- पिंपळखुटा/स्वाती इंगळे
येथील सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेले संदीप ओंकारराव गायके आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सीमा गायके (नायब तहसीलदार) यांचा गावकऱ्यांच्या वतीने शाल,श्रीफळ देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला.संदिप गायके नुकताच सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले. त्यापर्वावर त्यांचे पिंपळखुटा गावात आगमन होताच त्यांचे ढोल-ताशाच्या निनादात स्वागत करण्यात आले तसेच गावातून भव्य मिरवणूक काढन्यात आली. मिरवणुकी दरम्यान गावातील महिलांनी ठिकठिकाणी औक्षवंत करून त्यांना शुभेच्छा व आशीर्वाद दिलेत.तद्नंतर एका शानदार समारंभात त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी विचारपीठावर सरपंच दिलीप राऊत, उपसरपंच पद्मा मेश्राम, पोलीस पाटील शारदा गायके, ज्येष्ठ शिक्षक डी. आर.डेरे, प्राचार्य डॉ.सुभाष मुरे, डॉ.नरेश इंगळे, प्राचार्य रामेश्वर नागपुरे, प्रमोद घोळके तसेच सैन्यदलातील सैनिकांच्या वीरमाता शीला गायके,चंदा चौधरी,मंदा बुराडे,सौ उके आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी संदीप गायके यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करीत उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिलेत. तसेच गायके यांनी सैन्य दलात आलेले अनुभव विषद करतानाच देश रक्षणासाठी तरुणांनी सैन्यदलात सहभागी होण्याचे आवाहन केले.यावेळी सेवानिवृत्त शिक्षक श्री ज्ञानेश्वर रामकृष्णजी डेरे यांचाही सेवानिवृत्त बद्दल शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन गावातील युवक मंडळीनी केले होते. कार्यक्रमाला गावातील गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सूत्रसंचालन अमित राऊत तर आभारप्रदर्शन प्रा प्रशांत टांगले यांनी केले.