मराठी साहित्याला क्रांतीकारी विचारसरणी देणारे तत्वज्ञान म्हणजे फुले शाहू आंबेडकर तत्वज्ञान होय.या तत्वज्ञानाने मराठी कवितेला जगाच्या वेशीवर नेले आहे.जगातील दुःखी माणूस समानसुत्रांनी बांधण्याचे काम या तत्वज्ञानाने केले आहे.आदिवासी कविता ही अत्यंत स्फोटक व ज्वाजल्याचे लेणे घेऊन प्रकट झाली आहे. भुजंग मेश्राम, उषाकिरण आत्राम, डॉ.विनायक तुमराम, प्रभू राजगडकर यांची कविता प्रस्थापित समाजव्यवस्थेला नकार देत आदिवासी समाजाच्या उत्थानाचा नवा आविष्कार रेखांखित करते. मराठी समीक्षकांना आदिवासी कवितेला न्याय देता आला नाही. त्यांची अभिव्यक्ती अधोरेखित करता आली नाही. हे जळजळीत वास्तव आपण समजून घेतले पाहिजे.तरी आज ही कविता नव्या जोमाने लिहली जात आहे.आपले आदर्श कोण यांची तपासणी करत विकृत व्यवस्थेवर आसूड ओढत आहे.ही आदिवासी कवितेची जमेची बाजू आहे. या क्रांतीकारी कवितेच्या प्रांतात कवी प्रब्रम्हानंद मडावी आपला बफरझोन हा दुसरा कवितासंग्रह घेऊन मानवीय समाजाला नवे सेद्रिंय जीवनद्रव्य देत आहे.
त्यांनी ज्या कठीण काळात ही कविता लिहली ती सामान्य कविला पेलता आली नसती.कँसर सारख्या आजारातून त्यांनी जी कलाकृती निर्माण केली ती अत्यंत मूलगामी आहे.याबद्दल कवीचे अभिनंदन करतो.दिर्घ आयुष्यासाठी मंगलकामना देतो.प्रब्रम्हानंद मडावी यांचा पहिला कवितासंग्रह आपण कोणत्या देशात राहतो? हा आहे .या कवितेचा पुढचा भाग म्हणजे बफरझोन कवितासंग्रह मनावा लागेल.देशात व जगात घडणाऱ्या अमानवीय कौर्यभरी घटनाचे सुक्ष्म अवलोकन या कवितासंग्रहात पाहायला मिळते.कवीच्या वाटेला आलेले दुःख,वेदना,आक्रोश,शोषण,दारिद्र,जुमला,बनावटपणा, यांचे आशयगर्भी चिंतन कवीने मांडले आहे.देश अग्नीज्वालेत जळत असतांना मानवाला समतेची व ममतेची संजिवनी देण्याचे काम ह्या कवितातून कवी करत आहे. बफरझोन हे शीर्षकचे वाचकाचे मन आकर्षून घेते.बफरझोन म्हणजे पर्यावरणीय संरक्षणासाठी नियुक्त केलेले क्षेत्र असा साधा अर्थ होत असला तरी हे बफरझोन आदिवासी समाजाच्या शोषणाचे क्षेत्र तयार झाले आहेत.भांडलवदाराच्या फायद्यासाठी आदिवासीना जल,जंगल व जमीन यापासून परावृत्त करणे हा षडयंत्रकारी डाव बफरझोनचा आहे.ओसाड माळावर माणूस बोन्साय करण्याची प्रवृर्ती म्हणजे बफरझोन होय.
बफरझोन या कवितासंग्रहात एकूण ५९ कविता आहेत.१३६ पानात त्याची बांधनी केली आहे.यातील कविता मुक्तछंदाने परिपूर्ण विकसित झालेल्या आहेत.यातील कविता रसग्रहण पातळीवर उतरणारी नाही तर ही कविता समाजउध्दाराचा नवा आत्मविश्वास देण्याचे काम करणारी कविता आहे.माणसाशी माणसाप्रमाणे वागावे हा संदेश देणारी दिशादर्शक कविता आहे.ही कविता फक्त आदिवासी समाजाचे चित्रण करत नाही तर समग्र मानवाच्या दुःख व अत्याचाराचे भावचित्र अधोरेखित करते.ही कविता मोहकता,मादकता,मनोरंजन, विनोद,श्रृगांर,या मैफिलीत थांबत नाही तर ही कविता मानवमुक्तीचा जाहिरणामा मांडते.या कवितासंग्रहातील प्रस्ताविकेत राजेश मडावी लिहितात की,"प्रब्रम्हानंद मडावी यांच्या कविता भन्नाट कल्पना व भाव सौंदर्यात कमी पडत असतील, मात्र आदिवासींचा स्वशोध आणि व्यवस्थेविरूध्दचा एल्गार अचूक आहे." हे वास्तव योग्य आहे.यातील काही कविता व्यक्तीविशेषत्वाने लिहल्या आहेत. भुजंग मेश्राम,जयपालसिंग,व्हेरिअल एल्विन,चार्वाक, कृतीप्रेरक लोकराजा, बुध्द, जॉर्ज प्लॉईड,येशू,लिंगो,डलहौसी,फादर स्टँन स्वामी या कवितातून मानवीय इतिहासाचा पट प्रस्तुत केला आहे.इतिहासातील आदर्श जाणून घेतले आहे.यामुळे ही कविता भूतकाळातील शक्तीस्थळे ओळखून भविष्यातील दिशेनं वाटचाल करते ही अत्यंत क्रांतीदर्शी व दुरदर्शी अवस्थांतर आहे.नवे शब्द नवी ऊर्जा प्रस्फोटीत करणारी ही कविता बुध्द् विचारांची अग्नीज्वाला पेरत आहे. बुध्द या कवितेत ते लिहितात की,
या कवितेतून बुध्दाला कोणत्या धर्मात जातीत बांधता येत नाही.त्याचा सम्यक प्रकाश कोणालाही थांबता येणार नाही.ही अभिव्यक्ती नवसृजनत्वाची नवी आशा आहे.आदिवासी समाजाने पूढे कोणती भूमिका घ्यावी यांची स्पष्टता व्यक्त करणारी ही कविता मूल्यसापेक्ष समाजव्यवस्था निर्माण करण्याचे आव्हान करत आहे.आदिवासी समाजाने आपले आदर्श शोधाले पाहिजे.रूढीपरंपरेचे हिंदूसंस्काराला मुठमाती देऊन जगातील आदिवासी समाजासोबत आपले नाते विणले पाहिजे.जयपालसिंग हे कवीला नवी प्रेरणा देतात.त्याचे कार्य अजूनही आदिवासी बांधवापर्यंत पोहचले नाही ही खंत कवीला आहे. समाजाला जयपालसिंगच्या कार्याची खरी गरज आहे.जयपालसिंग कवी या कवितेत लिहितात की,
आदिवासी समाजाने आता प्रस्थापित पक्षाच्या दावणीला न जाता स्वःताचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे.जयपालसिंगचा संघर्ष आपल्या जगण्याची प्रेरणा ठरली पाहिजे.बफरझोन हा कवितासंग्रह अत्यंत आशयवर्धित व मूल्यसापेक्ष असून या कवितेला सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक असे विविध पैलूने रेखांखित केले आहे. आपल्या मनोगतात कवी लिहितात की,"संवेदनशील कवीला स्वतःसकट समुहाच्या आंतरिक वेदना, दुःख,शोषण ,अन्याय,आक्रोश,विद्रोह ,यासह व्यक्त होण्याचे माध्यम म्हणून कविता महत्वाची वाटते.त्यासाठीचं हा शब्दांचा जागर आहे." हे विचार कवीची कवितेविषयी बांधिलकी व्यक्त करते. या कवितेतील कंगोरे वाचकाला नवी ओळख करून देते.या कवितासंग्रहातील शक्तीस्थळे अत्यंत मजबूत आहेत.फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचे क्रांतीतेज ल्यालिली ही कविता नव्या दिशेनं जाण्याचे आव्हान करते.वर्तमान काळातील बनावटीचे सारे षडयंत्र हानून पाडते. टाळेबंदी, कोरोना, गैरसमज, वास्तव, निसर्गचक्र,जुमला, लोकशाही, बाजारभाव, घरकुल या कवितातून वर्तमान काळातील लोकशाहीची होणारी वाताहात रेखांखित करते.जुमलेबाज सरकारच्या फसव्या डावावर प्रहार करते.जुमला ही कविता उद्रेकाची ज्वाला व्यक्त करते कवी म्हणतो की,
प्रब्रम्हानंद मडावी हे चळवळीतील कवी आहेत. ते अनेक परिवर्तनवादी चळवळीला आपली कार्यऊर्जा मानतात.ते फक्त आदिवासी चळवळीतच गतिमान नाहीत तर फुले शाहू आंबेडकर यांच्या चळवळीमध्ये ते सक्रिय आहेत. म्हणून ही कविता क्रांतीकारी विचाराच्या रसायनाने संपृक्त झाली आहे.दिशा ह्या कवितेत ते लिहितात की,
हा कवितासंग्रहा मानवमुक्तीचा जाहिरणामा आहे.मानवाच्या विविध मनोभावनेचे विश्लेषण यात दिसून येते.आज सारा देश अंधाऱ्या काळोखात ठेचाळत असतांना समाजाला नवा जोश व नवा प्रकाश देण्याचे काम ही कविता नक्कीच करत आहे . भांडवलदारी व्यवस्थेने सारी यंत्रणा कवेत घेतली आहे.माणसाच्या विचारांचे बोन्साय केले जात आहे.आदिवासी, दलित, पिडित, वंचित, शेतकरी,कामगार,स्त्री यांचे शोषण केले जात आहे.आदिवासी महिलावर अत्याचार केले जात आहे. धर्माची अफू देऊन मेंदूला गुलाम केले जात आहे.आदिवासी समाजाने आता गप्प राहून चालणार नाही तर अन्यायावर उठाव केलाच पाहिजे,आपल्यातील बिरसा व तंट्या जागा झाला पाहिजे .लिंगोचे तत्वतेज प्रगटले पाहिजे.काकोची संघर्षतत्व रक्ततात पेटले पाहिजे.आदिवासी जल, जंगल व जमीन यापासून विस्थापित होत आहे.बफरझोनच्या नावाखाली आदिवासीवर अन्याय केला जात आहे. सैवंधानीक अधिकारापासून वंचित केले जात आहे.यावर कवी त्वेषाचा अग्नी बनले आहेत.पाखरं या कवितेतून माणूस व पाखराचा अन्योन्य संबंध विस्तारला आहे.
ही अप्रतिम कविता बदलत्या जैवविविधतेतील धोके उजागर करते.पर्यावरणाचा होणारा ऱ्हास हाच माणूस समाप्तीचा पाया आहे ह्या कवितेत व्यक्त झाला आहे.बफरझोन म्हणजे निर्माणुष मरूद्यानाचे खांडरयुक्त क्षेत्र.
बफरझोन हा कवितासंग्रहातील अनेक कविता आशयपुर्ण व वास्तवगर्भी आहेत.कवीची दृष्टी नैतिकतेच्या बळावर निरीक्षणे नोंदवते .ह्यातील कविता अत्यंत साध्या आणि सोफ्या आहेत.कवितेतील आशयमात्र हिमालयएवढा उत्तुंग आहे.काही कविताचे आकृतीबंध विस्कळीत वाटतात.यामध्ये काही मर्यादा व उणीवा दिसत असल्या तरी त्याचे प्रमाण नगण्य आहे.पुढील कवितासंग्रहात याची सुधारणा नक्कीच होईल अशी आशा आहे.हा कवितासंग्रह जीवनाला गतिमान करणारा आहे. उध्दवस्त छावनीला नवा आयाम देणारा आहे.आदिवासी बांधवाच्या चळवळीला दिशा दाखवणारी आहे.तथाकथित,स्वातंत्र्य,प्रेरणा,काको, साहित्य, पुनर्जन्म, गैरसमज, विश्वास, आस, गोठूल, या कवितेची उंची मोठी आहे. मानवी मनाच्या भावबंधनाचे स्पंदन टिपणारी ही कविता नवी प्रमेयाची मांडणी करते. आदिवासी समाजाने वाचन समृध्द व्हावे यासाठी प्रयत्न करते.माणूस ही कविता वाचनसंस्कृतीला वाढवण्याचे आव्हान करते.या कवितेत कवी लिहितात की,
ही कविता वाचकाला अंतर्मुख करते.आज मोबाईलच्या वेडानं वाचन थांबले असले तरी पुढची आपली क्रांती आंबेडकरी ऊर्जाबलातूनच होणार आहे . इतिहासाच्या साक्षीनं आपण आपली लढाई सुरू करू या .वनवासीचे भ्रमिष्ठ जाळे जाळून टाकू या.भारतीय संविधानाची महाऊर्जा उरात घेऊन समतेची नवी पहाट उगवू या.हा कवितासंग्रह वाचकाला नवक्रांतीची चेतना देणारा आहे.माणसातील माणूसकीचे नाते घट्ट करणारा आहे.ही कविता उध्दवस्त होणाऱ्या मनाला नवी ऊर्जा देणारी मूल्यसंहिता आहे.क्रांतित्वाची अजिंठा खोदणारी ही कविता मूल्यसापेक्ष समाजाचा आरसा आहे. हा कवितासंग्रह हरिवंश प्रकाशन,चंद्रपूरने प्रकाशित केला आहे.कवितेचे उत्कृष्ट मुखपृष्ट भारत सलाम यांनी चित्रित केले आहेया कवितासंग्रहाचे मूल्य १७५ रूपये आहे.कविने अत्यंत बिकट परिस्थितीत व कँसर आजारातही आपली कविता सातत्याने फुलवली , प्रज्वलीत केली याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो,दिर्घ आयुष्या साठी मंगलकामना देतो.पुढला कवितासंग्रह नव्या स्वप्नांच्या क्रांतीचा वेध घेणारा असेल अशी अपेक्षा करतो.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या