अमरावती : सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात सीसीटीव्हीचे नेटवर्क उभे राहणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनातून टप्प्याटप्प्याटप्प्याने निधी मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. खासगी आस्थापनांनी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे बंधनकारक आहे. त्यादृष्टीने कलम १४४ नुसार आदेश निर्गमित करावा. अशा यंत्रणांची माहिती संकलित करून मॅपिंग करावे, असे निर्देश गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आज येथे दिले. सायबर गुन्हे रोखण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात टेक्नोसॅव्ही तरूण कर्मचा-यांना प्रोत्साहित करून तशी जबाबदारी सोपवावी, अशीही सूचना त्यांनी केली.
अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या कामांचा आढावा गृह राज्यमंत्री श्री. पाटील यांनी आज आयुक्तालय येथे घेतला, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, एम. एम. मकानदार यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले की, कोरोनाकाळात पोलिसांनी अत्यंत महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. संचारबंदीनंतरच्या काळात जनजीवन पूर्वपदावर येऊन सर्व क्षेत्रात व्यवहार सुरू झाले आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अधिक सजग राहून काम करावे. सायबर सुरक्षिततेवर भर द्यावा.गुन्हेसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी पोलिसांकडून होणाऱ्या प्रक्रियेबरोबरच न्यायालयीन प्रक्रियेत शासकीय अधिवक्त्यांची भूमिका महत्वाची असते. त्यानुसार त्यांच्याशी समन्वय ठेवून गुन्हेसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
—–