अमरावती : वाहतूक पोलीस सार्वजनिक ठिकाणी दिवसभर कर्तव्य निभावत असतात. त्यांना स्वच्छतागृहे उपलब्ध नसल्यामुळे अडचण होते. विशेषत: महिला पोलीसांची जास्त गैरसोय होते. हा थेट आरोग्याशी निगडित प्रश्न आहे. त्यामुळे वाहतूक पोलीसांसाठी स्वच्छतागृहे असावीत. मोबाईल स्वच्छतागृहांची सुविधाही देता येणे शक्य आहे. तशी तरतूद व्हावी, अशी मागणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केली. महिलांसाठी शहर पोलीसांतर्फे 24 तास मदत कक्ष सुरु करण्यात आला. त्याबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!अमरावती परिक्षेत्राबाबत सादरीकरण श्री. मीना यांनी केले. अमरावती परिक्षेत्रात २५ उपविभाग, १३१ पोलीस ठाणी आहेत. विभागात गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी २०२० मध्ये ६७ हजार १५९ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. २०२१ मध्ये सप्टेंबरपर्यंत ५३ हजार ९७४ प्रतिबंधात्मक कारवाया केल्या. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली. अमरावती जिल्ह्यात महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी जनजागृतीपर रक्षादीप उपक्रम व पोलीस हेल्थ ऍप, अकोला जिल्ह्यात एक गाव एक पोलीस योजना, आधुनिकीकरणासाठी तंत्रज्ञानाचा वापर, वाशिम जिल्ह्यात स्टुडंट पोलीस कॅडेट, अंमली पदार्थ मोहिम, बुलडाणा जिल्ह्यात एटीएम चोरी उत्कृष्ट तपास, यवतमाळ जिल्ह्यात एटीएम क्लोनिंग, एटीएम गॅस कटिंग याबाबत उत्कृष्ट तपास आदी वैशिष्ट्यपूर्ण कामे झाली. विभागांतर्गत कोविड साथीत 196 अधिकारी व 1548 अंमलदार बाधित झाले. या काळात 19 कार्यरत कर्मचाऱ्यांचे निधन झाले, असे श्री. मीना यांनी सांगितले.
आयुक्तालयांतर्गत कामकाजाबाबत सादरीकरण पोलीस आयुक्त डॉ. सिंह यांनी केले. आयुक्तालयांतर्गत १० पोलीस ठाणी आहेत. ‘एससीआरबी’च्या अहवालानुसार, डिसेंबर २०२० पर्यंतच्या आकडेवारीनुसार अमरावती आयुक्तालयांतर्गत गुन्हे सिद्धीचे प्रमाण ९०.४८ टक्के राहिले. दोषसिद्धीबाबत अमरावती आयुक्तालय राज्यात अग्रेसर आहे. सायबर गुन्हे व धोके यापासून दक्षता व जनजागृतीपर पुस्तिका प्रसिद्ध केली. व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम, पोलीस पेट्रोलिंग सिस्टीम, ई लायब्ररी निर्माण करण्यात आली. सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंग गुन्ह्याचा तपास ७२ तासांत पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले, असे डॉ. सिंह यांनी सांगितले.
अमरावती पोलीस आयुक्तालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती अभियान, सन्मान या दोन पुस्तिकांचे प्रकाशन गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
—–