गारूड्यानं पोतडीतून एक अंदाजे पांढर्या रंगाची कित्येक वर्षे न धुतलेली चादर काढून जमीनीवर पांघरली व दोन राखड लावलेल्या हड्ड्या काढल्या अन एक दुसरीवर अश्या जमीनीवर क्राॅस करून चादरीवर ठेवल्या. मग त्यानं दोन स्टीलच्या छोट्या रिंग्स काढल्या.तो काही सांगणार एवढ्यात त्याचंच असावं बहुतेक असं एक गोंड्याची टोपी घातलेलं लहानसं पोरगं नाक पुसत पुसत कुठूनतरी आलं आणि त्या दोन रिंगा हाती घेवून त्यातून पूर्ण शरीर काढायची कसरत चालू केली, अगदी शांतपणे व निर्विकारपणे. खेळाचं वय असलेलं ते पोरगं आपल्या बापाला कमाईसाठी हातभार लावत होतं.
थोड्याच वेळात एक तरणीबांड विशीतली मुलगी मैदानात आली.बहुतेक गारूड्याची बायको असावी.ह्यांच्या मुलीत आणि बायकोत दिसण्यात सहसा जास्त फरक नसतो म्हणून शंका आली. कपाळावर एवढे मोठे गोंदण होते.दिसायला काळीकुट्ट पण रेखीव आणि तेवढीच चपळ. तीने लगेच बांबू क्राॅस ह्या बाजूला आणि दोन त्या बाजूला लावून तयार झालेल्या कैचीला एक दोर आरपार बांधला. ही सर्व कसरत तीने एकटीनेच केली.अगदी झटपट. पोतडीतून एक ढोलक आणि वाजवायला काठ्या काढून मस्त ठेक्यात वाजवायला सुरुवात पण केली.थोड्या वेळाने गारूड्याने स्वतः तो ढोलक वाजवायला घेतला तेव्हा ती तरुणी चपळाईने बांधलेल्या दोरावर चढली आणि तीने हाती एक लांब बांबू घेवून बांधलेल्या दोरावर हळूहळू चालायला सुरुवात केली.मध्येच तिचा तोल गेल्यागत परिस्थिती झाली पण सावरले. ते मार्केटिंग थ्रील असावे.बांबू तीला बॅलन्सींग करायला मदत करत होता.जसजसा खेळ दुरपर्यंत दिसत गेला तसतसा प्रेक्षक वर्ग लाभत गेला व कंपासपुर्यातले झाडून पोट्टेपाट्टे आपल्या सर्व Commitment बाजूला ठेवून गारूड्याचा खेळ पाहू लागले.
असं म्हणत त्यानं कळकटल्या कुर्त्याच्या खिशात हात घालून दोन कवड्या फू करत फुंकर मारून काढल्या आणि क्राॅस ठेवलेल्या हड्डीच्या बाजूला ठेवल्या.नंतर त्याने एक पेटारा काढला व त्याचे झाकण न उघडताच तो पेटारा लोकांजवळ नेत धाक दाखवतच गर्दीचे मोठ्ठे गोल रिंगण तयार केले व पब्लिक ला बसायला विनंती केली.लोकं मग आपापल्या सोईप्रमाणे मांडी घालून सुरक्षितरित्या मोठ्ठा गोल करून बसायला लागली. प्रेमाने शिस्तीचे आवाहन कधीच काम करत नाही परंतु धाकात का होईना शिस्तबद्धता लाभते.
बसणार्यांमध्ये शाळकरी मुलांचाच भरणा अधिक होता. श्रावण सोमवार असल्याने शाळेला आज अर्धा दिवस सुटी होती त्यामुळे शाळेच्या घंटीची धास्ती नव्हती. धास्ती आणि उत्कंठा होती फक्त त्या पेटार्यातून निघणार्या बावाजीची.त्याचे आज दर्शन होणार होते.श्रावण सोमवारी नागाचे दर्शन झाले तर देव प्रसन्न होतो व चांगले मार्क्स मिळतात असं मार्क्सवादी दातीर बाई धडा शिकवता शिकवता वर्गात सांगायच्या व हा योग अनायासंच चालून आला होता.
डमरूचं वाजणं चालूच होतं व लहान मंडळी मांडी घालून दोन्ही हात गालावर ठेवून फुरफुरत्या नाकाने उत्सुकतेने बघत होती. मोठी मुलं मित्राच्या खांद्यावर हात ठेवून शो च्या आकर्षणाची प्रतीक्षा करीत होती. गाडे च्या हाॅटेल प्रांगणात गारूड्यानं आपलं बस्तान मांडलं होतं तिथून मस्त गरमागरम भजी तळल्याचा वास दूरपर्यंत जात होता व सिनियर बावाजींना आमंत्रण देत होता.
आता पोतडीत हात घालून त्यानं पुंगी काढली व मन डोले मेरा तन डोले... ची धून वाजवू लागला.आम्ही मंत्रमुग्ध होउन भक्तीभावाने गारूड्याचा खेळ पाहू लागलो. मध्येच पॅंटच्या खिशात हात घालून भातक्यासाठी जपणूकीने साठवलेल्या पाच पैशाच्या नाण्याची उलटसुलट खात्री करून घेत होतो. बिदागीरी म्हणून गारूड्याची फी प्रत्येक प्रेक्षकाला खेळ संपल्यावर विनातक्रार देणे हे मेंडेटरी होते म्हणून हे पाच पैसे जपून ठेवलेले होते. पाच पैसे काय ब्याद .एक एक खळकू जमा करून तान्ह्या पोळ्याला कमावून घेऊ, अशी स्वकर्तृत्वावर खात्री असल्यामुळे मी बिनधास्त होतो.परिस्थितीच्या नियमाप्रमाणे कुठल्याही अनुभवाची रितसर किंमत या ना त्या रूपाने मोजावीच लागते. पूंगी वाजली आता साहेब बाहेर येणार तशी आमची उत्सुकताही शिगेला पोहोचली.गारूड्याचं मार्केटिंग सुरूच होतं. मन डोले चं गाणं झालं.डमरू-पुंगी ची जुगलबंदी पण झाली पण टोपलीचं झाकण काही केल्या उघडत नव्हतं.
शेवटी एकदाचा तो क्षण आला. गारूड्याचा पवित्रा आता बदलला.आमच्या सर्वांच्या उत्सुकतेला दाद देत टोपलीचं झाकण उघडलं गेलं व आत असलेल्या जनावराला त्याने हातानेच डिवचले.लगेच आत बसलेल्या मेहमान कलाकाराची एंट्री झाली.एवढा मोठ्ठा फणा काढून त्याने सर्वांचे एकदा टपोर्या डोळ्यांनी निरीक्षण केले. फणा इकडे तिकडे फिरवत मोठ्या तोर्याने तो नाग, मिलीटरीतल्या उच्च पदाधिकार्याने कवायतीचे निरीक्षण करावे तसे सर्वांचे परिक्षण व निरीक्षण करड्या नजरेने करीत होता.आम्ही श्वास रोखून व डोळे बारीक करून त्याच्या कडे पहात होतो.नागाचे डोळे जेवढे टपोरे होते तेवढेच आमचे बारीक होते.मध्येच तो प्राणी जीभ बाहेर काढून काहीतरी वेध घेत असल्याचा भास होत होता. नकळत आम्ही त्याला डोळे मिटून हात जोडले.
नागबाबा के दर्शन करो रे सब लोग.श्रावण का मैना है इसलिए सब झन इसके दर्शन करो.असे म्हणत त्याने ती टोपली सर्वांजवळ नेऊन ह्या नागबाबाचे दर्शन घडवले.सर्वांनी जमेल तसे हात जोडले.नंतर त्याने तो पेटारा झाकून ठेवला. आम्ही आवंढा गिळला.
मोठी माणसं जे काही समजायचं ते समजली आणि पांगोपांग झाली.रफादफा झाली. साप मुंगसाचे द्वंद्व बघण्यासाठी लहान मुले मात्र तिथेच घुटमळत कमरेवर हात ठेवून उभी होती.
राजकारणाचही असंच आहे.गारूडी हा राजकारण्यांप्रमाणेच सुत्रधार आहे असं म्हटले तर वावगे होणार नाही. राज्याचा मंत्री हा गारूडीच असतो आणि तुम्ही आम्ही दुसरेतिसरे कोणी नसून दर्शक असतो.खेळ आवडो अथवा नावडो पण गारूड्यानं म्हटलं म्हणून बघ्यांनी टाळ्या वाजवून दाद दिलीच पाहिजे असा दंडक आहे.गारूड्यांच्या खेळामधील साप,मुंगूस इत्यादी प्राणी हे पाळलेल्या अंडरवर्ल्ड प्रमाणे असतात. म्हटले तेव्हा सरेंडर करतात व म्हटले तेव्हा एनकाऊंटरची तयारी दर्शवतात. त्यांच्या पाॅलीसीज वगैरे डमरू आणि पूंगी प्रमाणेच श्रेष्ठ असते.त्याचप्रमाणे पूंगीची धून सुद्धा काम झालं की सोईस्कररीत्या बदलवता येते. राजकारण्यांचे जमूरे म्हणजे त्यांचे रोजंदारी तत्वावर नेमलेले आगे बढो..आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशी बाराखडी तोंडपाठ केलेले शेंडेफळं. सापाची व मुंगसाची लढाई न पाहायला मिळाल्याने कसलीतरी खंत जाणवत होती.त्याचा पुढचा खेळ चावडी चौकात असल्याचे आम्ही ऐकले होते म्हणून साप मुंगूस लढाई बघायला आम्ही नवीन उत्साहाने चावडी चौकात जाण्यासाठी गारूड्याच्या मागे मागे चालू लागलो.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या