- तुयासाठी मायबापानं
- आयुष्यात केली मरमर
- तुयीचं सारी होती कायजी
- आयुष्य निंगूंन गेलं झरझर
- बिमार तु रायस बाबू
- डोयाले डोया नसे
- भूकतान का काजून
- डोये वटारून बसे
- आता त्याहीच्या जीवाची
- संध्याकाय झाली बाबू
- हातपाय थरथराय लागले
- आता रायलं नाई काबू
- मायबापाचे पाय बनून बाबू
- तु आधार त्याहीचा होजो
- बनून हात त्याहीचे
- तु तोंडात घास देजो
- तोंडातल्या दातायनं
- कवाच घेतली सुट्टी
- दातायनं घासासंग
- घेऊन टाकली कट्टी
- मनून त्याच्यासाठी बाबू
- तु दात बनून पायजो
- आधार घेऊन खलबत्त्याचा
- तु कुटून खावू घालजो
- आंघोयीले बसन तवा
- तोल जाईल त्याहीचा
- निसटून जाईल हातातून
- मग्गा घेतला पान्याचा
- हातात साबू घेऊन बाबू
- आंघोय करून देजो
- लोकं हासतील मनून
- लाज बाजुले ठेवजो
- सोता उभं राहून कपडे
- घालता येनार नाई
- पायातली वहानबी
- बसवता येनार नाई
- लेकरं तुहे समजून बाबू
- तु कपडे चढवून देजो
- बुट घालून देतं तसंच
- चप्पलबी घालून देजो
- म्हतारपन मोठं इचित्र
- सुटते त्याहीले बडबड
- खरी गोम इथंच हाय
- होतच असते गडबड
- लान लेकरू समजून बाबू
- बोबडे बोल तु बोलजो
- बायकोले सांगजो समजून
- नाकान कांदा नको सोलजो
- पायना बांदला तुयासाठी
- पायना गीत त्याहीनं गायलं
- डोये उघडे हाये का? बंद
- झोपीतून उठून पायलं
- जमलंच तर मनतो बाबू
- पायना बनवून तु घेजो
- लेकरु तुवं समजूनच
- झोके त्याहीले तु देजो
- सारं काई भेटन राजा
- मायबाप भेटनार नाई
- इतंतितं फिरुन पायशीन
- सरवीकडं दिशा दाही
- तेरवी नको करु बाबू
- पिंडदान नको करजो
- मेल्यावर सारं करन्यापक्षा
- जितेपनीच खायले घालजो
- पी के पवार (शिक्षक)
- सोनाजी महाराज हायस्कूल
- सोनाळा
- ता संग्रामपूर जि बुलढाणा
- ९४२१४९०७३१
(Images Credit : Lokmat)
Contents hide