घरी अठरा विश्वे दारिद्रय असलेला ताडशिवणीचा एक युवक औरंगाबादला शिकायला जातो. तुटपुंज्या शिष्यवृत्तीवर शिक्षण घेतो. त्याचे परतीचे दोर कापलेले असतात कारण घरी कोणताच आधार नसतो. मग तो स्पर्धा परीक्षेकडे वळतो आणि स्वत:ला सिद्ध करीत मुंबई मंत्रालयात सहसचिव होतो… हा प्रेरक प्रवास आहे सिद्धार्थ खरात यांचा! काळोखातही उजेड पेरणारा हा प्रवास गुणवत्तेला मरण नाही हेच सांगतो. त्याचबरोबर त्यानंतर अधिकाऱ्याची सामाजिक बांधिलकी कशी असावी? याचाही आदर्श स्थापन करतो. त्यामुळेच तो सामाजिक अंगाने ‘आश्वासक’ ठरतो. जाणून घेऊया ‘ताडशिवणी ते मुंबई मंत्रालय’ या सिद्धार्थ खरात यांच्या प्रवासाविषयी…
Thank you for reading this post, don't forget to subscribe!मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील ताड शिवणी हे सिद्धार्थ खरात यांचे गाव. आई रेशमाबाई आणि बाबा रामभाऊ खरात यांच्या कष्टाळू संस्कारात त्यांची जडणघडण झाली. आई अशिक्षित तर वडिल चौथीपर्यंत शिकलेले. पाच बहिणी आणि तीन भाऊ असा मोठा परिवार. वडील सुतारकीचे काम करीत. तोच त्यांचा स्वयंरोजगार. 1968 साली कष्टातून या परिवाराने गावशिवारात थोडी शेती घेतली. त्यातून फार काही उत्पन्न होत नव्हते. प्रत्येक दिवस संघर्षाचा होता. मात्र अशाही स्थितीत सर्व भावंडे शिकली. बहिणीच्या शिक्षणाकडे मात्र दुर्लक्ष झाले. आई रेशमाबाई खूपच कष्टाळू होत्या. त्यांना निसर्गत:च उत्तम आवाज लाभला होता. सतत कष्ट करीत त्यांनी फाटक्या संसाराला सावरले. कष्टातूनच या परिवाराने वाटचाल केली. शेतात सर्वासापा गोळा करणे, मातेरे गोळा करणे, टेंभुर्णीची पाने विकणे, गोटे फोडणे, 1972 च्या दुष्काळात रस्त्यावर काम करणे अशा अनेक कामातून हा परिवार गेल्याची नोंद खुद्द सिद्धार्थ खरात यांनी त्यांच्या आईचे ओव्यांचे पुस्तक ‘रेशमाई’ मध्ये नोंद केलेली आहे. ते वाचून डोळ्यात पाणी येते. १९७२ च्या दुष्काळाच्या झळा साऱ्या महाराष्ट्राने सोसल्या. त्या काळात रस्त्यावर गिट्टी फोडण्याचे काम केल्याचेही सिद्धार्थ खरात सांगतात.
सिद्धार्थ खरात यांचे चौथी पर्यंतचे शिक्षण ताडशिवणीच्याच जि. प. शाळेत झाले. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी नूतन विद्यालय, किनगाव राजा याठिकाणी प्रवेश घेतला. ताडशिवणी ते किनगाव राजा हा आडवळणाचा आठ किलोमीटरचा रस्ता पायी तुडवत ५ वी ते १० वी पर्यंत त्यांनी किनगाव राजाला शिक्षण घेतले. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी औरंगाबादला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे बी. ए. झाल्यावर औरंगाबादलाच मराठवाडा विद्यापीठात त्यांनी इंग्रजी विषयात एम. ए. केले. त्याचबरोबर पत्रकारितेची पदवी परीक्षाही पास केली. तुटपुंज्या स्कॉलरशिपवर शिक्षण घेतले. जीवनाचे टक्के टोणपे, चळवळ आणि समाज हे सारे लोकशिक्षण त्यांना खऱ्या अर्थाने औरंगाबादच्या नागसेनवन भूमीनेचे दिले. एका राजकीय पक्षाच्या युवा आघाडीतही त्यांनी काही काळ काम केले. हाती कोणतेही कौशल्य नसल्यामुळे वर्षभर वैफल्यग्रस्त परिस्थितीत त्यांना गावात सुद्धा रहावे लागले. त्यानंतर परत एकदा औरंगाबाद गाठून आहे त्या शिक्षणाच्या बळावर खाजगी क्षेत्रात काम केले. याच दरम्यान स्पर्धा परीक्षेची तयारी करायला त्यांनी सुरुवात केली व पहिल्याच प्रयत्नात ते पोलीस सब इंस्पेक्टर झाले. नाशिकला पोलिस अकादमीत त्यांनी प्रशिक्षण घेतले. तथापि उच्च पदासाठी परत एकदा राज्यसेवा परीक्षा दिली. त्यानंतर मात्र त्यांची महाराष्ट्र राज्य मंत्रालयात कक्ष अधिकारी या पदावर निवड झाली. पोलिस दलातील सेवेचा राजीनामा देत ते मंत्रालयात रुजू झाले.
आंबेडकरी आंदोलनातला गरिबीचे चटके सोसत धडपडणारा मातृतीर्थाचा एक युवक राज्याच्या मंत्रालयात अधिकारी झाला. या निवडीने त्यांचे सर्वत्र कौतुक झाले. जबाबदारी वाढली आणि जीवनच बदलून गेले. मंत्रालयातल्या नोकरीने सिद्धार्थ खरात यांच्यावर मोठ्या प्रशासकीय जबाबदारीसोबत कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारीही आली. ती आजही ते यथाशक्ती पार पाडत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासकीय नोकरीसोबत रचनात्मक अंगाने जाणारे सामाजिक कार्य त्यांनी सुरू केले आहे. त्यात त्यांना काही प्रमाणात यश तर काही प्रमाणात अपयश आले. मात्र अपयशाने खचून न जाता स्वत:तली प्रयोगशिलता त्यांनी कायम ठेवली. मंत्रालयात एक प्रभावी अधिकारी म्हणून आपल्या कामाने त्यांनी ख्याती मिळविली.
मंत्रालयात रूजू झाल्यावर त्यांच्याच बॅचच्या कर्तबगार कक्ष अधिकारी डॉ. सुवर्णा (निकम) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. हा ठरवून झालेला आंतरजातीय विवाह. सिद्धार्थ खरात यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जात्यंतक विचारांचा वारसा होता. संकटाच्या वादळ वाऱ्यांनी त्यांचे आयुष्य टणक केलेले होते. त्यामुळे लग्नाचा निर्णय घेतांना त्यांना अडचणी नव्हत्या. मात्र अत्यंत स्थीरस्थावर आणि सुरक्षित आयुष्य वाट्याला आलेल्या डॉ. सुवर्णा (निकम) यांनी केलेले धाडस अधिक मोठे आहे. डॉ. सुवर्णा खरात यासुद्धा मंत्रालयात सहसचिव आहेत आणि सिद्धार्थ खरात यांच्याप्रमाणेच त्यांच्याही नावावर प्रशासकीय कामाची विक्रमी नोंद आहे. त्यांचे काम हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. या उभयतांचा प्रवास प्रेरक आणि आश्वासक आहे.
महाराष्ट्र मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण तसेच शालेय शिक्षण विभागात सिद्धार्थ खरात यांनी काम केले. सध्या ते सहसचिव या पदावर असून राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांचे खाजगी सचिव आहेत. ताड शिवणी ते मुंबई मंत्रालय असा त्यांचा सहसचिव पदापर्यंतचा प्रवास प्रचंड कष्टाचा आणि जिद्दीचा आहे. आजच्या तरूणाईसाठी तो नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे. गुणवत्तेला मरण नाही हे अधोरेखित करणारा आहे. निराशेच्या काळोखात सकारात्मकता भरणारा आहे. या प्रवासाविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच मी चळवळीत पडलो. स्वतःच्या जगण्याची भ्रांत असतांना विचारांनी झपाटून गेलो. वयाच्या एका टप्प्यावर मला वास्तवाची जाणीव झाली. समोर काळोख दिसू लागला. त्यामुळे खडबडून जागा झालो आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलो, खूप अभ्यास केला आणि परिक्षेत यशस्वी झालो. आज मला तरी वाटते की सामाजिक जाणीवेचा एक अधिकारी देखील खूप मोठे काम करू शकतो. गरज आहे त्याच्याकडे सामाजिक बांधिलकीची. अनेक मोर्चेकरी, आंदोलकांचे काम तो एकटा करू शकतो. मोर्चे टाळू शकतो. त्यामुळे आजच्या तरुणांनी आंदोलक होण्याऐवजी अभ्यासक होऊन अधिकारी झालेले कधीही चांगले’
सरकारी अधिकाऱ्यांसाठी सुट्टीचा शनिवार, रविवार म्हणजे पर्वणीच. अनेकजण तो पर्यटनात, मौजमजेत घालवितात. मात्र सिद्धार्थ खरात यांची पावले अशा प्रत्येक सुटीत गावाकडे वळतात. गाव खेड्यातल्या मित्रात ते रमतात. प्रयोगशिल कामाचे अनेक विषय त्यांच्या डोक्यात असतात. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांची खटपट सुरू असते. त्यांनी केलेले बव्हंशी प्रयोग शेतकऱ्यांसाठी फलदायी ठरले आहेत. ‘कष्टकरी समुदायाने रचनात्मक कामाकडे वळले पाहिजे. भावनिक गोष्टींपासून तरुणांनी नेहमीच दूर राहिले पाहिजे. भरीव कामाकडे आपला कल असला पाहिजे’, असे ते नेहमी सांगतात.
सिद्धार्थ खरात यांचे मंत्रालयातले दालन अभ्यागतांनी भरलेले असते. गरजवंताला ते आधार वाटतात. आपल्यावरील सामाजिक ऋण फेडण्यासाठी त्यांनी समविचारी मित्रांना जोडून ‘उत्कर्ष फाउंडेशन’ द्वारा गत काही वर्षापासून सामाजिक कार्य सुरू केले आहे. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविले आहे. मध्यंतरी गुरांसाठी चारा छावणी, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी दुध डेअरी सूद्धा त्यांनी उभी केली होती.
सिंदखेड राजा याठिकाणी नुकतेच उत्कर्ष वरिष्ठ महाविद्यालय त्यांनी सुरू केले आहे. यासोबतच इंग्रजी माध्यमाची शाळा, विधी महाविद्यालय आणि बरेच काही रचनात्मक प्रयोग करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याच्या शिक्षण क्षेत्रात दीर्घ काळ काम केल्यामुळे त्यांचा शिक्षण क्षेत्रावर भर आहे.
औरंगाबादच्या नागसेनवन परिसरात सिद्धार्थ खरात यांचे शिक्षण झाले. या भूमीने देशाला अनेक गुणवंत, प्रज्ञावंत दिले. सिद्धार्थ खरात हे त्यापैकी एक. त्यातील अनेकजण आजही नागसेनवनाशी तनाने मनाने आणि धनाने जुळलेले आहेत. समाज माध्यमावर एकत्र येत अशा अनेकांनी कोरोनापुर्वकाळात काम केले. या कामाला व्यापक गती देण्याचे काम सिद्धार्थ खरात यांनी केले. त्यातून पुस्तक वाटप, साहित्य वाटप आणि “कौन बनेगा आंबेडकर नायक?” हे उपक्रम पार पडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखन साहित्यावर आधारित अभूतपूर्व अशा ‘आंबेडकर नायक-२०१९’ ची संकल्पना त्यांनी मांडली आणि नियोजन केले. त्यामुळेच अनेक लोक जोडल्या गेले. तरुणांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य वाचले. एक वेगळाच प्रयोग पहिल्यांदा झाला. अधिकारी वर्गाच्या सामाजिक बांधिलकीचे सिद्धार्थ खरात हे आदर्श उदाहरण आहे. सामाजिक उत्कर्षाच्या विविध संकल्पना त्यांच्या डोक्यात आहेत. हळूहळू त्या आकार घेत आहेत. मा. सिद्धार्थ खरात यांना त्यांच्या या भावी संकल्प सिद्धीसाठी खूप खूप शुभेच्छा…!
- -रवींद्र साळवे
- बुलडाणा
- मो. 9822262003
- (सौ.दै.जिंक्य भारत)