीने घरातच अडकून पडलो होतो आणि आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर सर्व साहित्यिकांनी एकत्र यावे म्हणून पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले. सूत्रसंचालन करताना मा. सुरेखा गायकवाड आणि मा. सौ. गौरी शिरसाट यांनी अलंकारिक शब्दांत पाहुण्यांचे आणि लेखिकेचे स्वागत आणि सत्कार केला. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून एस. एन. डी. टी.मध्ये प्रोफेसर असणारे (आत्ता सेवानिवृत्त) त्यांचे गुरू मा. डॉ. शशिकांत लोखंडे सर हे होते. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी पुस्तकातील आवडलेल्या कथा आणि त्रुटी याविषयी मार्गदर्शन केले. किलबिल या बालकवितासंग्रह आपणाला विशेष आवडल्याचे प्रांजळपणे सांगितले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कवी आणि पेशाने डॉक्टर असणारे मा. राम शिंदे सर हे होते.
 ज्ञानसिंधू प्रकाशनाचे प्रकाशक मा. तान्हाजी खोडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की आज लोकांना फार मोठे लिहिलेले वाचायला वेळ नसतो आणि आपल्या मनातील स्पष्ट होणारे विचार कथेच्या रूपाने मांडण्यासाठी विशेष परिमाणाची गरज नसते. एका लेखकाला जे विचार सुचतील ते दुसऱ्याला सुचायला हवेतच असे नाही म्हणून त्यांनी ‘प्राक्तन’ या कथासंग्रहाचे समर्थन आणि कौतुक केले. मा. सागर तायडे सरांनी सौ भारती सावंत आणि आपण महाराष्ट्रातील जवळजवळ १०० वृत्तपत्रांमधून लिखाण करीत असल्याचे अभिमानाने सांगितले. दिसामाजी काहीतरी लिहीत जावे असे संतांनी सांगितले असले तरी सौ. भारती सावंत अविरत काही ना काही लिहित असल्याचा त्यांनी उल्लेख केला. तसेच सौ.भारती सावंत या फक्त एका विषयावरच लिहीत नसून समाजातील सणवार, ऋतु आणि विविध घडामोडींवर त्यांचे लिखाण असते याविषयी आपल्या भाषणातून प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. सौ. सुरज गाजरेताईंनी वेळेच्या अभावी आपले भाषण थोडक्यात आटोपते घेतले. त्यांनी आपल्या भाषणात सौ. भारती सावंत यांच्या प्रचंड लिखाणशैलीचे कौतुक केले. सौ. भारती सावंत यांच्या आगामी लावणी संग्रहाचे आपण प्रस्ताविक लिहिले असल्याचे आठवणीने सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. गौरी शिरसाट यांनी मान्यवर, अतिथी आणि आमंत्रित सर्व सारस्वतांचे आभार मानताना
पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे कौतुक केले.
लंचनंतर त्याच इमारतीत राहणाऱ्या लेखिका आणि कवयित्री सौ. भारती सावंत यांच्या घरी येऊन सर्वांनी त्यांच्या स्नुषांकडून बनविल्या गेलेल्या चहाचा आस्वाद घेत असताना काव्यमैफिलीचा खूप आनंद लुटला.
मान्यवरांशिवाय अनेक मित्र-मैत्रिणी, सारस्वत आणि परिचितांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमासाठी लोककवी हरिश्चंद्र धिवार, संतोष मोहिते, रंगतदार दिवाळी अंकाचे प्रकाशक विजय जोगमार्गे कवींनी स्वरचित बनवलेल्या कवितेची फ्रेम सौ.भारती सावंत यांना दिली आणि आपली कविताही सादर केली. सौ. सविता काळे, सौ सुचित्रा कुंचमवार, सौ. विजया चिंचोली यांनी उपस्थिती दाखवली. अपरिहार्य कारणाने अनुपस्थित राहिलेल्या साहित्यिक मित्रमंडळींनी कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. ह्या आनंदाच्या सोहळ्याला अनुपस्थित राहिल्याबद्दल त्यांना आनंद घेता आला नाही याबद्दल मनाला दु:ख वाटत असल्याचे मेसेज आणि फोनद्वारे सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्वांनी सावंत कुटुंबियांच्या प्रेमळ अतिथ्यशील स्वभावाबद्दल पुन्हा पुन्हा आभार मानले आणि कौतुक केले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *