• Thu. Sep 28th, 2023

‘इंडिया फॉर टायगर्स – अ रॅली ऑन व्हील्स’चे उत्साहात स्वागत

  अमरावती: ‘आझादी का अमृत महोत्सव’ व ‘वन्यजीव सप्ताहा’निमित्त राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणामार्फत छत्तीसगडमधील अचानकमार येथून निघालेल्या ‘इंडिया फॉर टायगर्स- अ रॅली ऑन व्हील्स’ या मध्य भारतातील व्याघ्रप्रकल्पांना जोडणा-या रॅलीचे उत्साहात स्वागत मेळघाट व्याघ्र प्रकल्प व वन विभागातर्फे अमरावतीत ऑक्सिजन पार्क येथे करण्यात आले. पुढे ही रॅली कोलकास व शहानूर येथे भ्रमंती करून उद्या (6 ऑक्टोबर) चिखलदरा येथील वन प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात सांगता होणार आहे.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  वाघ, वन्यजीव संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृतीसाठी निघालेल्या या रॅलीचे तुतारीचा निनाद व वाद्यवृंदाच्या साथीवर ऑक्सिजन पार्कच्या परिसरात वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, विविध वन्यप्रेमी संस्था, वनअभ्यासकांनी स्वागत केले. ‘मिशन ऑलिपिंक’साठी सराव करणा-या विद्यार्थी सायकलपटूंची सायकल रॅलीही यावेळी काढण्यात आली. वाघाच्या वेषात सहभागी झालेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पेंच व बोर प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. रवीकिरण गोवेकर यांनी रॅलीचा ध्वज मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जयोती बॅनर्जी यांच्याकडे सुपूर्द केला.

  यवतमाळ परिक्षेत्राचे वनसंरक्षक पी. जे. लोणकर, सामाजिक वनीकरण वनसंरक्षक डी. पी. निकम, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे सहायक संचालक हेमंत कामडी, उपवन संरक्षक चंद्रशेखरन बाला, पीयूषा जगताप, नवकिशोर रेड्डी, अविनाश कुमार, सहायक वनसंरक्षक ज्योती पवार, लीना आदे, विभागीय वनाधिकारी मनोजकुमार खैरनार, श्री. डेहणकर आदी यावेळी उपस्थित होते.

  हा उपक्रम देशपातळीवर 18 राज्यांत होत असून, 51 व्याघ्र प्रकल्प यात सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातील व छत्तीसगडमधील सर्व व्याघ्र प्रकल्पांचा समावेश असलेल्या रॅलीची सांगता उद्या चिखलद-यात होणार आहे. ही रॅली छत्तीसगड येथील अचानकमार व्याघ्र प्रकल्प येथून सुरू झाली. अचानकमार, उदनती- सीतानदी, इंद्रावती, ताडोबा- अंधारी, नवेगाव-नागझिरा, पेंच, बोर व मेळघाट व्याघ्र प्रकल्प असा या रॅलीचा मार्ग असून, जागोजागी व्याघ्र संवर्धनातील स्टेकहोल्डर्स यांना सहभागी करण्यात आले. विविध व्याघ्र प्रकल्पातील उपक्रम व वैशिष्ट्यांची झलकही या रॅलीत पाहायला मिळाली. युथ फॉर नेचर कंझर्वेशन ऑर्गनायझेशन आणि राज्य कला अध्यापक संघातर्फे चित्र प्रदर्शनाचे आयोजनही यावेळी करण्यात आले.

  रॅलीच्या स्वागतार्थ पार्कमध्ये आयोजित समारंभात बोर व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक श्री. गोवेकर यांनी रॅलीचे महत्व व व्याघ्रसंवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना 1974 मध्ये झाली असून, हा प्रकल्प देशातील पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पापैकी एक आहे. देशात 2018 मध्ये झालेल्या व्याघ्रगणनेत देशातील 2 हजार 967 वाघांपैकी 50 हून अधिक वाघ एकट्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आहेत. व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टिकोनातून वनपर्यटनातून रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास, जनजागृतीसाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत, अशी माहिती मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी यांनी दिली. श्री. कामडी यांनी आपल्या मनोगतातून उपक्रमाचा उद्देश विशद केला. श्रीमती जगताप यांनी प्रास्ताविक केले. श्री. डेहणकर यांनी आभार मानले. क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,