अमरावती: सोयाबीन हे जिल्ह्यातील महत्वाचे पीक असून,उत्पादन वाढीसाठी अद्ययावत तंत्रज्ञान व संशोधनाचा लाभ शेतकरी बांधवांना मिळवून द्यावा,तसेच कृषी प्रक्रिया उद्योगांनाही चालना द्यावी,असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
कृषी विभाग व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे सोयाबीन पीक शेतकरी मेळावा व शिवार फेरी कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत वलगाव येथे झाला,त्यावेळी त्या बोलत होत्या. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री ऍड. ठाकूर म्हणाल्या की,जिल्ह्यात सोयाबीनच्या बियाणे उपलब्धतेसाठी पेरणीच्या काही महिने आधीपासून परिपूर्ण नियोजन करण्यात आले. सोयाबीन उत्पादकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्याचे निराकरण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न होत आहे. कृषी तज्ज्ञांनीही अद्ययावत संशोधनाचा लाभ शेतकरी बांधवांना करून द्यावा. गावोगाव मार्गदर्शनपर मेळावे घ्यावेत.कृषी प्रक्रिया उद्योगांनाही चालना द्यावी,असेही निर्देश त्यांनी दिले.
विद्यापीठाच्या संशोधन केंद्रातर्फे यलोगोल्ड,सुवर्ण सोया,अंबा,पूर्वा आदी वाण विकसित केल्याचे डॉ. भाले यांनी सांगितले.शेतकरी बांधवांना मार्गदर्शनपर पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाले. शिवारफेरीचा कार्यक्रमही यावेळी झाला.