
कविसंमेलनात कवयित्री सरिता सातारडे यांच्या “अस्वस्थतेचे संदर्भ” ई-बुक काव्यसंग्रहाचे व कवयित्री अस्मिता मेश्राम,पुष्पांजली यांच्या “प्रियवंदा” काव्यसंग्रहाचे प्रकाशन
अमरावती: विचार यश मासिक व शाक्यसिंह बुध्दिष्ट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आॅनलाईन काव्यसंमेलन दि.१४/१०/२०२१ ला कवयित्री सरिता सातारडे, नागपूर यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाले. बौद्ध व आंबेडकरी विचारधारा व मातृसंघटनेचे प्रचारक, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते “The Champ” या नावाने लेखन करणारे पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत मा.राजेश देशमुख यांच्या हस्ते नागपूर येथील कवयित्री,लेखिका सरिता सातारडे यांच्या *अस्वस्थतेचे संदर्भ या* हिंदी/मराठी ई -बुक काव्यसंग्रहाचे या आॅनलाईन काव्यसंमेलनात प्रकाशन झाले व भंडारा येथील अस्मिता प्रशांत ‘पुष्पांजली’ यांच्या *प्रियंवदा* या काव्यसंग्रहाचेही प्रकाशन झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटक; कवी राजेश देशमुख यांनी ‘खरे सांगतो बाबा’ या रचनेत या जातीवाद्यांच्या गळ्यात । एकदा झाडू आणि मडके बांधावे वाटते। ही रचना सादर करून भारतातील सामाजिक विषमतेवर ताशेरेओढले.प्रा.अरुण बुंदेले ,अमरावती यांनी “सम्यक सन्मार्ग। आर्य अष्टांगिक॥ वाट प्रासादिक। जीवनाची॥ ” असे “तथागत “या अभंगाचे गायन करुन बुद्ध धम्माच्या सम्यक सन्मार्गाचे दर्शन घडविले.अस्मिता मेश्राम,पुष्पांजली ,भंडारा यांनी हलाहला ला अमृत करण्याचे सामर्थ्य बुध्दांच्या धम्मामध्ये आहे ,या आशयाची रचना सादर केली.गझलकारा कविता काळे ,पुणे यांनी ‘सोसला त्रास अन ती पुढे चालली/माय माझी रमा धन्य ती माऊली’/ ही रमाई च्या जीवनावरील अप्रतिम गझल सादर केली.विद्रोही कवी अविनाश गोंडाणे यांनी “हे क्रांतिसूर्या आमच्या भंगार आयुष्याला तू आकार दिलास/ मानवनिर्मितीची ही पहिली प्रक्रिया होती, ही रचना सादर केली.मधू माहेश्वरी ,गुवाहाटी,असाम यांनी ,जीना जरूरी या जिंदा रहना । ही रचना सादर केली. पल्लवी जीवनतारे,नागपूर यांनी,”विखुरलो जरी कनाकनात। विसरलो नाही भीमा तुला॥” ही क्रांतिकारी रचना सादर केली.
प्रज्ञा मेश्राम ,नागपूर यांनी भारतीय समाजात महिलांवरून ज्या शिव्या दिल्या जातात त्यावर ताशेरे ओढणारी परखड रचना सादर केली.शालिनीताई मांडवधरे ,अमरावती यांनी इतिहासाचे पान बाबासाहेबांनी पलटविले । आम्हाला दीक्षाभूमिचे दान पदरात दिले ॥ ही रचना सादर केली. विद्याताई निसरगंध,बीड यांनी, अज्ञानाच्या काळोखात मरणयातना सोसत असतांना ।आशेचा किरण दिसत नव्हता ।अशावेळी माणूस बनलो आम्ही फक्त भीमामुळे॥ ही रचना सादर केली.शुभांगी जुमळे यांनी, बाबासाहेबांनी आपल्याला माणसात आणले आणि बुध्दाचा धम्म दिला.सुषमा कळमकर यांनी, बाबासाहेबांनी धम्मदीक्षा विजयादशमीला देऊन दीक्षाभूमी पवित्र केली , ही रचना सादर केली. प्रतिभा साहारे यांनी, माझेच मला दाखवतात अंधाराची वाट। बुध्दं आंबेडकर दारावर आणि मनधरणी देवाची करतात,बावीस प्रतिज्ञेचा लोकांना पडलेला विसर या सर्व गोष्टींवर खंत व्यक्त केली. प्रीतीबाला शामकुंवर यांनी उदध्वस्त झालेल्या मनुष्यत्वात प्राण फुंकले। समता स्वातंत्र्याची नीव ठेवली। चैतन्यरूपी बुध्दाचा धम्म प्रकाशित केला॥ ही रचना सादर केली.अशोकजी पवार यांनी ,खूप जणांनी दगड मांडले । त्या दगडाचे पूजन केले ।आणि हळूहळू या देवाने माणसाचे दगड केले॥ ही वास्तववादी रचना सादर केली.प्रज्ञा मेश्राम, नागपूर यांनी कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन केले तर कविता काळे यांनी कार्यक्रमाचा सुंदर,प्रखर व अोजस्वी समारोप करून आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अस्मिता प्रशांत’ पुष्पांजली’ यांनी परिश्रम घेतले.
—–