• Tue. Sep 26th, 2023

उत्कर्ष प्रतिष्ठान समाजासाठी ऐतिहासिक कार्य करणारी भारतातील आंबेडकरी राष्ट्रीय संस्था

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान, अकोला (महाराष्ट्र ) या समाजोद्धाराचे ऐतिहासिक कार्य करणाऱ्या भारतातील आंबेडकरी राष्ट्रीय संस्थेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त कवी, लेखक, समाजकार्यकर्ते प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  – संपादक

  न्यायपंडित, सर्वशास्त्रात दिग्विजयी ठरलेले, सर्वविद्यासंपन्न ,आकाशातील सूर्य आणि पूर्ण चंद्राप्रमाणे सुशोभित, सत् धम्म मार्गदर्शक, धम्मप्रवर्तक विश्वरत्न प. पु. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या नावाने आज भारतभर विविध संस्था कार्यरत आहेत पण माझ्या बघण्यात आलेली महाराष्ट्रातील अकोला (महाराष्ट्र )येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेचे कार्य तळागाळातील समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनमोल असेच आहे. सन २००४ म्हणजे संस्थेच्या नोंदणी पूर्व काळापासून समाजकार्याची सुरूवात या संस्थेने केली आणि सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चेअंती सर्वांचा विश्वास संपादन केल्यावर या संस्थेची नोंदणी दि. २७ ऑक्टोबर,२००६ रोजी अकोला येथे करण्यात आली.

  या ऐतिहासिक संस्थेचा दि.२७ ऑक्टोबर, २०२१ हा १५ वा वर्धापन दिन आहे. सर्वप्रथम या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी प्रा. मुकुंद हनवती भारसाकळे सर आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो व मनस्वी अभिवंदन करतो कारण त्यांच्या अथक परिश्रमामुळेच आज या संस्थेने समाजातील वंचित घटाकाला पुढे नेण्याचे, त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे कार्य सुरू ठेवले आहे आणि पुढेही प्रा.मुकुंद भारसाकळे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरूच राहणार आहे,यात शंका नाही . मुळात ही संस्थाच परिवर्तनवादातून निर्माण झालेली आहे आणि हा परिवर्तनवाद या संस्थेला महात्मा तथागत गौेतम बुद्ध ,क्रांतीसूर्य महात्मा फुले,छत्रपती शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजक्रांतीच्या वैचारिक तत्वज्ञानातून मिळालेला आहे, त्यामुळे आज हे प्रतिष्ठान बुद्ध,फुले, शाहू ,आंबेडकरी चळवळ झालेली आहे,असे म्हणता येईल. बौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासाची गुरूकिल्ली म्हणजे हे प्रतिष्ठान होय. सोबत इतर समाजातील गरीब घटकांचा विचार करून त्यांनाही पुढे जाण्यास मदत करणारे हे प्रतिष्ठान म्हणजे दीर्घकालीन कार्य करणारी चळवळ आहे. विशेष म्हणजे प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत पैशाअभावी वंचित राहणाऱ्या कोणत्याही समाजातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरणारे हे प्रतिष्ठान आहे.

  प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मुकुंद भारसाकळे यांच्या मते, कोणत्याही समाजाचा त्या समाजातील सर्व घटकांचा विकास करायचा असेल तर त्या त्या समाजाने स्वत:च पुढाकार घेतला पाहिजे किंवा प्रामाणिकपणे पुढाकार घेणाऱ्यांना तन, मन, धनाने साथ दिली पाहिजे. त्यासाठी त्यागवृत्तीचा अवलंब केला पाहिजे. कोणीतरी येईल आणि आपला उद्धार करील, ही भावना मनातून काढून टाकली पाहिजे आणि स्वत:पासून समाज विकासाच्या कार्याचा ओनामा करायला पाहिजे. हा या प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षांचा विचार प्रत्येक समाजाला पुढे घेऊन जाणारा, प्रगतीपथावर नेणारा आहे, असे मला वाटते. म्हणून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे कार्य २००४ पासून आजपर्यंत सतत न थांबता सर्व पदाधिकारी व सहकाऱ्यांच्या मदतीने करीत आहेत व पुढेही करीत राहणार आहेत, यात शंका नाही. कारण

  थांबला तो संपला/
  निजती ते ठारची मरती/

  अशी त्यांची विचारसरणी आहे.म्हणूनच प्रा. भारसाकळे सर रात्रंदिवस समाजविकासासाठी या प्रतिष्ठानचे कार्य झपाटून करीत अाहेत.कोणत्याही संस्थेचे, चळवळीचे ,प्रतिष्ठानचे उद्दिष्ट तेव्हाच पूर्णत्वास जाऊ शकते जेव्हा ते उद्दिष्ट पूर्ण करणारे सर्व पदाधिकारी, सर्व सहकारी आणि ज्या ज्या समाजासाठी ते कार्य आहे त्या त्या समाजातील सर्व लोकांची साथ, त्याग आणि नि:स्वार्थी भावना, समाजाची एकात्मता असते.

  भारतीय घटनेत,
  एकात्मतेचे तत्वज्ञान /
  गाती येथे भीमाचे,
  नि घटनेच मधूर गान//

  अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून प्रेरणा घेऊन एकजुटीने कार्य केल्यास प्रत्येक समाज प्रगतीपथावर गेल्याशिवाय राहणार नाही. प्रा. मुकुंद भारसाकळे सर प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजाला प्रगतीपथावर नेण्याचे कार्य करीत आहेत. त्यांच्यावरील विश्वासामुळे आज त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील हजारो समाज बांधव जुळलेली असून त्यांना प्रतिष्ठानच्या ऐतिहासिक कार्यासाठी मदत करीत आहेत. आपण दिलेल्या धम्मदानाचा एकही पैसा व्यर्थ जाणार नाही. समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठीच उपयोगी पडणार आहे, हा आत्माविश्वास धम्मदानदात्यांचा आहे.
  माणसाने माणुसकीने वागावे हे खरे/ निर्माण होतील मग प्रेमाचेच झरे// अशी माणुसकी दाखवून समाजामध्ये प्रेमाचे झरे निर्माण करणारे प्रा. मु्कुंद भारसाकळे सरांचे कार्य महान आहे.

  प्रतिष्ठानचे सर्वात महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक कार्य म्हणजे अकोला (महाराष्ट्र) येथे उभारल्या जात असलेले भव्यदिव्य असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन हे होय. या भवनाचे आजपर्यंत चार मजले तयार झाले असून सुमारे २२ कोटी रुपयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे आणि तेथील जागेसह ३० कोटी रुपये खर्च झालेला आहे. ही प्रबोधन भवनाची भव्यदिव्य चार मजली इमारत बौद्ध बांधवांच्या त्यागातून निर्माण झालेली आहे. शासनाची कोणत्याही स्वरुपातील कोणतीही मदत घ्यायची नाही हा या प्रतिष्ठानचा संकल्प आहे.

  या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनामध्ये तीन हजार लोक बसतील अशा भव्य आकाराचे बुद्ध धम्म संस्कार सभागृह आहे. पन्नास ते साठ कर्मचारी, अधिकारी, पर्यटक निवास करतील असे आधुनिक सोयींनी युक्त विश्राम भवन आहे. हजार लोक क्षमतेचे मातोश्री रमाई सांस्कृतिक सभागृह आहे. दोनशे गरीब विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतील अशा क्षमतेची भव्य अभ्यासिका आणि हजारो ग्रंथ असलेले भव्य ग्रंथालय आहे. या अभ्यासिका आणि ग्रंथालयातून

  अठरा एकवीस तास अभ्यास/
  ग्रंथ वाचनाचा एक निजध्यास//
  असे विद्यार्थी घडणार आहेत.

  या दोनशे गरीब शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास व भोजन प्रतिष्ठानतर्फे विनामूल्य देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या गरीब विद्यार्थ्यांची निवड संपूर्ण बहुजन समाजातून केली जाणार आहे. चौथ्या मजल्यावर ५०० उपासक-उपासिका धम्म प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी बसू शकतील या क्षमतेचे भव्य बुद्ध विहार आहे . हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन, अकोला शहरात खडकी शिवणी या उपनगराजवळून हाय वे क्र. ६ चा बायपास गेलेला आहे. त्याच्या बाजूलाच आहे. हायवे क्र. ६ कडून प्रबोधन भवनाच्या दर्शनी भागाला २५ फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याची निमिर्ती प्रक्रिया सध्या सुरू आहे.

  या प्रबोधन भवनाच्या बाजूला अठरा हजार चौ. फूट आकाराचा लॉर्ड बुद्धा पार्कआहे. भवनाच्या बाजूला आठ हजार चौ. फुटाच्या जागेवर गरीब विद्यर्थ्याच्या निवास व भोजन कक्षासाठी तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. अशा सर्व सोयींनी युक्त असलेले धम्मदानातून आकारास येत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन महाराष्ट्रात एकमेव असावे, असे मला वाटते कारण मी ते प्रत्यक्ष बघितले आहे. हे ऐतिहासिक कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मुकुंद भारसाकळे सर व त्यांचे सहकारी पदाधिकारी रात्रंदिवस कार्य करीत आहेत. यातून अनेक समाज बांधवांना रोजगारही प्राप्त झालेला आहे. या प्रबोधन भवनामध्ये नर्सरी ते नवव्या वर्गापर्यंतचे ८५ ते ९० विद्यार्थ्यांचे संस्कार वर्ग व इंग्रजी – गणित विषयाचे वर्ग सुरू झालेले आहेत. पुढील पाच वर्षामध्ये शाळा, महाविद्यालय, बँक ,सहकार शेती, सहकार उद्योग ,सहकार हॉस्पिटल, सहकार मेडिकल कॉलेज, सहकार इंजिनिअरींग कॉलेज इत्यादी समाजाच्या प्रगतीचे आधार स्तंभ निर्माण करून समाजातील गरीब बांधव स्वत:च्या पायावर उभे करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. दोन हजार आजीवन सभासद असलेले हे प्रतिष्ठान एकमेव असावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर आधारित समाजाची अस्मिता जोपासून समाजाच्या उन्नतीसाठी रात्रंदिवस सतत झटणारी ही देशातील पहिली आंबेडकरी चळवळ असावी.

  बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरी समाजाचे हजारो बांधव त्यांचे हजारो परिवार नि:स्वार्थी, त्यागी वृत्तीने व ऐक्य भावनेतून कसे कार्य करतात हे बघायचे असेल तर अकोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनाला एकवेळा तरी भेट देणे आवश्यक आहे. या सदिच्छा भेटीतून निरपेक्ष समाजकार्याची प्रेरणा मिळेल. अशीच प्रेरणा बुलडाणा, नागपूर, वाशिम, लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना प्रबोधन भवनाच्या भेटीअंती मिळालेली आहे आणि अशाच प्रकारच्या समाजकार्याला त्यांनी प्रारंभ केलेला आहे. प्रा. मुकुंद भारसाकळे यांच्या प्रयत्नातून सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव सोसायटीचा प्रारंभ झालेला आहे. शेअर होल्डर तयार करणे हे कठिण असलेले कार्य प्रतिष्ठानच्या प्रामाणिक कार्यामुळे सोपे झाले आहे.

  त्यामुळे शेअर होल्डर तयार होत आहेत. डी. डी. आर च्याद्वारा बँकमध्ये पतसंस्थेचे खाते उघडण्यात आले असून १५०० भाग धारकांची रक्कम बँकमध्ये जमा झालेली आहे. प्रतिष्ठानच्या कार्यासाठी धम्मदानदाते फार मोठया प्रमाणात मिळाले असून पुढेही मिळत राहणार आहेत, त्याचे मुख्य कारण म्हणजे प्रा. मुकुंद भारसाकळे व त्यांच्या सहकाऱ्यांची काम करण्याची तळमळ, प्रामाणिकपणा, कार्यातील सातत्य, संयमशील व त्यागमय वृत्ती आणि आजपर्यंत प्रबोधन भवनाचे जे २२ कोटी रुपयाचे चार मजल्याचे बांधकाम करण्यात आले त्यातील पारदर्शकता यामुळे सरांसोबत एक एक आंबेडकरी व्यक्ती जुळत गेले व आज रोजी हजारो आंबेडकरी अनुयायी प्रतिष्ठानला लाभल्यामुळे असे भव्यदिव्य कार्य पूर्णत्वास जात आहे. प्रतिष्ठानच्या व प्रबोधन भवनाच्या विकासामध्ये प्रा. मुकुंद भारसाकळे सर संस्थापक संपादक असलेल्या साप्ताहिक समाज न्यायपत्रचा फार मोठा वाटा आहे, असे मला वाटते. कारण सरांनी केलेले समाजोपयोगी कार्य समाजापर्यत पोहोचविण्याचे, प्रसार व प्रचार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य साप्ताहिक समाजन्यायपत्र सातत्यान करीत असतो.

  या समाज न्यायपत्र नावाच्या साप्ताहिकातील प्रत्येक अंकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनाच्या बांधकामाची प्रक्रिया परिपूर्ण प्रकाशित केलेली असते. आठवड्यातून एकदा प्रकाशित होत असलेल्या या साप्ताहिकात प्रबोधन भवनाच्या बांधकामाच्या खर्चाच्या कामाचे विवरण पारदर्शकपणे प्रकाशित झालेले असते आणि सर्व धम्मदान दात्यांचे हार्दिक अभिनंदन या मथळ्याखाली धम्मदान दात्यांचा फोटो, त्यांचे नाव व दान दिलेल्या रक्कमेचा आकडा अशी पूर्ण माहिती दिलेली असते. अशा या पारदर्शक कार्यामुळेच आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भव्यदिव्य प्रबोधन भवन तयार झालेले आहे. अशा या समाजापयोगी कार्य करणाऱ्या या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मुकुंद भारसाकळे सर , सर्व पदाधिकारी व सहकारी बांधवांना प्रतिष्ठानच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांच्या पुढील समाज कार्यासाठी मनस्वी सदिच्छा व्यक्त करतो.

  “डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजसेवा व साहित्यरत्न पुरस्कार “प्राप्त कवी-लेखक-वक्ते
  प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
  अमरावती.
  Email ID.
  भ्र.ध्व.८०८७७४८६०९
   Email ID. arunbundele1@gmail.com

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,