अमरावती :महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या जागतिक पहिल्या महाकाव्यग्रंथाचे प्रकाशन दि.२० ऑक्टोबर,२०२१ रोजी श्री संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मा.डाँ.दिलीप नामदेवराव मालखेडे यांच्या हस्ते प्रा.अरविंदकुमार मनोहर, प्रा.अरुण बा.बुंदेले,प्रा.डॉ.गजानन हेरोळे,प्रकाशदीप वानखडे, कांतिभूषण खडसे, प्रा.डॉ.प्रमोद खाडे,शिवा प्रधान,सदानंद जोशी, अँड.भूषण खडसे ,शालिनीताई मांडवधरे या मान्यवर कवी,लेखक, गीतकार,गायक यांच्या उपस्थितीत कुलगुरुंच्या दालनात उत्साहात संपन्न झाले.
प्रकाशनापूर्वी उपस्थित मान्यवर कवींनी कुलगुरू मा.डाँ.दिलीप ना. मालखेडे यांचा शाँल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन मनोभावे सत्कार केला. शब्ददान प्रकाशन, नांदेडचे प्रकाशक,संपादक,३७ ग्रंथाचे लेखक, २०१२ मध्ये स्वत:च्या २०१२कवितांच्या “इंडिया बुक आँफ रेकाँर्ड” मध्ये नोंद झालेल्या “माझ्या मरणाआधीचा जाहिरनामा” या भारतातील पहिल्या महाकाव्यग्रंथाचे कवी प्रा.अशोककुमार दवणे यांनी दोन वर्षे अथक परिश्रम घेऊन जगातील सर्वात मोठ्या २०२१ कवींच्या तीन पिढ्यातील ” विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्र , महान कार्य व तत्त्वज्ञानावरील” २०२१ कविता व काव्यगीतं असलेल्या आणि २१८४ पृष्ठसंख्या असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथाचे संपादन करुन त्याचा ऐतिहासिक प्रकाशन सोहळा दि.२० ऑक्टोबर ,२०२१रोजी एकाच दिवशी ३६ जिल्ह्यामध्ये मा. जिल्हाधिकाऱ्यांच्या व अकरा विद्यापीठामध्ये मा.कुलगुरूंच्या हस्ते तेथील मान्यवर कवींच्या उपस्थितीत योग्य नियोजन करुन संपन्न झाला.या वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशन सोहळ्याची व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथाची नोंद गिनीज बुक आँफ वर्ल्ड रेकाँर्ड मध्ये होणार आहे.
हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा संपादित महाकाव्यग्रंथ आहे. अमरावती जिल्ह्यातील ९३ कवींच्या डाँ.बाबासाहेब आंबेडकरांवरील कविता व काव्यगीतं आहेत. या महाकव्यग्रंथाला महाराष्ट्रातील व इतर राज्यातील ३६ जिल्ह्यातील ५२ मान्यवर साहित्यिकांचे अभिप्राय असून अमरावती जिल्ह्यातील साहित्यिक प्रा.डाँ.गणेश टाले व प्रा. डाँ.अशोक पळवेकर यांचे अभ्यासपूर्ण अभिप्राय आहेत. या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथाचे संपादन करून प्रकाशित केल्याबद्दल प्रा.अशोककुमार दवणे यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून व इतर राज्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.