अमरावती: झुंज येथील दुर्घटनाग्रस्त 11 व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी दोन लाख रूपये अर्थसाह्य देण्यात येणार असून, त्यासाठीचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
वरूड तालुक्यातील मौजे वघाळ शिवारातील झुंज या ठिकाणी वर्धा नदीपात्रात दि. 14 सप्टेंबरला बोट बुडाल्यामुळे बोटीतील 11 व्यक्तींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची तत्काळ दखल घेत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंती व पाठपुरावा केला. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून 11 व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख याप्रमाणे एकूण 22 लाख रूपये अर्थसाह्य मंजूर केले आहे. ही रक्कम जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आली आहे.
दुर्घटनाग्रस्त व्यक्तींच्या कुटुंबांच्या पाठीशी महाविकास आघाडी शासन खंबीरपणे उभे आहे. दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना मदत तातडीने मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी तत्काळ मान्यता देत निधी जिल्ह्याकडे वर्गही करण्यात आला आहे. प्रशासनाने दुर्घटनाग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना तत्काळ मंजूर अर्थसहाय्याचे वाटप करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.