Header Ads Widget

जिल्ह्यात 305 सौर कृषी पंप कार्यान्वित

    मेळघाटातील दुर्गम भागातील शेतीला लाभ

    अमरावती : शेतीत तंत्रज्ञान, नवीन व नवीकरणीय ऊर्जेचा उपयोग केल्यास कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वृद्धी होऊ शकते. हे लक्षात घेऊन शेतीला अखंडित सिंचनासाठी अटल सौर कृषी पंप योजनेची जिल्ह्यात भरीव अंमलबजावणी करण्यात येत असून, 305 सौर कृषी पंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. वीज पोहोचू न शकलेल्या मेळघाटातील दुर्गम भागातील शेतीला या योजनेचा विशेष लाभ होत आहे.

    सौर उर्जेची साथ मिळाल्यामुळे भारनियमन, वीज कपात किंवा नैसर्गिक आपत्तीने होणारे नुकसान यामुळे बाधित होणारे सिंचन अविरत सुरू राहण्यास मदत होते. राज्यात अटल सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) यांच्यामार्फत राबविण्यात येते. त्याअंतर्गत 305 सौर पंप जिल्ह्यात कार्यान्वित आहेत.

    योजनेत तीन/पाच एचपी अश्वशक्ती (ए.सी. व डी.सी.) क्षमतेचे सौर कृषी पंपाचा समावेश करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरून अनुदानित पंप मिळतो. अल्पभूधारक आणि दुर्गम भागात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानावर आधारित असलेल्या सौर कृषी पंप देण्याच्या योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांना मिळत आहे. सौर कृषी पंपामुळे शेताच्या विहिरीत असणारे पाणी वीजेशिवाय पिकापर्यंत पोहोचू शकते. रात्रीच्या अंधारातील दुर्घटनापासून तसेच भारनियमन आणि वीज बिलापासून मुक्तता मिळते. नैसर्गिक आपत्तीपासून या सौर पंपाला विमा संरक्षणही देण्यात आले आहे. या योजनेत अतिदुर्गम भागातील, विद्युतीकरण न झालेल्या भागातील, विद्युतीकरणासाठी वनविभागाचे ना हरकत प्रमाणपत्र न मिळणारा शेतकरी, महावितरणकडून तांत्रिकदृष्ट्या वीज जोडणी अशक्य असलेला शेतकरी, महावितरणकडे वीज जोडणीसाठी अर्ज केलेले परंतु वीज कनेक्शन मिळू न शकलेले असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या