अवतीभवतीची परिस्थितीच कवीची जडणघडण करीत असते .हा भोवताल जितका कोरडा तितकेच वेदनांच्या काटेरी झुडपांचे अडथळे पार करीत असतांना आलेले अनुभव हृदय पिळवटूनन टाकणारे. राज्य परिवहन मंडळाच्या सततच्या कोलाहली जीवनात अनेक चाकोरीतून कवितेची एस.टी बस तिळगंगा नदीच्या खळखळ वाहणाऱ्या जलधारांच्या हिरव्यागार वनराईतून कोल्हापूर मार्गे कोकणच्या नयनरम्य निसर्ग सौंदर्यानी नटलेल्या सागरी लाटांच्या भरती ओहटीच्या जललहरीत, मोहित करणाऱ्या सिंधुदूर्गच्या शिवभुमीत कवितेला अंकुर फुटु लागले.
मधु मंगेश कर्णिक, विद्याधर भागवत सर, उषा भागवत, आ.सो.शेवरे, विद्याधर करंदीकर, अानंद वैद्य, प्रा.प्रवीण बांदेकर, अजय कांडर, मधुसुदन नानिवडेकर, दयासागर बन्ने यांच्या सारख्या दिग्गज साहित्यिकांच्या सहवासात मनातील कविता फुलत गेली. झुलत गेली. मनातील खंत, सल, आनंद, शल्य शब्दरुपाने कागदावर नाचू लागली आणि आनंदहरी कवी म्हणून त्यातून घडत गेले. त्यांची कविता वाचतांना अनुभव संपन्नतेने प्रतिमा प्रतिभेच्या संदर्भात लेण्यानी सजवली गेल्याचे प्रत्ययास येते. माणसाच्या जगण्यातील निराशावाद जाऊन आशेची किरणे मानवी हृदयपटलावर प्रतिबिंबित होऊन जीवन जगण्याची जिद्द निर्माण करते म्हणूनच त्यांची कविता मानवी जीवन, निसर्ग, अवतीभोवतीचा परिसर, शेती, गाव, गावातील माणसे, त्यांचे बदलणारे व्यवहार, घर, सुख- दुःखाचे क्षण, राजकिय वातावरण, स्त्रियांच्या आयुष्यातील भयावहता, दैनंदिन जीवनातील हिंसाचार, जगण्यातील अस्वस्थता, दुष्काळ, पूर, द्वेष, तिरस्कार, मनांचा कोंडमारा अशा अनेक विषयांच्या आसाभोवती कवीची कविता फिरत राहते आणि स्वतःच्या अस्तित्वाचे परिघ निर्माण करते. याचमुळे आनंहरी यांच्या कवितांचे वेगळेपण प्रकर्षाने जाणवत राहते. आनंदहरी व्यक्ती आणि कवी म्हणूनही अनुभव संपन्न अाहेत. ही अनुभव संपन्नता त्यांच्या मुक्तकाव्य छंदात्मक कवितेतून स्पष्टपणे जाणवते. कवितेची लय चढत्याक्रमाने चढत जाते. त्याशिवाय वारकरी संप्रदायाचा प्रभाव त्यांच्या कवितांवर जास्त असल्याचेही काही कवितांतून जाणवते म्हणूनच संत तुकारामांच्या अभंगात हा कवी रममाण होतो. त्यांच्या अभंग विचारांची झलक कवितेत आपोआपच येते.
"मी साधेच शब्द लिहिले साध्या माणसांच्या कवितेचे " या कवितेत, पंडितांसारखे लिहिता अाले नाही तरी प्रतिष्ठेच्या भेदाचे अंतर राहू नये, दुःखातून प्रार्थनेचे स्वर गात ज्याला व्यक्त होता येत नाही त्याच्याचसाठी शब्द बोलत राहवेत आयुष्यभर असे कवी म्हणतो. माणसांची मने वेगळ्या रंगात रंगू लागली अाहेत. माणसे बदलत चालली अाहेत ते आयुष्याशी खेळ करीत आहेत, नाती दुरावत चालली आहेत या साऱ्याची खंत कवीला सतावते. तरीही 'मन वारकरी झाले' या कवितेत,
याचीही प्रचीती कवीला येते. पुरुषसत्ताक अंहकारात स्त्री दासी बनून जाते याही दुःखाच्या वेदनेचे तरंग कवितेत उमटत राहतात. अशा स्थितीतही कवीचा अाशावाद कौतुकास्पद आहे.
अशी अपेक्षाही कवी करताना दिसतो, रस्त्यावरचे टोळकं सामान्यांना सतावते त्यांच्यासाठी ते काहीही करु शकत नाहीत. सामान्य माणसाला अशा धिंगाणा घालणाऱ्यातूनच जावे लागते. अशा प्रकारे कवितेत आजचे अस्वस्थ करणारे वास्तव नेटक्या आणि संयमी स्वरूपात व्यक्त झाल्याचे दिसून येते. *"मी तसा की असा?"* म्हणत प्रेमाच्या भाषेचा शोध घेत कवी घेत राहतो. गाव सुने सुने झाल्याची वेदनाही कवी आपल्या कवितेत शब्दबद्ध करून बदलत्या समाजजीवनाची जाणीव करून देतो. ऊस तोडणाऱ्या, आपल्या दारिद्रयावर घाव घालत राहणाऱ्या ऊसतोड कामगार स्त्रीचे दुःखही मांडताना कवी म्हणतो,
"दाटते मनात भय" या कवितेत निवडणूकीची चाहूल कशी छळत येते ते सांगतो. लोक अंधश्रद्धेत कसे अडकतात ते भारद्वाजाचे उदाहरण देऊन कवी सहज, सोप्या शब्दांत निदर्शनास आणतो.शेतातील बांध आधुनिकीकरणात नष्ट होत आहेत. आजही माणसा-माणसात भेदभावाच्या बाह्यांगी दिसून न येणाऱ्या कुपाडी आहेतच. संवाद कमी झाला आहे..शब्दाचा दुष्काळ पडत आहे. असे कितीतरी विषय घेऊन कवीची कविता येते. कवीला आपल्या शब्दकोशातून "बायपास " हा शब्दच काढून टाकावा वाटतो.
असा स्वयंभू होण्याचा, परावलंबित्व त्यागण्याचा विचार कवितेत दिसून येतो उन्हांनेच अापलेपणाची पिके वाळत आहेत, दुष्काळाची झळ आम्हीच सोसतो, उपाशी राहतो, पाण्यासाठी पायपीट करतो,महापूर सोसतो,मात्र याची कोणीच दखल घेत नाही खाणा-याची झोळी भरते हे सारे पाहून कवी "लखलाभ तुम्हाला "असे उपरोधाने म्हणतो. अपेक्षाचे ओझे वाहत राहतो.त्याना धर्माची परिभाषा सतावते.वेदनेचे घोडे घायाळ करतात.त्यांना समाजात विषवल्ली रूजू द्यायची नाही.तर ते कष्टाची पूजा करतात हातावरच्या रेषेवर त्यांना विश्वास वाटत नाही. इथला अर्जुन हतबल आहे,पिक मातीमय होत आहे, विवेक संपत चालला आहे हे वास्तव चित्र आहेच पण तरीही उद्याचा उषःकाल ही कोणीतरी गिळून टाकू नये असे कवीला वाटते.
आपल्या "कविता" या कवितेत "चुरगाळून टाकते क्षण क्षण कवितेचे कागद चुरगाळून टाकावा तसे लिहू लागते नव्याने स्वतःच्या जीवनाची कविता" असे म्हणून कवी पुन्हा स्वावलंबीत्वाचा विचार मांडतो. अंधारगर्भ, वन्ही, चिरा, निसणत, मोगणा, वंजळ, खोलवर, चंदी, चौखूर, निर्दालन, गोचडी, चळत, खदखद, शेंदता, कोंडमारा, उसासल्या, पाखडकणी, पासोडी अशा अनेक ग्रामीण शब्दाची वीट चपलकपणे कवितेत चढवत कवितेची उंची वाढवतांना त्याच्या प्रतिभेची, प्रतिमांची, उत्त्तम यमकाची झलक दिसून येते. "तिळगंगा" ही कविता फारच अप्रतिम आहे. मन वारकरी झाले, सुनेसुने गाव, कुपाडी, लखलाभ तुम्हांला, कविता, तिळगंगा, अश्वत्थामा, उतावडा, बरं झालं असतं या आणि अशा अनेक कविता पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा आहेत. हा कविता संग्रह साहित्य क्षेत्रात मानाचे स्थान निर्माण करेल अशी अपेक्षा करुन साहित्याची सेवा आनंदहरी कडून अशीच उत्तम व्हावी हीच सदिच्छा.. !
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या