मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात विशेष मोहिमा
अमरावती : भारत निवडणूक आयोगाकडून दि. 1 जानेवारी, 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या युवक व युवतींनी मतदार म्हणून नोंद मतदार यादीत करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, तसेच दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत विशेष मोहिमा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिली.
नवतरूणांनी मतदार म्हणून नोंदणी करून घ्यावी, तसेच पात्र असूनही मतदार यादीत नाव नसलेल्यांनी तशी नोंद करून घ्यावी. त्याचप्रमाणे, स्थानांतरित मतदार, निधन झालेल्या मतदारांसंदर्भात त्यांच्या नातेवाईकांनी आवश्यक माहिती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना देऊन नावे वगळण्यासाठी सहकार्य करावे. मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी आपले छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांकडे किंवा मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांचे कार्यालयात जमा करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.
विशेष मोहिमा घेणार
या कार्यक्रमात दि. 13 व 14 नोव्हेंबर या दोन दिवशी, तसेच दि. 27 व 28 नोव्हेंबर या दोन तारखांना मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमा घेण्यात येतील. यादिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रावर हजर राहून पात्र व्यक्तींचे मतदार नोंदणीसाठी अर्ज स्वीकारतील. यावेळी आवश्यक नमुन्यात अर्ज दाखल करून नवीन मतदार नोंदणी तसेच मतदार यादीसंदर्भात इतर कामे नागरिकांनी करून घ्यावीत. ‘एनव्हीएसपी’ आणि मतदार सहायता ॲपच्या माध्यमातूनही मतदारांना यादीत नाव नोंदविता येईल. हे ॲप अँड्रॉईड व आयओएस या दोन्हीवर उपलब्ध आहे. तसेच राजकीय पक्षांनी नेमलेल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना आवश्यक ते सहकार्य कारावे. असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले आहे.
—–