अमरावती : कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साजरा करताना काटेकोर दक्षतापालनाचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अप्पर जिल्हा दंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी याबाबतचा आदेश जारी केला. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना महापालिका, स्थानिक प्रशासनाची परवानगी बंधनकारक आहे. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरिता 4 फूट व घरगुती देवीच्या मूर्तीची उंची 2 फुटांच्या मर्यादेत असावी. शक्यतो देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची व पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरच्या घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्याबाबत स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी आरोग्यविषयक उपक्रम जसे की रक्तदान शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे. त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार व प्रतिबंधात्मक उपचाराबाबत जनजागृती करावी. आरती, भजन, कीर्तन किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, तसेच ध्वनी प्रदुषणाबाबत नियम व तरतुदींचे पालन व्हावे. गर्दी टाळणे, मास्क, स्वच्छता आदी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या