निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसतसे संभावित उमेदवार अधिकच सक्रिय होताना दिसत आहेत. अमुक शिबिर लावले, अमुक काम केले असे समाजमाध्यमांवर जाहीरपणे सांगणे, यासारखी चढाओढ सुरू झाली. अंत्ययात्रेसाठी स्वर्गरथ बोलावण्याची चढाओढ सुरू झाली.इतपर्यंत ठीक आहे; पण एक अंत्ययात्रेसाठी स्वर्गरथ आणल्याचा सहा संभावित उमेदवार दावा करत होते .तेंव्हा दुःखद वातावरणातही अंत्ययात्रेला आलेल्यांना हसू आवरत नव्हते. हे संभावित उमेदवार कोणाजवळ उभे राहिले की त्याला सांगत होते,’स्वर्ग रथ मी मागवला आहे.’ एकाने तर ज्याने खरोखर स्वर्गरथ मागवला होता.त्यालाच सांगितले ,’स्वर्गरथ मी मागवला.’तो बिचारा त्याच्याकडे बघतच राहिला.
एखादे काम स्थानिक नगरसेवकाने मंजूर केले असेल तर हे त्याचा कानोसा घेतात.आणि लगेच समाजमाध्यमांवर जाहिरातबाजी सुरू करतात की,’अमुक अमुक काम मी महापालिकेला निवेदन दिल्यामुळे होत आहे.’बिचारा नगरसेवक स्वतःच्या महापालिका नगरसेवक निधीतून ते काम करत असतो.हे फक्त त्याला माहीत असते. त्याने जाहिरात केलेली नसते.लोक मात्र ज्याने समाजमाध्यमांवर ‘हे काम माझ्या अर्जामुळे होत आहे ‘अशी जाहिरातबाजी केलेली असते त्याचे आभार मानून नगरसेवकांना शिव्या देत असतात.नगरसेवक कोणत्या मनस्थितीत जगत असेल,त्यांना किती मानसिक त्रास होत असेल, हे त्यांच्या जागी जाऊन पाहील्यावरच कळेल.
जी कामे नगरसेवकांनी करायची असतात ती आता नगरसेवक बाजूला राहून संभावित उमेदवार करु लागले आहेत.मागे उल्हासनगर महापालिकेकडून संपूर्ण शहराच्या जुन्या रोड लाईट बदलून त्याठिकाणी एलईडी लाईट बसवायचे काम सुरू होते. तिथे भावी नगरसेवक जाऊन उभे राहून लाईट लावणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत लाईट सह फोटो काढून समाजमाध्यमांवर टाकत होते,बरं ते एकाने टाकले तर ठीक आहे; पण चार चार संभावित उमेदवार टाकत होते. त्यांचे कमी म्हणून की काय चार चार नगरसेवक सुद्धा पोस्ट टाकत होते की,विभागातील लाईट ‘माझ्यामुळे बदलल्या जात आहेत.’बिचारे नागरिक संभ्रमित झाले होते,खरे काम कोण करतेय ,काहीच कळत नव्हते.
प्रभागातील कामे करण्यासाठी मतदारांनी नगरसेवक निवडून दिलेले असतात त्यांच्या देखरेखीखाली नागरीसुविधांची कामे होत असतात. नगरसेवकांच्या संमतीशिवाय सफाई कामगार काम करू शकत नाहीत. नागरिकांनी तक्रार केल्यावर ती तक्रार नगरसेवकांच्या तसेच मुकादम यांच्या कानावर घालूनच ते काम केले जाते.जर नगरसेवकांनी ‘ते काम न करता दुसरे काम करा ‘असे कर्मचाऱ्यांना सांगितले तर त्यांना ऐकावे लागते. म्हणजेच नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण नगरसेवकांच्या संमत्तीनेच होत असते.नगरसेवक कामांसाठी सुद्धा निवडून दिले जातात.त्यांना ती कामे करावीच लागतात.त्यामुळे नगरसेवक ‘अमुक अमूक नाली साफ करून घेतली,अमुक अमुक लाईट लावली,पाणी सोडायला सांगितले’ अशी शुल्लक कामे समाजमाध्यमांवर टाकत नाहीत.तशी टाकली तर लोक त्यांनाच वेड्यात काढतील .हे नगरसेवकांना माहीत असते.पण त्यांची कामे जर इतर नागरिक किंवा संभावित उमेदवार निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन करत असतील तर ही नगरसेवकांना चपराक आहे.नगरसेवकांच्या देखरेखीत काम करणारे कर्मचारी जर नागरिकांच्या तक्रारींवर काम करत असतील आणि तेही आज तक्रार केली की लगेच त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी इतक्या तातडीने काम होत असतीलजितक्या तातडीने नगरसेवकाकडूनही होत नाहीत. तर मग नगरसेवक हवेत कशाला?
याचा दुसरा अर्थ असा होतो की,नगरसेवकांना कर्मचारी गणतीत घेत नाहीत.त्यांचे ऐकत नाहीत.दुर्दैव आहे.म्हातारी मेल्याचे दुःख नाही,पण काळ सोकावतो आहे.हे नगरसेवकांनी लक्षात घेतलेले बरे.इतपर्यंतही ठीक आहे, पण रेशनच्या दुकानात कोणा ग्राहकाला धान्य मिळाले नाही म्हणून समाजसेवेचा वसा घेतलेल्या संभावित उमेदवारांनी रेशन दुकानदाराला न विचारता, कुठल्याही प्रकारची खात्री न करून घेता,सरळ रेशन कार्यालयात तक्रार करून रेशन दुकानदाराला वेठीस धरणे कितपत योग्य आहे?
एक परित्यक्ता बौद्ध महिलेने उदरनिर्वाहाचे साधन म्हणून मेहनतीने रेशन दुकान मिळवले.नवऱ्यामागे चिल्ल्यापिल्यास शिकवले .रेशन दुकान त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे.पण अतिउत्साहात त्या दुकानाविरोधात केलेल्या तक्रारींमुळे त्या महिलेला किती त्रास सहन करावा लागत आहे.त्या महिलेला रेशन कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.ती महिला रेशन ऑफिसमध्ये भेटली.मला पाहताच तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले.मी विचारले ,’काय झाले ताई?’ तर म्हणाली,’भाऊ मी इमानदारीत रेशन दुकान चालवून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे.मी दुकान न चालवता आणखी काही गैरधंदा( वेश्या व्यवसाय) करावा काय?असे या कार्यकर्त्यांना वाटते काय?’
‘इतकं काय झालं?’मी विचारले.त्यावर ती महिला दुकानदार म्हणाली,’ माझ्या दुकानात माल मिळाला नव्हता.त्यामुळे मी ग्राहकाला देऊ शकले नाही;पण माझ्याशी बोलणी न करता सरळ तक्रार केली गेली की,मी रेशनच्या मालाचा अपहार केला आहे.’पुन्हा तिच्या डोळ्यात पाणी आले.तिची ती अवस्था पाहून माझाही कंठ दाटून आला.
अतिउत्साही कार्यकर्त्यांनी कार्य करायला हरकत नाही.पण एखाद्याच्या जीवावर बेतेल असे कार्य करु नये.नगरसेवकांनी करायची कामे आपण करतो आहोत, यामुळे आपल्याला मतदान होईल अशी अपेक्षा असेल तर आताच सावध व्हा.कारण मतदारांना राजा उगीच म्हणत नाहीत, त्यांना खऱ्या खोट्याची पारख असते.
संभावित नगरसेवक करत आहेत ती कामे चांगलीच आहेत पण ती नगरसेवकांना करू द्या.तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर तुम्हाला करायचीच आहेत.तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही मेहनतीने केलेले काम इतर कोणी म्हणत असेल की, माझ्या पत्रामुळे होत आहे,तेंव्हा तुम्हाला कसे वाटेल? याचा विचार करा.मागील वर्षी एक कार्यकर्त्याने महापालिकेस अर्ज दिला की,अमुक अमुक ठिकाणचे खड्डे डांबरीकरण करून भरा, कारण अपघात होण्याची शक्यता आहे.त्याने अर्ज सायंकाळी पाच वाजता दिला आणि दुसऱ्या दिवशी ते डांबरीकरणाचे काम सुरू झाले. त्याने समाजमाध्यमांवर ते पत्र टाकले आणि लिहिले ,’मी अर्ज केल्यामुळे हे काम सुरू होत आहे, आयुक्तांचे आणि संबंधित अधिकाऱ्यांचे आभार.ते काम मंजूर करून घेणारा नगरसेवक राहिला बाजूलाच हेच साहेब शेखी मिरवायला लागले.अजून त्याचा अर्ज इनवर्डच्या टेबलवरच असेल.इतक्या लवकर सरकारी यंत्रणा हलली तर मग बघायलाच नको.त्याचे ते पत्र आणि सूरु असलेले काम पाहून हसावे की रडावे, हेच कळत नव्हते. ज्याचे श्रेय त्याला द्यायला काय हरकत आहे?
मतदारांना खुश करण्यासाठी विद्यमान नगरसेवकांना नाराज करू नका.त्यांच्या सहनशक्तीची परीक्षा घेऊ नका. एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो.इसपनीती की पंचतंत्र मध्ये वाचली होती. एका राजाचे आवडते माकड होते,राजा त्याच्यावर खूप प्रेम करायचा.त्याला जेवणाला सोबत बसवायचा. कुठे गेला की सोबत घेऊन जायचा.इतकेच काय तर झोपताना सुद्धा जवळ घेऊन झोपायचा,एकदा राजा वामकुक्षी घेत होता. राजा गाढ झोपेत असताना राजाच्या नाकावर माशी बसण्याचा प्रयत्न करत होती.राजाचा जसा माकडावर जीव होता तसाच जीव माकडाचाही राजावर होता.माशीला हाकलण्याचा माकडाने प्रयत्न केला पण ती थोडे उडून दूर जायची आणि परत येऊन नाकावर बसण्याचा प्रयत्न करायची.ती नाकावर बसायला यशस्वी झाली.माकडाला खूप राग आला ,माकडाने बाजूलाच असलेली राजाची तलवार उचलली आणि माशीला मारण्यासाठी माशीवर वार केला.त्याच्या वारामुळे माशी उडून गेली पण बिचाऱ्या राजाचे नाक कापले गेले. ही गोष्ट विस्कटून सांगायची आवश्यकता नाही असे वाटते,तितके तुम्ही समजदार आहात.
(विशिष्ट समाजसेवकांनी किंवा कार्यकर्त्यांनी किंवा संभावित उमेदवारांनी मनाला लावून घेऊ नका,अशी परिस्थिती सर्वदूर आहे,सर्व महापालिकेत आहे.)
कडू डोस ज्याच्या कामाचे श्रेय त्याला द्या,दुसऱ्यांच्या कामामध्ये लुडबुड करू नका.अति उत्साहात एखाद्याचे नुकसान होईल असे काम करू नका.बस इतकेच.
- – शांताराम निकम
—–