Header Ads Widget

गझल चादंणे गझलसंग्रह परिचय

    ठाम गोजिरा..धीट साजरा
    चेहरा असो..नित्य हासरा
    असेच व्यक्तिमत्त्व असलेल्या आपल्या आदरणीय गझलकारा शरयूताई आहेत.
    ऊन झेलुनी सावलीस दे
    झाड कर मला, छान ईश्वरा

    असं म्हणणाऱ्या, शरयूताईचा पहिला वहिला गझल संग्रह म्हणजेच *गझल चांदणे* डॉ. शरयू शहा हे नावच मुळात साहित्य क्षेत्रात नावाजलेले आहे. त्या फक्त मॅट्रिक परिक्षा उत्तीर्ण झालेल्या पण लग्नानंतर तेरा वर्षांनी शिक्षणाची गोडी लावून घेतली व एकवीस वर्षे शिक्षण घेऊन पी.एच डी (एम ए मराठी व सितार) केले. त्यांची एकूण १४ पुस्तके प्रकाशित असून त्यातील पाच पुस्तकांना पुरस्कार प्राप्त झालेत. त्यांचे लेखनकार्याचे बरेच असे छंद आहेत जसे कथा, काव्य, ललित लेखन, आध्यात्मिक लेखन, गझल लेखन, हस्तकला. रेडिओ- टी व्ही कार्यक्रमही त्यांनी खूप केलेत. अनेक पारितोषिकांचा वर्षाव त्यांच्यावर झालाय. श्रीमती महाराष्ट्र, नारीरत्न, साहित्यरत्न, कलारत्न, हिरकणी, जीवनगौरव, महाराष्ट्र रत्नगौरव, यशवंत पुरस्कार आणि इंद्रधनू पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना विभूषित केले आहे. सुपर वूमन परीक्षक, साहित्य संमेलन अध्यक्षपद. अशी पदेही त्यांनी भूषवलीत. असा साहित्याचा डोलारा उभारलेल्या आमच्या डॉ. शरयूताईचा गझल संग्रहही तितकाच भारदस्त आहे.

    गझल संग्रहास नाव ही त्यांच्या गुरुवर्या म्हणजे आमच्या सर्वांच्या लाडक्या गझलकारा आ. उर्मिला बांदिवडेकर (माई) नी सुचवलंय. शांत शीतल चांदण्यात लपटलेला हा गझल संग्रह जयवंत भा. वानखडे, गझल मंथन प्रकाशन, कोरपना, जि. चंद्रपूर इथून प्रकाशित झाला. मुखपृष्ठावरूनच गझल चांदण्याची आतुरता वाढते. संग्राहाला प्रस्तावना व शुभेच्छा डॉ.आशा श्रॉफ, उर्मिला बांदिवडेकर, प्रा. सुंदना पाटील (गझलनंदा), निलेश कवडे, आणि अनिल कांबळे यांच्यासारख्या नामवंत गझलकार, गझलकारांनी दिल्या आहेत.संग्रहात एकूण ९६ गझला अक्षरगण व मात्रा वृत्तात आहेत. तसेच प्रत्येक गझलेचे वृत्त, लगावली व शीर्षक दिलंय, त्यामुळे हा गझल संग्रह नवोदित गझलकारांना एक उपहारच आहे. शरयूताईचे आणखी एक वैशिष्ठ्य या संग्रहात आढळतंय ते म्हणजे, प्रत्येक शब्दाची सुरुवात एकाच अक्षराने..पान ८२..

    जमवायचे जगाशी, जगणे जुळून जाते
    जपताच जनमनाला, जीवन जमून जाते

    आनंदकंदातल्या ह्या गझल रचनेत ताईची अभ्यासू वृत्ती, शब्दांची जुळवाजुळव करण्याची चिकाटी दिसून येते. कार्यशाळेत शिकत असताना म्हणे त्या लगावलीचे लाख लाख शब्द गोळा करायच्या, त्यांच्या गुरू आ. माईनीच सांगितले आहे!! पान २८ वर *सुप्त गुणांची खाण* शीर्षकाची अनलज्वाला वृत्तातली जुलकाफिया गझलेतला हा शेर बघा

    सुप्त गुणांची खाण खरोखर असते बाई
    घरदाराच्या सदा बरोबर फुलते बाई

    ह्यात बाईचे वैशिष्ट्य, महानता, तिची सर्वांशी सलोख्याने वागण्याची वृत्ती,आपले घर व आल्या गेल्या पै पाहुण्याचे आदरातिथ्य सांभाळणारी बाई.तसेच पान ६४ वरची राधा वृत्तातली गझल (जुलकाफिया)

    वेदना गझलेत येता ..हासरी बनते
    मुखवट्याच्या मात्र जगती बावरी रुसते

    गझल लेखनाची गोडी लागली की, तिचे शेर वेगवेगळ्या खयालात लिहिले जातात.मुखवट्याच्या जगावर रुसली तरी वेदना गझलेत येताच ती हासरी बनते. पान १११ वरचा हा शेर बघा:-

    खुळी जाहले गझलीयत अन् गझलेपायी
    आयुष्याची अता लेखणी केली आहे

    जेव्हा गझलकार, गझलकारा गझलेच्या प्रेमात पडतात तेव्हा, ते अक्षरशः त्यापायी वेडे होतात. जळी स्थळी ते गझलेच्याच भोवऱ्यात असतात. त्यांच्या आयुष्याची जणू गझललेखणी बनलीय. मला वाटते ताईंनी हा शेर स्वतःवरच लिहिला असावा. पान ८६ *माझी मुलगी* अनलज्वाला वृत्तातली ही गझल "म"अक्षरावर लिहिलीय

    मधु ममतेची मायापाखर माझी मुलगी
    मिश्किलसा मनसाज मनोहर माझी मुलगी

    ह्या मतल्यात एका आईचा आपल्या मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन वर्णिलाय. मुलगी कशीही असली तरी आईला सदैव ती सुंदरच भासते. पान १२०..सौदामिनी वृत्तातला शेर बघा

    रदिफ काफिया मागुनी चालते
    गझलही पुरुष संस्कृती पाळते

    गझलेतली रदिफ नेहमी काफियामागूनच येते. ती नसली तरी चालते पण असेल तर तिचं असणं मात्र सदैव काफियामागूनच असतं. शिवाय उला, सानी, अलामत, राबता, खयाल इ. नियमाचे पालन गझलेत बरोबर असायला हवे तरच ती गझल सुंदर बनते.संग्रहात मला भावलेले अजून काही शेर नमूद करू इच्छिते. पान २९ अनलज्वाला:-

    गांभिर्याने..जीवन जगले चुकले माझे
    मौज मजेला, नाही वरले.. चुकले माझे
    पान ३९ पादाकुलक:-
    काळ संपतो अलगद नकळत
    ओंजळीतली..वाळू सांडत
    पान ५१ रंगराग
    भाकरी चुलीवरची, लाभणे कुठे आता
    नेसुनी नऊवारी, लाजणे कुठे आता
    पान ७३ मेनका
    संपुनी जाते उदासी.. यातना
    या गझलेने मन कसे भारावते

    असे एकापेक्षा एक सरस शेर ताईंच्या गझलेत आहेत. ताईच्या ९६ गझला.. अक्षरगण व मात्रा वृत्तामध्ये मिळून चाळीस वृत्ते ताईनी संग्रहात हाताळली आहेत. “गझल चांदणे”तल्या गझला वाचताना खरोखरच चांदण्यात फिरल्याचा आनंद मिळतो. ताईंच्या लेखणीचे कौतुक करावे तितके थोडेच..

    आनंदकंद:-मन मानसात माझ्या
    वीरलक्ष्मी+केशा:- आजवर वागले..वाटले बरोबर
    वनहरिणी:- दंश आजवर किती जाहले
    परिलीना:- गोड कळी जन्मताच
    जलोद्धतगती:- अशी सहचरी झकास नटते

    वरील गझला पुन्हा पुन्हा वाचून गझल चांदण्यात मी चिंब भिजून घेतले. आपणही हा संग्रह जरूर वाचावा आणि ताईच्या गझल चांदण्याचा आस्वाद घ्यावा.

    डॅा.शरयू शहा. यांच्या.. गझल चांदणे
    या गझल संग्रहासाठी..₹210 with postage
    संपर्क:-*Sanjay Tidke
    Pho. Pay no -9403504940
    पुस्तक परिचय
    सौ. शोभा वागळे
    मुंबई.
    8850466717
    गझल चादंणे गझलसंग्रह परिचय
    डॅा.शरयू शहा.+91 96190 23330

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या