• Thu. Sep 28th, 2023

जनप्रबोधनातून समाजपरिवर्तन करणारा “निखारा”

  कवी प्रा.अरुण बुंदेले यांचा
  निखारा काव्यसंग्रह म्हणजे
  जनप्रबोधनाचा आणि
  समाजपरिवर्तनाचा आरसा

  कवी प्रा.अरुण बा. बुंदेले यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या जनप्रबोधनातून समाजपरिवर्तन करणाऱ्या “निखारा” या काव्यसंग्रहावरील *समीक्षक-कवी-कथाकार* *श्री.पद्माकर कळसकर* यांची समीक्षा वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.-संपादक

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  —————– ————————

  जवळपास सहा शतकातील थोर महामानवांना वंदन करुन कवी प्रा.अरुण बुंदेले यांनी वैचारिक दृष्ट्या कमालीची सजगता “निखारा” या काव्यसंग्रहाचा अोनामा करताना जोपासली. याची क्रमवारी पाहता गौतम बुद्ध, गुरू रविदास, राजमाता माँसाहेब,छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतिज्योती, जोतीरावांची प्रेरणा,बहुजन नायक, डाँ .बाबासाहेब आंबेडकर, भाऊसाहेब डाँ.पंजाबराव देशमुख अशी ही क्रमवारी खूप प्रभावी झाली,याला तोड नाही.परिवर्तनाची हीच खरी नांदी आहे.

  प्रा.अरुण बुंदेले यांची सामाजिक आणि शैक्षणिक विषयावरील आठ पुस्तके जरी प्रकाशित झाली असली तरी त्यांचा नुकताच प्रकाशित झालेला ” निखारा ” हा पहिला काव्यसंग्रह माझ्या वाचण्यात आला. अज्ञान, विषमता, स्रीभ्रूण हत्या,मद्यपान, हुंडा समाजातील अशा अनेक कुप्रथा नष्ट करण्यासाठीच त्यांनी निखाऱ्याची निर्मिती केली असे वाटते .याशिवाय जे एक सामाजिक परिवर्तन आहे त्यावर त्याची करडी नजर दिसते,म्हणूनच तथागत, निखारा, अण्णाभाऊ साठे,आदर्श गुरुजी,राष्ट्रसंत या मोठा अभंग या छंदातील अभंगातून फार मोठा आशय सांगितलेला आहे. “निखारा ” या शीर्षक अभंगात कवी संसार नष्ट करणाऱ्या मद्याविषयी लिहितात की,

  मद्याचा निखारा। जीवन प्रहार ॥
  उद्ध्वस्त संसार । दारुड्याचा॥
  प्रा.बुंदेले यांनी मोजक्या शब्दात “राज्यघटना” वाचायला दिली. “आर्य अष्टांगिक मार्ग” ही रचना वाचल्यानंतर
  “समतोल मनाची सम्यक समाधी । अष्टांग मार्गाचरण सम्यक समाधी॥”

  हा विचार कायमचा पटवून देणे अगत्याचे वाटते. निखाऱ्यातील कविता या प्रसादगुणयुक्त असल्यामुळे प्रासादिक आहेत. सोप्या तितक्याच गहन आहेत. लिखाणातील हा समतोलपणा कायम ठेवल्यामुळे “निखारा अधिक श्रीमंत झाला. थोर पुरुषांवरील सर्वच कविता तसेच क्रांतिकारी स्वगतगीत, आंबेडकर संस्कृती, फुले- आंबेडकर, आदर्श विद्यार्थी जीवन या कविता इतिहासाची साक्ष पटवितात. द्या शिक्षण,छ.शाहू महाराज, भाऊसाहेबांच्या प्रेरणेने,जोतीबा, एकदा या इत्यादी कवितेतून असे वाटते की, शिक्षण गंगोत्रीचा वाहता ओघ घराघरात शिरावा असे कवीला अभिप्रेत अाहे.माणुसकीचे होत असलेले पतन त्यांना असह्य होते. कवीला सज्जनांची संगत,एकात्मता, प्रेम हे विषय आवडीचे वाटतात. आपल्या बदलत्या विचारधारेत एका वैचारिक पातळीवर झेप घेतली. आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी कमालीचे प्रबोधन केलेले आहे.हे त्यांच्या एड्स एक डायनासोर,दारुड्याची कहाणी,संसाराची धुयधानी यातून समाजात व्यसनांनी झालेला अनर्थ मोजक्या शब्दात मांडलेला आहे.स्रीचा महिमा सांगताना कथन केलेल्या पैलूतून त्यांनी स्रीयांचा सन्मान केलेला आहे.

  कवी प्रा.बुंदेले यांनी आपल्या क्रांतिकारी विचारधारेतून समाजहिताच्या रचना केल्या ,काळाची गरज पाहून त्या अाचरणात आणणे अगत्याचे वाटते. उदा. बहुजन मंगलाष्टके,शिकवन गाडगेबाबांची,सावित्री क्रांतीची मशाल,चला प्रौढ सिक्सनाले,दोनच घाल जल्माले,घ्यायचा नाय हुंडा,करा नियोजन अशा यमक अलंकारयुक्त गेय काव्यरचनेतून झंझावती पोटतिडकिने जनजागृती केली.अमूल्य समाजप्रबोधन यातून घडणार आहे तसे ते सन २००० पासून ” आदर्श काव्य प्रबोधन माला” या स्वनिर्मित कार्यक्रमातून ,विविध साहित्य संमेलनातील कविसंमेलनातून व अाज करोना काळात आँनलाईन कविसंमेलनतून समाजप्रबोधन करुन जनजागृती करीत आहेत. विषमतेच्या जगात गटांगळ्या खात जीवनाचे समीकरण मांडताना विपर्यासातून सायास त्यांनी व्यक्त करुन दाखविले.क्रांतिकारी विचारवंत संत गुरु रविदास या कवितेत त्यांनी महान सत्पुरुष, महामानव,थोर राजकीय तज्ज्ञ, क्रांतिकारी विचारवंत,वैज्ञानिक संत, थोर युगपुरुष अशा दिलेल्या उपाध्या पाहता जगात असा संत झाला नाही म्हणून अशी चिरस्मरणीय कविता वाचकांच्या काळजात कायमचे घर करुन राहते.

  आज स्रीभ्रूण हत्येची फार मोठी समस्या निर्माण झालेली पाहून कवीचे मन फार दु:खी झाल्यामुळे “लेक वाचवा अभियान” या वऱ्हाडी काव्यगीतातून त्यांनी ते व्यक्त केले. प्रेम स्वत:सोबतच थोर पुरुषांच्या क्रांतिकारी विचारावर कसे करावे ? हे त्यांनी “प्रेम करावं” या मुक्तछंदातील कवितेतेत प्रासादिक शब्दातून सांगितले आहे म्हणूनच त्यांनी महामानवांना वंदन करुन या काव्यग्रंथाचा अोनामा केला.अशी ही प्रा.अरुण बुंदेले यांच्या निखाऱ्याचातून उमललेली क्रांतिकारी काव्यफुले समाजरचनेवर फुंकर घालतात.फुले आंबेडकरी तत्त्वज्ञान
  व आंबेडकर संस्कृती या विचारधारेला त्यांनी दिलेले प्राधान्य हा काळजाचा ठाव घेणारे वाटते कारण की मुळातच “आंबेडकरवाद” हा समानता प्रस्थापित करणारा एक प्रगल्भ विचार आहे.काही ठिकाणी त्यांना वेदना जाणवताच एक खंत मनाला सल देते हे सांगतानाही त्यांनी वेगळेपणा जपला. असेच डाँ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या कार्याला

  “भाऊसाहेब ” या वंदनगीतातून,
  “भाऊसाहेबांचे कर्मगीत” या काव्य गीतातून व “भाऊसाहेबांच्या प्रेरणेने”

  या मुक्तछंदातील काव्यातून जपले.कवी प्रा. बुंदेले यांच्या निखाऱ्यातील विविध विषयावरील कविता वाचताना त्यात कसलाही अतिरेक वाटत नाही,नकारात्मकता दिसत नाही.यावरुन जनप्रबोधनाचा व समाजजागृतीचा आरसा म्हणजेच प्रा. अरुण बुंदेले यांचा निखारा हा काव्यसंग्रह होय. यावर त्यांनी कमालीचा प्रकाश टाकला आहे. म्हणूनच अत्यावश्यक असणारे असे परिवर्तन समाजात नव्याने घडू शकेल असे वाटते. निखाऱ्यातील शांत रस, करुण रस,रौद्र रसयुक्त कवितेतूनही त्यांनी समाजप्रबोधन केलेले अाहे.वास्तववादी सत्याविष्कारी विलोभनीय व अर्थपूर्ण मुखपृष्ठ पाहता या काव्यसंग्रहात दडलेल्या विचारक्रांतिची समाजाला खरी गरज आहे हे स्पष्ट होते.सुधीर प्रकाशन संस्थेने या काव्यसंग्रहाला घडविताना आपले सर्वस्व पणाला लावलेले दिसते.सुंदर सुबक छपाई, वापरलेल्या दर्जेदार कागदावरील शब्दभंडार,मलपृष्ठावरील कवीच्या परिचयासह त्यांच्या प्रकाशित पुस्तकांचे चित्रदर्शन आणि आकार पाहता या सर्व बाबींमुळे हा काव्यसंग्रह कमालीचा श्रीमंत झालेला आहे.

  चोख विचार,चोख आचरण,चोख शिकवण, रोखठोक बोलणे असाच एक वैचारिक बाणा हा निखारा वाचताना आला.एक योगायोग नजरेत नक्कीच भरला तो म्हणजे कवी प्रा.बुंदेले यांचे वय साठ वर्षे व त्यांच्या निखाऱ्यातील कवितांची संख्याही साठ हे समीकरण जुळताना दिसले. निखाऱ्यातील‍ कविता म्हणजे फुललेले एक एक क्रांतिफूल असून ते वेचताना (वाचताना) विचारक्रांती निर्माण होऊन समाजातील या विविध समस्या नष्ट झाल्या पाहिजे हा विचार वाचकांच्या मनात निर्माण होतो,हीच या काव्यसंग्रहाची उपलब्धी आहे. शेवटी मी एक म्हणेल की,

  “मज पामराशी काय थोरपण।
  पायीची वहाण पायीच बरी॥”

  चंद्रताऱ्यांच्या प्रकाशातील उठावदार दिसणारा निखारा शब्दांची क्रांतिफुले करुन समाजप्रबोधनातून समाजपरिवर्तन करणारा हा “निखारा”कोणाच्याही साहित्यदालनांची शोभा वाढविणाराच आहे.कवी प्रा.अरुण बुंदेले यांना पुढील साहित्य प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा !

  समीक्षक-कवी-कथाकार
  – पद्माकर कळसकर
  अकोला (वऱ्हाड)
  मो.नं . ९९२३९६२७४०
   काव्यसंग्रह :- निखारा
   कवी :- प्रा.अरुण बा.बुंदेले
   प्रकाशक :-सुधीर प्रकाशन,वर्धा.
   पृष्ठ :- १००
   मूल्य :- २००/-₹

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,