- *'साहित्यसखी महिला मंच नाशिक, तिसरे राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन
- *मै असिफा बोल रही हूं....! साकारताना डॉ. प्रतिभा जाधव
नाशिक : 'साहित्यसखी महिला साहित्यिक मंच नाशिक' आयोजित तिसरे राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन मायको फोरम हॉल नारायण सुर्वे वाचनालय येथे उत्साहात संपन्न झाले. संमेलनाच्या उद्घाटक मा. शमिभा पाटील यांनी दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन केले. प्रमुख अतिथी सुनंदा जरांडे, संमेलनाध्यक्षा प्रा.सुमती पवार यांनी प्रेरक असे मनोगत व्यक्त केले.
मा. शमिभा पाटील यांनी आपल्या मनोगतात ''स्त्रियांनी स्त्रियांसाठी विचारमंच उपलब्ध करून देणे ही बाब कौतुकास्पद आहे. साहित्य संमेलनासारखा उपक्रम 'साहित्यसखी' च्या संस्थापक-अध्यक्षा डॉ.प्रतिभा जाधव, सचिव अलका कुलकर्णी व त्यांची संपूर्ण कार्यकारिणी चालवित आहेत ही निश्चितच परिवर्तनवादी आश्वस्त करणारी घटना आहे. कुठलीही क्रांती एका दिवसात होत नसते त्याकरिता शेकडो वर्षांचा कालावधी जावा लागतो. असे नमूद करताना त्यांनी बायबल, कुराण, रामायण, महाभारत व गाथासप्तशतीमधील महिलांची उदाहरणे दिली. आजच्या स्त्रियांच्या जीवनावर भाष्य करताना त्या अधोरेखित करतात की, 'गँसची ज्योत गुलाबी असते, गँसचा चटका गुलाबी नसतो'. अशा सूचक शब्दात स्त्रीची व्यथा, वेदना यावर त्यांनी प्रकाश टाकला. अतिशय मुद्देसूद व देश-विदेशातल्या स्त्रियांचे दाखले देऊन त्यांनी स्त्रीवादी साहित्याची गरज का आहे? हे विशद केले. साहित्य संमेलनाच्या प्रमुख अतिथी मा.सुनंदा जरांडे यांनी कर्मचारी युनियनचे काम करताना परप्रांतीय स्त्रियांच्या समस्या याविषयी माहिती दिली. अवयवदानाचे महत्त्व पटवून अवयवदान करण्याकरिता आवाहनही केले.
संमेलनाध्यक्षा प्रा. सुमती पवार यांनी ऑनलाईन संपर्क साधन, 'जे हित साधते ते साहित्य' साहित्याने मानवाच्या कल्याणासाठी व हितासाठीच लिहिले पाहिजे. चांगला वाचकच चांगला लेखक होऊ शकतो. साहित्य ही समाजाची अभिव्यक्ती असते असे आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. साहित्यिक डॉ. प्रतिभा जाधव यांच्या 'अस्वस्थतेची डायरी', प्रा. सुमती पवार यांचे 'चांदणं' व विजया दुधारे यांचे 'जलकाव्यधारा' इ. पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आले. महिला अत्याचाराशी निगडित ह्रदय हेलावून टाकणारा आणि अंतर्मुख करणारा ' मैं असिफा बोल रहीं हूँ!' हा महिला अत्याचाराविषयी एकपात्री प्रयोग प्रसिद्ध एकपात्री कलावंत, वक्ता डॉ.प्रतिभा जाधव ह्यांनी जीवंतपणे उपस्थितांसमोर उभा केला. त्यांनी जीवंत केलेल्या 'असिफा'ने सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले. बलात्कारालाही धर्म असतो का? हा प्रश्न त्यांनी समाजव्यवस्थेला विचारला.
सूत्रसंचालन आरती डिंगोरे , रंजना बोरा व अलका कुलकर्णी यांनी केले. आभार प्रदर्शन रुपाली जाधव व आशा पाटील यांनी केले. कवयित्री संमेलनात महाराष्ट्रभरातून नांदेड, वर्धा, अमरावती, हिंगोली, औरंगाबाद, उल्हासनगर, चेंबूर, मुंबई, येवला, सटाणा, बागलाण अशा विविध ठिकाणांहून आलेल्या ५२ कवयित्रींनी सहभाग घेतला व विविध विषयांच्या कवितांनी रसिकांची दाद मिळवत कवयित्री संमेलन उत्तरोत्तर रंगले. राज्यस्तरीय साहित्य संमेलनासाठी सहभागी झाल्या होत्या. 'साहित्यसखी'च्या अध्यक्षा डॉ.प्रतिभा जाधव, अलका कुलकर्णी, आरती डिंगोरे, रंजना बोरा, प्रिती गायकवाड, सुमती टापसे, शुभांगी पाटील, पूजा डोखळे, सविता पोतदार व सर्व सदस्या ह्यांनी ह्या संमेलनासाठी परिश्रम घेतले व एक संस्मरणीय राज्य महिला साहित्य संमेलन पार पडले.
0 टिप्पण्या